Friday, 27 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.02.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 27 February 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ फेब्रुवारी २०२ सकाळी.०० वाजता

****

मराठी भाषा गौरव दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात "जावे विनोदाच्या गावा" या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित "लोकसेवेचा लोकजागर" या ग्रंथाचं प्रकाशनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

****

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनीही या दिना'निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी भाषा ही धर्म, संप्रदाय आणि जातीच्या पलीकडे जाऊन लोकांना जोडणारी भाषा आहे, असे त्यांनी आपल्या सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. गोयल यांनी ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केलं आणि मराठी भाषेतील त्यांच्या अमूल्य योगदानाचे स्मरण केलं.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने, मराठी भाषा गौरव दिनापासून आंतरराष्ट्रीय महिला दिन -आठ मार्चपर्यंत महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या सप्ताहात निबंध, चित्रकला, रांगोळी यासारख्या स्पर्धा तसंच कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

*****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिक चंद्रशेखर आझाद यांना त्यांच्या हुतात्मा दिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण केली. चंद्रशेखर आझाद यांचे जीवन कार्य आपल्याला अन्यायाविरुद्ध खंबीरपणे उभे राहण्याचे शौर्य शिकवते अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राष्ट्र त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचे नेहमीच ऋणी राहील अशा शब्दात चंद्रशेखर आझाद यांना आदरांजली वाहीली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चंद्रशेखर आझाद यांना आदरांजली वाहीली आहे.

****

राज्यात होणाऱ्या औद्योगिक गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर, सुरू असलेले ऊर्जा प्रकल्प निर्धारित वेळेपेक्षा आधी पूर्ण व्हावेत, यासाठी महापारेषणशी संबंधित प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महापारेषणच्या सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा काल मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. सध्या राज्यात ३७ हजार ६८२ मेगावॅट वीज उपलब्ध असून, २०३५ पर्यंत ही गरज वाढून ८० हजार १९७ मेगावॅटपर्यंत पोहोचण्याचा अंदाज मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

****

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि जिल्ह्यातील आठ पंचायत समितीच्या सभापती निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जाहीर केला आहे. आठ पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती पदांची निवड सहा मार्च रोजी तर जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड १३ मार्चला होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे विभागीय क्रीडा संकुल इथं आजपासून क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. माजी हॉकीपटू पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घघाटन होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं पाच मार्च पासून सुरू होणाऱ्या नाथषष्ठी यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी भाविकांना स्वच्छता, सुरक्षा आणि सेवा देण्यासाठी प्रशासनानं सज्ज राहावं तसंच गावाबाहेर तात्पुरते बसस्थानक सुविधा आणि वाहतूक मार्गातील बदल याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

****

गंभीर आणि खर्चिक आजारांच्या उपचारांसाठी केंद्र शासनाची एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना गरीब आणि सामान्यांना मोठा दिलासा देत आहे. प्रतिवर्ष ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यात आयुष्मान कार्डाचे वितरण वेगाने सुरू असून, आतापर्यंत ८ लाख ८३ हजार ४४२ लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे.  जिल्ह्याला एकूण १७ लाख ३३ हजार १६ आयुष्मान कार्डाचे उद्दिष्ट देण्यात आले, त्यापैकी निम्म्याहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

उन्हाळी हंगामात भंडारा जिल्ह्यात दरवर्षी नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वणवाच्या घटना घडतात. या आपत्ती प्रतिबंधाबाबत जिल्ह्यातील कोका अभ्यारण्यात वणवा प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत वनपाल, वनरक्षक वनमजूर यांना आपत्ती निवारण व संभाव्य घटना रोखण्यासाठी उपायाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं.

****

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इयत्ता आठवीच्या एनसीईआरटीपाठ्यपुस्तकात न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा धडा समाविष्ट केल्याबद्दल तीव्र खेद व्यक्त केला आहे. हे प्रकरण अत्यंत दुर्दैवी असून, सरकारने ही सर्व पुस्तके तातडीने मागे घेण्याचे आणि रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी शिक्षण सचिवांना चौकशीचे आदेश देण्यात आले असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे प्रधान यांनी सांगितलं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 May 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...