Thursday, 25 April 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:25.04.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२५ एप्रिल २०२ सकाळी ११.०० वाजता

****

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यात उद्या १३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ८८ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे.  राज्यातल्या आठ मतदारसंघात एकूण १६ हजार ५८९ मतदान केंद्र असून १ कोटी ४९ लाखांपेक्षा जास्त मतदारांची नोंदणी झाली आहे.

****

मुंबईत मतदानाची टक्केवारी वाढवून मतदानात मुंबई उपनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रालाही अग्रस्थानी आणावं, असं आवाहन लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं नियुक्त केलेले राज्य विशेष निरीक्षक धर्मेंद्रसिंग गंगवार यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या चारही लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आज नांदेड जिल्ह्यातील देगलूर तहसील कार्यालयातून मतपेट्यांचं वाटप होणार आहे. या दरम्यान, तहसील कार्यालयाच्या मार्गावरील सर्व वाहनांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, अशी अधिसूचना जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी जारी केली आहे.  

****

उन्हाळ्याच्या सुट्टीत धार्मिक स्थळी होणारी गर्दी लक्षात घेता अन्न आणि औषध प्रशासनानं भेसळयुक्त अन्न पदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत नाशिक जिल्ह्यात वणी इथल्या सप्तशृंगी गडावर प्रसादात भेसळ करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे सहा लाख रुपयांची मिठाई नष्ट करण्यात आली आहे.

****

मध्य महाराष्ट्र आणि परिसरात चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं आज या भागात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.विदर्भ आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

****

No comments: