आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०१ जूलै २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक संरक्षण संहिता, आणि भारतीय साक्ष अधिनियम, हे नवीन फौजदारी कायदे देशभरात आजपासून लागू झाले. या नवीन कायद्यांमध्ये चौकशी, सुनावणी आणि न्यायालयीन प्रक्रियेत तंत्रज्ञानावर अधिक भर देण्यात आला आहे.
नवीन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि जनतेस नवीन कायद्याची माहिती सहजरित्या प्राप्त होण्यासाठी, नांदेड जिल्हा पोलीस दलाकडून आज जिल्ह्यातल्या पोलीस ठाण्यांमध्ये विविध कार्यक्रम आणि बैठका घेण्यात येत आहेत.
****
राष्ट्रीय चाचणी संस्था - एनटीएनं वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परिक्षेसाठीच्या नीटच्या पुनर्परिक्षेचा निकाल आज जाहीर केला. एक हजार ५६३ विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली होती. एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.
****
कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज राज्यभरात कृषी दिन म्हणून साजरी होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून वसंतराव नाईक यांना अभिवादन केलं असून, राज्यातल्या शेतकर्यांना कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांसाठी झालेल्या मतदानाची आज मोजणी होत आहे. नाशिक शिक्षक मतदार संघातल्या जळगाव जिल्ह्यात चोपडा इथल्या एका मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानापैकी तीन मतपत्रिका जास्त निघाल्याने गोंधळ उडाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यास हरकत घेत मतमोजणी प्रक्रियेला आक्षेप घेतला असल्यानं संबंधित मतदान केंद्रावरील मतमोजणी स्थगित करण्यात आली आहे.
****
लोणावळ्यात सहलीसाठी गेलेले एकाच कुटुंबातले पाच जण काल भुशी धरणात वाहून गेले. हे सर्वजण पुण्यातले रहिवासी होते. यात एक महिला आणि चार लहान मुलांचा समावेश आहे. यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून इतरांचा शोध सुरू असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
राष्ट्रीय वरिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धेत ज्योती याराजी हिनं महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक मिळवलं. हरयाणामधे पंचकुला इथं झालेल्या या स्पर्धेत ज्योतीनं १३ मिनिटं ६ सेकंदांत अंतर पूर्ण केलं.
****
No comments:
Post a Comment