Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 24 April 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपत आहे. या टप्प्यात परवा २६ तारखेला मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज नांदेड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारासाठी भोकर इथं सभा घेणार आहेत. तत्पूर्वी नांदेड इथं वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, महाविकास आघाडीमध्ये योग्य ताळमेळ असून, मित्रपक्षाचे कार्यकर्ते सोबत काम करत असल्याचं सांगितलं.
****
अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ सभा होत आहे. तर महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा आज होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हिंगोली जिल्ह्यात वसमत इथं महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या २५ तारखेला संपत आहे. २६ तारखेला अर्जांची छाननी होईल, तर २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांचा समावेश आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलिल, तसंच बीड लोकसभा मतदारसंघातल्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी २७ तारखेला कोल्हापूर इथं जाहीर सभा घेणार आहेत. कोल्हापूर मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
हिंगोली शहरात आज पहाटे मतदान जनजागृती संदर्भात रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुमार कुंभार, यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्व नागरीकांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन या रॅलीद्वारे करण्यात आलं.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आज मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली, तसंच मानवी साखळी करण्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी या उपक्रमांची सुरुवात केली.
****
नाशिक जिल्ह्यात अंध मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचल्यावर सहायकांच्या मदतीने मतदान करता येईल यासाठी मशिनवर ब्रेल लिपीतील मतपत्रिका पुरवण्यात येणार आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड ही संस्था ब्रेल लिपीतल्या मतपत्रिका तयार करुन देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.
****
पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था - एफ टी आय आयच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला, ‘सनफ्लावर्स वेअर फर्स्ट वन टू नोज’ या चित्रपटाची फ्रान्स मध्ये होणाऱ्या ७७व्या कान चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. संस्थेनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. १५ ते २४ मे दरम्यान होणार्या या महोत्सवामध्ये स्पर्धात्मक विभागात हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.
****
नाशिक जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लेव्ही म्हणजे हमालपट्टी कपात न करताच लिलाव घेण्याच्या वादामुळे येवला, पिंपळगाव बसवंत, नांदगाव, मनमाड या चार बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. हमाल आणि माथाडी कामगार तसंच व्यापारी यांच्या वादात शेतकऱ्यांचे हाल होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
चीनमध्ये शांघई इथं सुरु असलेल्या तिरंदाजी विश्व चषक स्पर्धा २०२४ मध्ये भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम हिने महिला कंपाउंड पात्रता फेरीच्या पहिल्या फेरीत दुसरा क्रमांक मिळवला. आदिती स्वामीने ७०४ गुणांसह आठवा, तर परनीत कौर आणि अवनीत कौर या अनुक्रमे ७०३ आणि ६९६ गुणांसह १४ आणि २३ व्या क्रमांकावर पोचल्या. या खेळाडूंमुळे भारतीय महिला संघ एकूण दोन हजार ११८ गुणांसह पात्रता फेरीतला सर्वोत्कृष्ट संघ ठरला आहे.
****
भारतानं जागतिक ॲथलेटिक्स साखळी स्पर्धेसाठी १५ खेळाडुंच्या संघाची घोषणा केली आहे. आगामी पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी चार आणि पाच मे रोजी बहामास मध्ये ही स्पर्धा होणार आहे. पुरुष, महिला आणि मिश्र गटात हे स्पर्धक ४०० मीटर रिले प्रकारात देशाचं प्रतिनिधित्व करणार आहेत.
****
No comments:
Post a Comment