Wednesday, 3 July 2024

TEXT-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.07.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 July 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      राष्ट्रपती अभिभाषणावरचा धन्यवाद प्रस्ताव राज्यसभेत मंजूर-कामकाज संस्थगित.

·      माझी लाडकी बहीण योजनेत अडवणूक केल्यास कठोर कारवाईची मुख्यमंत्र्यांची सूचना.

·      परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यासाठी राज्यसरकार याच अधिवेशनात कायदा आणणार.

·      झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी.

आणि

·      नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला नांदेड जिल्ह्यातल्या किनवट इथे सुरुवात.

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेचं कामकाज आज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज कालच संस्थगित झालं, त्यामुळे संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं आहे. तत्पूर्वी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावर राज्यसभेत झालेल्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर दिलं. भारताची राज्यघटना ही प्रत्येक सरकारसाठी दीपस्तंभासारखीच मार्गदर्शक असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच आपल्यासारखा राजकीय वारसा नसलेल्या व्यक्तीला राजकारणात येण्याची आणि इतक्या मोठ्या पदावर पोहचण्याची संधी मिळाली, असंही ते म्हणाले.

दरम्यान, विरोधकांनी पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान घोषणा देत सभात्याग केला. सभापती जगदीप धनखड यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, देशाचं संविधान हे फक्त हातात ठेवण्यापुरतं नसून, ते जीवनात आत्मसात करण्याची गरज असल्याचं नमूद केलं. विरोधकांनी आत्मचिंतन करावं आणि आपल्या कर्तव्याचं पालन करावं, असा सल्लाही सभापतींनी दिला.

विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सदनाबाहेर पत्रकारांशी बोलतांना, पंतप्रधानांच्या काही विधानांवर आपल्याला बोलण्याची संधी न दिल्यानं, आपण सभात्याग केल्याचं सांगितलं.

तत्पूर्वी, राज्यसभेचं आजचं कामकाज सुरू झाल्यानंतर, उत्तर प्रदेशातल्या हाथरस इथं झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

****

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीणयोजनेच्या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची कोणतीही अडवणूक केल्यास, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाईच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावं, तसंच प्रत्येक जिल्ह्यात सुकाणू अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

या योजनेत नोंदणीसाठी अधिवास प्रमाणपत्राऐवजी पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र किंवा जन्माचा दाखला ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे अतिरिक्त कागदपत्रांकरता महिलांनी सेतुसुविधा केंद्रात गर्दी करू नये, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.

माझी आपणा सर्व माताभगिनींना विनंती आहे, की आपण कुठल्याही सेतू केंद्रावर किंवा तहसील कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. आता उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी दाखलासुद्‌धा काढण्याची आपल्याला आवश्यकता नाही. या योजनेसाठी रहिवासी दाखल्याऐवजी आपल्याकडे असलेलं ओळखपत्र, आपल्याकडे असलेला शाळेचा दाखला, जन्माचा दाखला यासाठी सुद्‌धा आपल्याला वापर करता येणार आहे. त्याचबरोबर ज्या महिलांकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड आहेत, त्यांना उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही. त्यामुळे कृपा करून आपण गर्दी करू नका.

****

परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यासाठी परीक्षेतल्या गैरप्रकारांच्याविरोधात कायदा करण्याचं सुतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज विधान परिषदेत बोलतांना फडणवीस यांनी, याच अधिवेशनात याबाबतचं विधेयक सदनात सादर होईल, असं सांगितलं. आपल्या सरकारनं दोन वर्षाच्या कार्यकाळात एक लाख लोकांना सरकारी नोकरी देण्याचा विक्रम केला आहे, यापैकी ७७ हजार ३०५ युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला असून, पुढच्या तीन महिन्यात सुमारे ३० हजारावर नोकऱ्यांची नियुक्तीपत्रं दिली जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्य सरकारने ७० लाख उमेदवारांची पारदर्शकपणे परीक्षा घेतली असून, पोलिस भरतीतही सुमारे ४० हजार पदं भरण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

****

गावठाण विस्तार, शासकीय घरकुल योजना, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा यासारख्या कोणत्याही सार्वजनिक कामांकरता विनामूल्य जमिनी मिळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेती विकास महामंडळाकडे तातडीने प्रस्ताव दाखल करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. शेती विकास महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

****

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ते बोलत होते.

****

मराठा समाजाला कायद्यात टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य शासन युध्दपातळीवर प्रयत्न करत असल्याचं, मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे. ते आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते.

****

विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांना आपल्या निलंबनाबाबत फेरविचार करावा अशी विनंती एका पत्राद्वारे केली आहे. या निलंबनासंदर्भात फेरविचाराचा निर्णय अद्याप विचाराधीन असल्याचं, उपसभापतींनी सभागृहात सांगितलं. दरम्यान, राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभाराचा प्रस्ताव विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आला.

****

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतलेल्या इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या याद्या परिषदेच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

****

महाराष्ट्रात आढळलेल्या झिका विषाणूच्या काही प्रकरणांनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सगळ्या राज्यांसाठी याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. सगळ्या राज्यांनी याबाबत सतत दक्ष राहावं आणि आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवाव्यात, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

राज्य सरकारनं झिका विषाणू संसर्गाबाबतची सद्यस्थिती एका पत्रकाद्वारे जाहीर केली आहे. राज्यात यावर्षी आतापर्यंत या संसर्गाचे आठ ते दहा रुग्ण आढळून आल्याचं यात म्हटलं आहे. हा विषाणू डासामार्फत पसरत असल्यानं नागरिकांनी, काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, पुणे शहरात झिका विषाणूचा संसर्ग झालेला सातवा रुग्ण आढळल्याचं वृत्त आहे. यापूर्वी एरंडवणे भागातल्या चार आणि मुंढवा परिसरातल्या दोन रुग्णांना झिकाचं निदान झालं आहे. या सात रुग्णांमध्ये पाच महिला असून त्यापैकी दोघी गर्भवती आहेत.

****

नीती आयोगाच्या आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत संपूर्णता अभियानाला आज नांदेड जिल्ह्यातल्या किनवट इथं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते सुरुवात झाली. आकांक्षी तालुका कार्यक्रमांतर्गत सर्व निकष ऑगस्टअखेर पूर्ण केले जातील, असं राऊत यांनी यावेळी सांगितलं.

जुलै ते सप्टेंबर या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत गरोदर मातांची तपासणी, उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी, गरोदर मातांना पूरक पोषण आहार, मृदा आरोग्य पत्रिका आणि स्वयंसहाय्यता समूहांना खेळते भांडवल हे सहा निर्देशांक १०० टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या अभियानात महत्त्वपूर्ण क्षेत्रातल्या एकूण चाळीस निर्देशकांचा समावेश आहे.

धाराशिव जिल्ह्यातही जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात संपूर्णता अभियान राबवलं जाणार आहे. या अभियानाचं उद्या परंडा इथे उद्घाटन होणार आहे. मराठवाड्यात बीड जिल्ह्यात वडवणी, जालना जिल्ह्यात बदनापूर तसंच परतूर आणि हिंगोली इथंही या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

****

संत मुक्ताबाईच्या पालखीचं आज बीड शहरात आगमन झालं. शहरात माळीवेस इथल्या हनुमान मंदिरात मुक्ताईच्या पादुका दर्शनासाठी ठेवल्या आहेत.

अमळनेर इथल्या संत सखाराम महाराज यांची पालखी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दौलताबाद इथे मुक्कामी येत आहे, उद्या ही पालखी वाळूजला पोहोचणार आहे.

****

No comments: