Tuesday, 23 April 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:23.04.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 23 April 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २३ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार उद्या संपणार आहे. या टप्प्यात येत्या २६ तारखेला मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ - वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर या मतदारसंघांमध्ये सर्वच पक्षांचे दिग्गज नेते प्रचारसभा घेत आहेत.

भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अकोला इथं महायुतीचे उमेदवार अनूप धोत्रे यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. या मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. अभय पाटील, तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासह १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शहा यांची उद्या अमरावती मध्ये भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या प्राचारासाठी सभा होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथं महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. भाजप नेते केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी आज सकाळी परभणी शहरातून पदयात्रा काढून प्रचार केला. 

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्ध बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी परभणी शहरात प्रचारसभा होणार आहे.

****

परभणी लोकसभा मतदार संघात २६ तारखेला मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचं परिपत्रक काल जारी करण्यात आलं. ही सुटी सर्व आस्थापना, कारखाने, दुकानं आदींना लागू राहणार असून, अपवादात्मक परिस्थितीत संबंधित महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेऊन कामगार, अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुटी ऐवजी दोन ते तीन तासांची सवलत देता येईल, असं या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्पात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत परवा २५ तारखेला संपत आहे. २६ तारखेला अर्जांची छाननी होईल, तर २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या टप्प्यात दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या एकूण ९६ मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांचा समावेश आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.  

****

नाशिक जिल्ह्यातल्या दोन लोकसभा मतदार संघासाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार घोषित केले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी करण गायकर यांना, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मालती थविल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

****

धाराशिव इथं आज मतदार जनजागृतीसाठी सायकल फेरी आणि पोस्टर प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी या दोन्ही उपक्रमांचं उद्घाटन केलं. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सायकल रॅलीनं संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करत नागरीकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. मतदारांनी लोकशाहीच्या महोत्सवात निर्भीडपणे मतदान करण्यासाठी पुढे यावं, असं आवाहन, जिल्हाधिकार्यांनी यावेळी केलं. जिल्ह्यातल्या मतदारांना जागृत करण्यासाठी प्रत्येक शाळांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना लिहिलेलं भावनिक पत्र, तसंच विद्यार्थ्यांची मानवी साखळी, पथनाट्य, आदी उपक्रमांमधून जनजागृती केली जात आहे.

****

वाशिम जिल्ह्यात मतदान करून आलेल्या नागरीकांना इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे २६, २७ आणि २८ एप्रिल रोजी तपासणी शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. मतदार जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत संघटनेनं हा निर्णय घेतला आहे.

****

लातूर लोकसभा मतदार संघात निवडणूक सामान्य निरीक्षक निरंजन कुमार यांनी मतदान यंत्र सुरक्षा कक्षाची काल पाहणी केली. कक्षाच्या सुरक्षिततेसाठी सीसीटिव्ही व्यवस्था आणि मतमोजणी कक्षाची माहिती घेऊन संबंधितांना याबाबत सूचना दिल्या.

****

राज्यभरात आज हनुमान जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी होत आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सुपारी हनुमान तसंच जिल्ह्यात खुलताबाद इथल्या भद्रा मारुती मंदिरांसह ठीकठिकाणच्या हनुमान मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

मुंबईच्या जुहू चौपाटीवर हनुमान जयंतीनिमित्त वाळूशिल्पकार लक्ष्मी गौड यांनी हनुमानाची दहा फूट उंच प्रतिकृती साकारली आहे.

****

उन्हाळी सुट्यांमध्ये होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड -हजरत निजामुद्दीन दिल्ली या विशेष गाडीला ३० जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही गाडी दर शनिवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून सकाळी पावणे नऊ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता दिल्लीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दर रविवारी दिल्लीहून रात्री नऊ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजून ३५ मिनिटांनी नांदेडला पोहोचेल.

****

No comments: