Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date : 02 July 2024
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व खासदारांना संसदीय
नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. सरकार स्थापनेनंतर आज प्रथमच झालेल्या एनडीएच्या
संसदीय पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी ही
माहिती दिली. एनडीएच्या सर्व घटकपक्षांचे खासदार या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, संसदेच्या दोन्ही
सदनात आजही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू आहे.
****
दरम्यान, लोकसभेचे विरोधी
पक्षनेते राहुल गांधी यांनी काल लोकसभेत केलेल्या वक्तव्यावरून विधान परिषदेत आजही
गदारोळ झाला. या मुद्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी गैरव्यवहार झाल्याचा
दावा विरोधी पक्षांनी केला, तर अंबादास दानवे यांच्या आक्षेपार्ह विधानाबद्दल त्यांचं निलंबन
करण्याची मागणी भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी केली. त्यावर, ‘सर्व घटनेचं ध्वनिचित्रमुद्रण
बघून योग्य ती कारवाई करू’, असं आश्वासन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिलं. मात्र, तरीही गदारोळ न
थांबल्याने उपसभापतींनी सभागृहाचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतरही गदारोळ
न थांबल्यानं दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब केलं.
दानवे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यासह प्रवीण दरेकर, आशिष शेलार आदी
सदस्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.
विरोधकांनीही त्याला घोषणाबाजीने उत्तर दिलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय
वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना, राहुल गांधी यांचं ते विधान फक्त भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाबाबत असल्याचं सांगत, त्या विधानाचं समर्थन केलं. तसंच, लोकसभेतल्या वक्तव्यांचा विधिमंडळाच्या कामकाजाशी
काहीही संबंध नसताना आणि बाहेरचे विषय सभागृहात न मांडण्याचा नियम असून, हा मुद्दा आज सभागृहात
लावून धरणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
महाडच्या चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी ६५ कोटीं रुपयांच्या प्रस्तावाला १५ दिवसात
उच्चस्तरीय समितीकडून मंजुरी देऊन, काम सुरू करू असं आश्वासन उदय सामंत यांनी दिलं आहे. ते आज विधानसभेत
प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते.
नागपूर इथं दीक्षाभूमी परिसरातल्या वाहनतळ प्रश्नी तोडगा काढण्यासाठी विधानसभा
अध्यक्षांनी समिती पाठवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत
केली. काँग्रेसचे नितीन राऊत यांनीही यासंदर्भात समिती स्थापन करण्याची मागणी केली.
यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.
इंदू मिल इथलं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आणि चवदार तळे सुशोभीकरणाचं
काम लवकर पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्याची सूचना वडेट्टीवार यांनी केली.
****
जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटीमध्ये ड्रोन द्वारे सर्वेक्षण सुरू असल्याचा आरोप
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केला. मराठा आंदोलक मनोज जरांगे
पाटील यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी त्यांनी केली. मंत्री शंभूराज देसाई यांनी, या प्रकरणाची चौकशी
करण्याचं आश्वासन देत, जरांगे यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन सुधारणा केली जाईल, असं सांगितलं
****
नवव्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विश्वविजेता ठरल्याबद्दल विधानसभेत भारतीय
क्रिकेट संघाचे अभिनंदन करण्यात आले. संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या
तसेच सुर्यकुमार यादवसह संघातील सर्वच खेळाडूंचे अभिनंदन करत विधानसभेने सर्वानुमते
अभिनंदनपर प्रस्ताव संमत केला.
****
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत आणि अमित गोरखे यांनी आज अर्ज भरले.
योगेश टिळेकर थोड्याच वेळात अर्ज भरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर
आणि शिवाजीराव गर्जे यांनीही आज अर्ज भरला. विधानसभा सदस्यांमधून ११ सदस्य विधान परिषदेवर
निवडून जाणार आहेत, अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस आहे.
****
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे किशोर दराडे २६ हजार ४७६ मतं मिळवून
विजयी झाले. आज सकाळी हा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत दोन जागांवर महायुती, तर दोन जागांवर
महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज पुण्यातून मार्गस्थ
झाल्या. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज दिवे घाट पार करून सासवड इथं मुक्कामी
थांबेल, तर संत तुकाराम
महाराज यांच्या पालखीचा दुपारचा विसावा हडपसर इथं तर रात्रीचा मुक्काम लोणी काळभोर
इथं होणार आहे
****
No comments:
Post a Comment