Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 26 September
2024
Time: 7.10
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· पंतप्रधान आज महाराष्ट्र दौऱ्यावर; विविध विकास प्रकल्पांसह बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं राष्ट्रार्पण
· बदलापूर बाल लैंगिक अत्याचार
प्रकरणी पोलिस चकमकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून शंका व्यक्त
· आरक्षणाच्या मागणीसाठीचं मनोज
जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित, ओबीसी उपोषणकर्त्यांचंही उपोषण
मागे
आणि
· मराठवाड्यात सर्वदूर पाऊस, जायकवाडीसह तेरणा, ईसापूर आणि मांजरा धरणातून विसर्ग सुरू
सविस्तर बातम्या
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्याहस्ते देशभरातल्या २२ हजार
६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे.
पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट सेवेचा प्रारंभ, तसंच स्वारगेट -कात्रज मेट्रोची
पायाभरणी आणि
भिडे वाड्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते
होणार आहे. याशिवाय तीन परम रुद्र संगणकांचं लोकार्पण, ट्रक चालकांसाठी महामार्गालगत सर्व सोयीसुविधांनी
सुसज्ज एक हजार विश्रामगृहांचं लोकार्पण, देशभरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी पाचशे चार्जिंग स्टेशन्स
तसंच २० एलपीजी स्टेशन्स आणि सोलापूर विमानतळाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.
छत्रपती
संभाजीनगर नजिक बिडकीन औद्योगिक प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते आज राष्ट्रार्पण
होणार आहे. दिल्ली - मुंबई औद्योगिक मार्गिकेअंतर्गत सुमारे सात हजार ८५५ एकर क्षेत्रावरच्या
तीन टप्प्यातल्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं सहा हजार चारशे कोटी रुपये मंजूर
केले आहेत. शेंद्रा इथल्या ऑरिक सभागृहात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण पाहण्याची व्यवस्था
करण्यात आली असल्याचं, प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे यांनी सांगितलं.
****
बदलापूर
बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूच्या घटनेला चकमक
मानणं शक्य नसल्याचं निरीक्षण, मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. न्यायमूर्ती रेवती
मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या पीठानं काल झालेल्या सुनावणीत
हे मत व्यक्त केलं. या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी अपेक्षित आहे, तशी ती होत नसल्याचं दिसलं, तर आम्हाला आदेश काढावा
लागेल, असंही
न्यायालयानं म्हटलं आहे.
****
मराठा
समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं
गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांनी काल उपोषण स्थगित केलं.
आता उपोषण करून नाही तर सत्तेत बसून आरक्षण मिळवू, असं जरांगे यांनी यावेळी म्हटल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
दरम्यान, मराठा समाजाच्या आंदोलनाला
पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात डोंगरगाव पूल इथं नागरिकांनी काल कयाधू नदीपात्रात
उतरून आंदोलन केलं.
दरम्यान, ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण
हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं देखील आमरण उपोषण काल स्थगित झालं. जालना इथल्या खासगी
रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या शेतकरी आणि महिला बचत गटांसाठी प्रत्येक तालुक्यात सुक्ष्म प्रक्रिया
उद्योग उभारला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी
ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या प्रमुख पिकांच्या कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर
करून पीक मूल्य साखळी विकसित करणं, हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातून
सोळा बचतगटांची निवड करण्यात आली असून, या बचतगटांनी प्रक्रिया उद्योग उभारणी केल्यानंतर त्यांना
तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे.
****
प्रधानमंत्री
जनजातीय उन्नत ग्राम अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातल्या चार हजार नऊशे शहात्तर आदिवासी
गावांचा कायापालट होणार असून, राज्यातल्या बत्तीस जिल्ह्यांमधल्या सुमारे तेरा लाख आदिवासींचं
सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण होणार आहे. यात हिंगोली जिल्ह्यातल्या एक्क्याऐंशी तर
नांदेड जिल्ह्यातल्या एकशे एकोणसत्तर गावांचा समावेश आहे.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन
देत आहोत
****
राज्यातल्या
अनेक भागात पाऊस सुरु असून, जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा
विसर्ग केला जात आहे.
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. काल
रात्री धरणाचे आठ दरवाजे अर्ध्या फूटावारुन एक फूट, तर दोन दरवाजे दीड फूट उंचीवर उघडून एकूण १८ दरवाजातून
२८ हजार २९६ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या
गावातल्या नागरीकांनी सावध राहण्याचं आवाहन जलसंपदा विभागाने केलं आहे.
****
लातूर
आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा धरणाच्या १४ वक्र दरवाज्यातून
दहा हजार ७०४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे, तेरणा नदी काठावरील नागरीकांनी
खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. या भागात संभाव्य
पूर परिस्थिती लक्षात घेवून खबरदारीच्या उपाययोजना तातडीने सुरू करण्याच्या सूचना त्यांनी
दिल्या. लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी काल मांजरा नदीवरच्या नागझरी
बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली, तसंच उपाययोजनांचा आढावा घेतला.
****
हिंगोली
जिल्ह्यातल्या इसापूर धरणाचे तीन वक्र दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात एक हजार ३५
घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे.
****
बीड
जिल्ह्यातल्या मांजरा धरणही पंचाण्णव टक्क्यांहून जास्त भरल्यामुळे नदीपात्रात विसर्ग
सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मांजरा नदी काठावरच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क
राहावं, असं
आवाहन प्रकल्प पूर नियंत्रण कक्षानं केलं आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यांसाठी हवामान
विभागानं आज यलो अलर्ट जारी केला आहे.
****
जम्मू
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दीपक बनसोडे या सैनिकाला वीरमरण आलं.
ते बुलडाणा जिल्ह्यातल्या पळसखेड नागो या गावचे रहिवासी होते. त्यांच्या पार्थिव देहावर
त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
ज्येष्ठ
चित्रपट निर्मात्या मधुरा जसराज यांचं काल मुंबईत राहत्या घरी निधन झालं, त्या ८६ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मधुरा या प्रसिद्ध चित्रपट
निर्माते व्ही शांताराम यांच्या कन्या तर दिवंगत शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या
पत्नी होत.
****
जुनी
पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर काल
शिक्षकांनी मोर्चा काढला. जिल्हा परिषदेसह विविध खाजगी शिक्षण संस्थांतील शिक्षक या
मोर्चात सहभागी झाले होते. शिक्षक संघटनांकडून निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना
विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.
****
“स्वछता ही सेवा” पंधरवड्या
निमित्त हिंगोली नगरपालिका कार्यालयात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत
काल रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. ३२ स्पर्धकांनी यात सहभाग घेत, स्वच्छता ही सेवा, प्लास्टिक मुक्त हिंगोली
शहर, स्वच्छ
सुंदर आणि हरित हिंगोली, ईत्यादी विषयांवर रांगोळ्या काढल्या.
****
मराठवाड्यातल्या
आठही जिल्ह्यातल्या माजी सैनिक, वीरनारी, वीरपिता, वीरमाता आणि वयोवृद्ध सैनिकांकरता उद्या सत्तावीस तारखेला
छत्रपती संभाजीनगर इथं मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment