Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date : 01 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं घेतलेल्या नीट - यूजी या फेरपरीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. गेल्या २३ जूनला एक हजार ५६३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.
****
पेपर फुटी रोखण्यासाठी चालू अधिवेशनात विधेयक आणणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. आज विधानसभेत राज्यातल्या पेपर फुटीच्या संदर्भात सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना फडणवीस यांनी ही माहिती दिली, ते म्हणाले...
‘‘पेपर फुटीच्या संदर्भातल्या केंद्र सरकारनं कायदा केल्यानंतर, राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचं मनोदय, हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला. या संदर्भात आमची कारवाई चालली आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की, याचं अधिवेशनामध्ये हा कायदा आम्ही आणणार आहोत.’’
गट क श्रेणीतल्या पदांची भरती एमपीएससी मार्फत होणार असून यासंदर्भात मंत्रिमंडळ निर्णय झाला असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. राज्यात आणखी ३१ हजारांहून अधिक पदांची भरती सुरू असून परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी निरीक्षक म्हणून नेमले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात सुमारे अडीच लाख रिक्त पदांची भरती करण्याची मागणी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी केली. यावर बोलतांना, फडणवीस यांनी, विविध विभागातल्या सुमारे ६० टक्के जागांची भरती करण्याची मंजुरी वित्त विभागाने दिली असून, त्यानुसार भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचं सांगितलं.
****
दरम्यान, राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशी कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी, विविध परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणावरून विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर महायुती सरकारच्या विरोधात हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली.
****
अनुदानित शाळांमधील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात, पुढील तीन महिन्यात निर्णय घेतला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली. याबाबत शिक्षक संघटनांशी बोलून त्यात यशस्वी मार्ग काढण्यात आला आहे, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा प्रस्ताव मात्र अद्याप प्रलंबित आहे, त्यांच्याकडील परिपूर्ण माहिती आल्यावर हा निर्णय घेतला जाणार असल्याचं, पवार यांनी सांगितलं.
२०३० साली पात्र शिक्षकांची पहिली तुकडी निवृत्त होईल त्यावेळी ही योजना लागू केली जाईल असं ही पवार यांनी स्पष्ट केलं.
१०० टक्के अनुदान असणाऱ्या शाळांनाच अनुदानित शाळा गृहीत धरून त्यांनाच जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे त्याला शिक्षक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे, त्याचा जो निर्णय येईल त्यानुसार कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
****
विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांसाठी झालेल्या मतदानाची आज मोजणी होत आहे. नाशिक शिक्षक मतदार संघातल्या जळगाव जिल्ह्यात चोपडा इथल्या एका मतदान केंद्रांवर एकूण मतांपेक्षा तीन मतपत्रिका जास्त निघाल्याने गोंधळ झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतल्यानं संबंधित मतदान केंद्रावरील मतमोजणी स्थगित करण्यात आली आहे.
****
राज्यातल्या सर्वच शासकीय रुग्णालयात, खासगी-सार्वजनिक भागिदारी तत्त्वावर एमआरआय मशीन्स बसवण्यात येतील, तिथं शासकीय दरानेच सेवा दिली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. ते काल सांगलीत बोलत होते. विद्यार्थ्यांच्या ५० वर्ष जुन्या वसतीगृहाच्या विकासासाठी देखील आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
****
कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज राज्यभरात कृषी दिन म्हणून साजरी होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून वसंतराव नाईक यांना अभिवादन केलं. अजित पवार यांनी मंत्रालयात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीनंही वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आलं.
****
सुधारीत फौजदारी कायदे आजपासून देशभरात लागू झाले. जनतेला या सुधारणांची माहिती सहजरित्या व्हावी, यासाठी नांदेड जिल्हा पोलीस दलाकडून आज जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यक्रम आणि बैठका घेण्यात येत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
तेल वितरक कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या १९ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३० रुपयांची कपात केली आहे. आजपासून हे नवे दर लागू झाले.
****
No comments:
Post a Comment