Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 22 September 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २२ सप्टेंबर २०२४
सायंकाळी ६.१०
****
· कर्करोग मूनशॉट उपक्रमासाठी साडेसात दशलक्ष डॉलर आणि ४० दशलक्ष लस मात्रा देण्याची
पंतप्रधानांची घोषणा
· समाजामध्ये व्यावहारिक आंबेडकरवाद रुजवायचा असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले
यांचं प्रतिपादन, नागपूरच्या मारवाडी फाउंडेशनचा भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार प्रदान
· स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत नांदेडमध्ये गोदावरी नदी स्वच्छता मोहिम
· मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनात सकल मराठा समाजाच्या बंदला जालना आणि
परभणी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद
आणि
· चेन्नई कसोटीत भारताचा बांग्लादेशवर २८० धावांनी विजय, मालिकेत
एक - शून्य अशी आघाडी
****
लस निर्मिती आणि लसीकरणासाठी जागतिक आघाडी आणि क्वाड उपक्रमाअंतर्गत
कर्करोग मूनशॉट उपक्रमामध्ये भारत, साडेसात दशलक्ष डॉलर्सचं, आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी ४० दशलक्ष लस मात्रांचं योगदान
देईल,
अशी घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
केली आहे. क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या डेलावेर मध्ये आयोजित
कर्करोग मूनशॉट उपक्रमाला संबोधित करताना ते आज बोलत होते. सहज उपलब्ध होऊ शकेल अशी
आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याबद्दल क्वाड समुह देशांचा सामायिक निर्धार अशा
उपक्रमातून प्रतिबिंबित होत असल्याचं ते यावेळी म्हणाले. या उपक्रमासाठी भारत आपला
अनुभव आणि कौशल्य परस्परांसोबत सामायिक करायला इच्छुक आहे असं म्हणत, या उपक्रमाकरता रोग निदान संच देण्याची घोषणाही पंतप्रधानांनी यावेळी केली.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी
आज वर्षावास या पवित्र महिन्यानिमित्त भंतेजींसाठी चिवरदान, धम्मदान आणि भोजनदान कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी भिख्कू महासंघांचे
राज्यभरातून भंतेजी आले होते. प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांना अभिवादन करुन, सामूहिक प्रार्थना झाली. अखिल
भारतीय भिख्कू महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्ता महाथेरो यावेळी उपस्थित
होते.
****
पुण्यातल्या एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या मुलीनं अतिरीक्त
कामाच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं
स्वतःहून दखल घेतली आहे. याप्रकरणी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने तपास करून चार आठवड्यात
अहवाल द्यावा,
अशी सूचना आयोगानं केली आहे. पीडित मुलगी केरळची रहिवासी असून, ती कंपनीत चार्टड अकाऊंट म्हणून कार्यरत होती. या घटनेवर मानवाधिकार आयोगानं चिंता
व्यक्त करत खासगी कंपन्यांमध्ये जागतिक मानवी हक्क अधिकारांचं योग्य पद्धतीनं पालन
केलं जात आहे की नाही याचा आढावा घेण्याच्या सूचनाही मंत्रालयाला केल्या आहेत.
****
दलित पॅंथर सारख्या अन्यायाविरोधात विद्रोहाची भूमिका मांडणाऱ्या
कार्यकर्त्यांच्या-साहित्यिकांच्या चळवळीतून आपण पुढे आलो असून, आम्हाला समाजामध्ये व्यावहारिक आंबेडकरवाद रुजवायचा आहे, असं प्रतिपादन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास
आठवले यांनी केलं आहे. मारवाडी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्मृती पुरस्कार आठवले यांना आज नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते
प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. बौद्ध समाजात अनेक
गट आहेत,
त्यामुळे आपली ताकद वाढवण्यासाठी इतर जाती आणि धर्मांच्या लोकांना
आपल्याजवळ आणणं आवश्यक असल्याचं मत आठवले यांनी यावेळी व्यक्त केलं.
दलित चळवळीचं रूपांतर आर्थिक विकासाच्या चळवळीत होण्यासाठी रामदास
आठवले यांनी पुढाकार घेतला, अशा शब्दांत गडकरी यांनी त्यांची
प्रशंसा केली.
****
दरम्यान, नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना
आठवले यांनी,
राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही प्रमुख
घटक पक्षांनी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी चार जागा याप्रमाणे एकूण १२ जागा रिपब्लिकन
पार्टी ऑफ इंडिया-आठवले गटाला द्याव्यात, अशी मागणी केली आहे. विदर्भात उत्तर नागपूर, उमरेड, उमरखेड,
वाशिम अशा चार जागा मागणार असून, राज्यातल्या
एकूण अपेक्षीत जागांची यादी दोन दिवसात आपण महायुतीला देऊ, असंही
आठवले यांनी यावेळी सांगितलं.
****
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडी
म्हणून,
एकत्र लढणार असून, जागा वाटपासाठी चर्चा
सुरु असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी
सांगितलं. ते आज बारामतीत बातमीदारांशी बोलत होते. आरक्षण प्रश्नाशी संबंधित घटकांनी
सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सरकारनंही याबाबतीत विलंब न
करता लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, असं
पवार म्हणाले.
****
देशभरात राबवल्या जात असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत
छत्रपती संभाजीनगर शहरात स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत या मोहिमेत एक
पेड माँ के नाम,
स्वच्छता क्रिकेट स्पर्धा, स्वच्छता
जागृती साठी नाटक, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, घरोघरी कचरा संकलनासाठी जनजागृती कार्यक्रम, कचरा
वर्गीकरण आदी कार्यक्रम राबवण्यात आले. या अभियानाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा
देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नांदेडमध्ये देखील आज स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत गोदावरी
नदी स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. नांदेड महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे
यांनी या मोहिमेसंदर्भात अधिक माहिती दिली –
स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत
आज गोदावरी घाटाची स्वच्छता करण्याचं नियोजन होतं. यामध्ये व्हीआयटीएम कॉलेज, गुजराथी हायस्कूल, नेहरू इंग्लिश स्कूल, स्वामी समर्थ मंदिर, ज्येष्ठ नागरिक संघ या सर्व जणांनी स्वयंस्फूर्तीनं
आज सहभाग घेतलेला
आहे. अशा पद्धतीनं नांदेडचं पर्यावरण रक्षण करण्याचं काम महापालिका आणि सर्व समाजाच्या
सहयोगाने करण्यात येत आहे. हा कार्यक्रम दोन ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे. शहराच्या
विविध ठिकाणी आपण स्वच्छतेचे कार्यक्रम घेत आहोत. तरी सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संघांनी
आणि पर्यावरण प्रेमींनी या मोहिमेत सहभागी व्हावं असं मी याद्वारे आवाहन करत आहे.
****
मुंबईत वांद्रे इथं उभारण्यात येणार्या मुंबई उच्च न्यायालयाच्या
नवीन संकुलाच्या कोनशिलेचं अनावरण सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ.धनंजय वाय चंद्रचूड यांच्या
प्रमुख उपस्थितीत उद्या होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर.गवई या कार्यक्रमाला उपस्थित असतील.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी
इथं सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनात आज सकल मराठा समाजाच्या वतीने जालना आणि
परभणी जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. जालना जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़.
घनसावंगी,
अंबड, तीर्थपुरी, भोकरदन,
मंठा या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठानं बंद ठेवली़. मराठा समाजबांधवांनी पोलीस प्रशासनाला मागण्यांचं
निवेदन सादर केलं. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त
लावण्यात आला होता़.
परभणी शहर आणि श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी इथं कडकडीत बंद पाळण्यात
आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तर उद्या सोमवारी सकल मराठा समाजाच्या वतीने
लातूर जिल्हा बंदचं अवाहन करण्यात आलं आहे.
****
धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाची
अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आज धनगर समाजाच्या वतीने लातूर जिल्ह्यातल्या सत्ताधारी
आमदारांच्या घरापुढे हलगी वाजवून आंदोलन करण्यात आलं. अहमदपूर विधानसभेचे राष्ट्रवादी
काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील, उदगीर इथं क्रीडा मंत्री संजय
बनसोडे तसंच निलंगा इथं भाजप आमदार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरापुढे
हे आंदोलन करण्यात आलं. या सर्व आमदारांकडून ‘धनगड’ नामोल्लेखाला समर्थन असल्याचं पत्रही आंदोलकांनी घेतलं.
लातूरमध्ये आमरण उपोषणास बसलेल्या धनगर समाजाच्या आंदोलकांना
पाठिंबा देण्यासाठी उद्या लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात सकल धनगर समाजाच्या
वतीनं शेळ्या-मेंढ्यासह रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
****
चेन्नई इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने
बांग्लादेशवर २८० धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी बांग्लादेशचा
संघ ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आवघ्या
२३४ धावांवर सर्वबाद झाला. या डावात भारताकडून आर.अश्विननं सहा, रविंद्र जडेजानं तीन आणि जसप्रित बुमराहनं एक गडी बाद केला. शतक झळकावण्यासह सहा
बळी टीपणारा रविचंद्रन अश्विन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयाबरोबरच दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने
एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना कानपूर इथं २७ सप्टेंबरपासून खेळला
जाईल.
****
नांदेड पोलीस परीक्षेत्रातल्या नांदेड, लातूर,
परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी
पोलिसांनी अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणार्यांवर धाडी टाकून जवळपास दहा लाख रुपयांचा
मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी १०६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या
भागात सुरू असलेल्या अवैध व्यवसायाची माहिती पोलिसांना देऊन या मोहिमेत हातभार लावावा
असं आवाहन पोलीस उपमहानरीक्षक शहाजी उमाप यांनी केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातल्या आवलकोंडा इथल्या सारनाथ
बुद्ध विहाराचं भूमिपूजन आज क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते
झालं. गेल्या पाच वर्षांत उदगीर आणि जळकोट तालुक्यात जवळपास सहा ते साडेसहा हजार कोटी
रूपये निधीची विकास कामं मंजूर करून पायाभूत सुविधांच्या निर्मितीला गती दिली, तसंच उदगीर एमआयडीसीला मंजूरी मिळाल्याने स्थानिक युवकांना लवकरच रोजगारही उपलब्ध
होणार असल्याचं बनसोडे यावेळी म्हणाले.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर
प्रमोद येवले यांना फार्मसी टिचर्स असोसिएशनच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला
आहे. औषधनिर्माणशास्त्र आणि उच्च शिक्षण क्षेत्रातल्या योगदानाबद्दल दिला जाणारा हा
पुरस्कार २७ सप्टेंबर रोजी ओडिशातल्या भुवनेश्वर इंथ प्रदान केला जाणार आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषद कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीसाठी छाननीनंतर
४१ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. उद्यापासून बुधवारपर्यंत तीन दिवसात उमेदवारी अर्ज
मागे घेण्याची मुदत असून, त्यानंतर गुरुवारी अंतिम उमेदवारांची
यादी जाहीर होईल, असं निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर राम चव्हाण
यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, परिषदेचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव
ठाले पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी परिवर्तन मंचची स्थापना करण्यात आली
आहे.
****
लोहमार्ग निरीक्षणासह
दुरूस्तीसाठीच्या लाईन ब्लॉकमुळे निजामाबाद-पंढरपूर ही गाडी उद्या निजामाबाद ऐवजी मुदखेड इथून निघणार आहे.
****
No comments:
Post a Comment