आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०२ जूलै २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे किशोर दराडे २६ हजार ४७६ मतं मिळवून विजयी झाले. आज सकाळी हा निकाल जाहीर झाला. विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत दोन जागांवर महायुती, तर दोन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले.
****
संसदेच्या पावसाळी अधिवेनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर दोन्ही सदनात आजही चर्चा सुरु राहील. ठरावावरच्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत उत्तर देतील.
****
राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेत सुधारणांसाठी सरकारनं विद्यार्थी आणि पालकांकडून सूचना आणि प्रतिक्रिया मागवल्या आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं समाजमाध्यमांवरच्या संदेशात याबाबत माहिती दिली. या महिन्याच्या सात तारखेपर्यंत परीक्षेच्या प्रक्रियेत सुधारणा, डेटा सुरक्षेबाबतचे नियम, परीक्षा यंत्रणेची कार्यपद्धती या गोष्टींवर विद्यार्थी आणि पालक त्यांची मतं व्यक्त करू शकतात, असं त्यात नमूद करण्यात आलं आहे.
****
केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ चे निकाल काल जाहीर केले. जे उमेदवार पात्र ठरले आहेत त्यांना मुख्य परीक्षेसाठी पुन्हा एकदा तपशीलवार अर्ज करावे लागणार आहेत.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या आज पुण्यातून मार्गस्थ झाल्या. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज दिवे घाट पार करून सासवड इथं मुक्कामी थांबेल, तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा विसावा दुपारी हडपसर इथं होणार असून लोणी काळभोर इथं मुक्काम होणार आहे.
****
पर्यटनासाठी गेलेले दोन तरुण काल कोल्हापुरमधल्या दुधगंगा नदीच्या पात्रात बुडाले. हे दोघे कर्नाटक मधल्या निपाणीचे असून, त्यापैकी एकजण डोहात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी गेलेला दूसरा तरूणही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. या दोघांचा शोध सुरू आहे.
****
विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या सुमित नागलचा पहिल्या फेरीत पराभव झाला. सर्बियाच्या मिओमिर केकमानोविक यानं सुमितचा दोन - सहा, सहा - तीन, तीन - सहा, चार - सहा असा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment