Monday, 1 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:01.07.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 July 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ जूलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      नवे फौजदारी कायदे देशभरात लागू, फौजदारी न्याय प्रक्रियेत भारत आगामी काळात पथदर्शी ठरेल - कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल

·      लोकसभा निवडणुकीत देशातल्या मतदारांनी संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवरच्या अढळ विश्वासाचं दर्शन घडवल्याचं पंतप्रधानांचं मन की बात मध्ये प्रतिपादन

·      विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची आज मतमोजणी

·      ज्ञानोबा - तुकोबांच्या पालख्या पुण्यात दाखल, तर संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं परळी इथं भक्तिभावाने स्वागत

आणि

·      महिला कसोटी क्रिकेटमध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०५ धावांची आघाडी

****

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक संरक्षण संहिता, आणि भारतीय साक्ष अधिनियम, हे नवीन फौजदारी कायदे देशभरात आजपासून लागू झाले. केंद्र सरकारने यासंदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत नियमित बैठका घेतल्या होत्या. या नवीन कायद्यांमध्ये चौकशी, सुनावणी आणि न्यायालयीन प्रक्रियेत तंत्रज्ञानावर अधिक भर देण्यात आला आहे.

भारतीय दंड संहिता - आयपीसी, द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर - सीआरपीसी आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन कायदे कालबाह्य होत आहेत.

नवीन फौजदारी कायदे लागू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, न्यायाधीश, वकील यांच्यासह सर्व संबंधितांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विधी कार्य विभागातर्फे काल मुंबईत ‘फौजदारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनात भारताचा प्रगतीशील मार्गविषयावर परिषद घेण्यात आली. केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. या कायद्यांमुळे प्रत्येक नागरिकास न्याय मिळण्यासाठी सुलभता होईल, तसंच फौजदारी न्याय प्रक्रियेत भारत आगामी काळात पथदर्शी ठरेल असा विश्वास मेघवाल यांनी यावेळी व्यक्त केला.

परिषदेचा समारोप राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. हे फौजदारी कायदे आधुनिकीकरण आणि आंतरराष्ट्रीय मानकांप्रति देशाची वचनबद्धता दाखवणारे आहेत, या कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे मानवाधिकारांचं रक्षण, तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा उंचावेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

****

लोकसभा निवडणुकीत देशातल्या मतदारांनी संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवरच्या अढळ विश्वासाचं दर्शन घडवल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे अकराव्या भागात ते काल बोलत होते. जगातली सर्वात मोठी सार्वत्रिक निवडणूक यशस्वीपणे पार पडल्याबद्दल त्यांनी निवडणूक यंत्रणा आणि मतदारांचं अभिनंदन केलं तसंच देशवासीयांचे आभार मानले.

[$688A2450-827E-4766-B9EB-2D71F7CE9A10$AIR AURANGABAD - Mann Ki Baat - Election - ]

जगभरात भारतीय संस्कृती गौरवली जात असल्याचं सांगताना त्याबाबतची अनेक उदाहरणं पंतप्रधानांनी मन की बात या कार्यक्रमात दिली.

दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात जल्लोषात साजरा झाल्याचं सांगून पंतप्रधानांनी, दरवर्षी योगदिनाचे कार्यक्रम नवनवे विक्रम प्रस्थापित करत असल्याचं नमूद केलं. लवकरच सुरु होणार असलेली जगन्नाथ यात्रा, तसंच अमरनाथ यात्रा आणि पंढरपूरच्या वारीत सहभागी होणाऱ्या भाविकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.

****

राष्ट्रीय परिक्षा संस्थेनं यूजीसी नेट परीक्षा ऑफलाइन न घेता ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा २१ ऑगस्ट ते चार सप्टेंबर या कालावधीत विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे.

****

महाविकास आघाडीतले घटक पक्ष आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे  लढवतील, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यात बदल होण्याची गरज आहे, ती पूर्ण करण्याची जबाबदारी विरोधी आघाडीवर आहे, असं ते म्हणाले. जागावाटपाबाबतची चर्चा अद्याप सुरु झालेली नाही, असं पवार यांनी सांगितलं.

****

गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, काल त्यांनी पदभार स्वीकारला. सुजाता सौनिक या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत.

****

विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांसाठी झालेल्या मतदानाची आज मोजणी होणार आहे. नाशिक शिक्षक मतदार संघाची मतमोजणी नाशिक शहरात केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांनी काल याठिकाणी पाहणी करुन तयारीचा आढावा घेतला.

****

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या दोन दिवसांच्या मुक्कमासाठी काल पुण्यात दाखल झाल्या. दोन्ही पालख्यांचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या पाटील इस्टेट चौकात नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.  

संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं काल बीड जिल्ह्यात परळी इथं आगमन झालं. पालखीचं भाविकांनी उत्स्फुर्तपणे स्वागत केलं.

पैठणहून निघालेली संत श्री एकनाथ महाराजांची पालखी काल अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाली. आज मिडसावंगी इथं पालखीचा पहिला रिंगण सोहळा होणार आहे.

****

राज्यातल्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमींनी पुढे यावं असं आवाहन, राज्याचे माजी मुख्य सचिव नितीन करीर यांनी केलं आहे. नाशिक इथं काल गिरिभ्रमणकार अविनाश जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सह्याद्री मित्र संमेलन पार पडलं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे इथल्या आनंद पाळंदे यांना सह्याद्री रत्न जीनवगौरव पुरस्कार, तर सातारा इथल्या प्रियांका मेाहिते यांना सह्याद्री युवा रत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं. गिर्यारोहक उमेश झिरपे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.

****

राज्यातल्या सर्व जिल्हा परिषद कार्यालयातल्या दिव्यांग कर्मचार्यांना सहायक तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यासंदर्भातला शासन आदेश नुकताच जारी करण्यात आला. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निर्देश दिले होते.

****

नांदेड इथले ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी यांचं काल हृदयविकाराने निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. जोशी यांनी आपल्या पत्रकारितेच्या कार्यकाळात जिल्ह्यातल्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. दैनिक लोकमतमध्ये त्यांनी प्रदीर्घ काळ काम केलं. जोशी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान चेन्नई इथं सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताकडे १०५ धावांची आघाडी आहे. काल सामन्याच्या तिसर्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २६६ धावांवर संपुष्टात आला असून, त्यांना फॉलो ऑन मिळाला. स्नेहा राणा हिनं आठ बळी घेऊन इतिहास घडवला, तर दीप्ती शर्मानं दोन खेळाडू बाद केले. कालचा खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या दोन बाद २३२ धावा झाल्या होत्या.

****

भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याने टी - २० क्रिकेट प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. जडेजाने ७४ सामन्यांमध्ये ५१५ धावा केल्या, तर ५४ बळी घेतले.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं टी-ट्वेन्टी विश्वचषक विजेत्या संघाला १२५ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही घोषणा केली. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टी-ट्वेन्टी विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे.

****

मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत दौंड - मनमाड रेल्वे मार्गावरील विकासकामांसाठी लाईन ब्लॉक घेतल्यानं पुणे एक्सप्रेस आणि निजामाबाद डेमू रेल्वे गाड्यांच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. निजामाबाद -पुणे डेमू रेल्वे आज परभणी, परळी, लातूर, कुर्डुवाडी मार्गे धावेल, तर दौंड-निजामाबाद डेमू रेल्वे कुर्डुवाडी, लातूर, परळी, परभणी मार्गे धावेल. तसंच, पुणे - नांदेड एक्सप्रेस आज दौंड, कुर्डुवाडी, लातूर, परळी, परभणी मार्गे धावणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात काल दुपारच्या सुमारास समाधानकारक पाऊस झाला. या पावसामुळे शहरातल्या अनेक भागात पाणी साचलं होतं, त्यामुळे नागरीकांची तारांबळ उडाली. सिल्लोड, सोयगाव तालुक्यातही काल मुसळधार पाऊस झाला. अजिंठा लेणीतल्या सहस्त्रकुंड धबधब्यासह लहान - मोठे नाले खळखळून वाहत आहेत.

हिंगोली जिल्ह्यातही आठवडा भराच्या विश्रांती नंतर काल जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सुकत असलेल्या पिकांना नव संजीवनी मिळाली आहे.

वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा, मानोरा, वाशिम, रिसोड आणि मालेगाव तालुक्यांतल्या काही गावांत आठवडाभराच्या विश्रांती नंतर काल पाऊस झाला. या पावसाचा फायदा सुकू लागलेल्या पिकांना होत आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला.

****

येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

****

No comments: