Saturday, 21 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.03.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 21 March 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ मार्च २०२ सकाळी.०० वाजता

****

आज देशभर 'ईद-उल-फित्र'चा सण उत्साहात साजरा होत आहे. या निमित्तानं राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. “हा सण आत्मसंयम, सेवा, परोपकार आणि वंचितांप्रती दयाभाव जोपासण्याची शिकवण देतो.” असं मुर्मू यांनी सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘ईद’च्या औचित्यानं सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. “परस्परातील बंधुभाव आणि दयेची भावना या सणाच्या निमित्तानं दृढ होवो, सर्वांना सुख, चांगलं आरोग्य आणि समृद्धी मिळो.” अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह सिल्लोड इथं ‘ईद-उल-फित्र’ उत्साहात साजरी होत आहे. ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण; देश-विदेशात शांतता, सलोखा आणि बंधुभाव वृद्धिंगत व्हावा, यासाठी नमाज अदा करण्यात आली.

****

येत्या एक एप्रिलपासून लागू होणाऱ्या नवीन प्राप्तीकर कायद्यामुळे त्रुटी, वाद आणि

अनुपालन खर्च कमी राहील, असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी काल व्यक्त केला. नवी दिल्ली इथं या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित ‘प्रारंभ’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यात अनुमानित कर आकारणी योजना अधिक बळकट करण्यात आली आहे. या कायद्यातील प्रत्येक कलमाची नव्यानं शब्दरचना करण्यात आली आहे, तक्ते आणि सूत्रांद्वारे स्पष्टीकरणं देण्यात आलं आहे. त्यासाठी प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी ७५ हजार मानवी तास खर्च केले आहेत, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.

****

"केंद्र सरकारने 'आयकर नियम २०२६' अधिसूचित केले असून, येत्या १ एप्रिलपासून त्यांची अंमलबजावणी सुरू होईल. कर प्रक्रिया सुलभ करणे आणि पारदर्शकता वाढवणे हा या नव्या नियमांचा मुख्य उद्देश आहे.

नव्या नियमांनुसार, कंपन्यांना आता लाभांश वाटप केवळ देशांतर्गतच करावे लागेल. तसेच, शेअर बाजारासाठी सात वर्षांपर्यंतचा लेखापरीक्षण मागोवा सुरक्षित ठेवणे आणि व्यवहारांचा मासिक अहवाल सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

अनिवासी भारतीयांच्या उत्पन्नाचे मूल्यांकन करण्यासाठी कर प्राधिकरणांना विशेष अधिकार देण्यात आले असून, झिरो कूपन बाँड्स आणि सीमापार पुनर्रचना यांसारख्या जटिल बाबींसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. या बदलांमुळे देशातील कर प्रणालीचे डिजिटलीकरण आणि मानकीकरण अधिक मजबूत होणार आहे."

****

आर्थिक वर्ष संपत असल्याने आणि नववर्षानिमित्त नागरिकांमध्ये मालमत्ता खरेदीचा कल वाढत असल्यामुळे दस्त नोंदणीचं प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन दुय्यम निबंधक कार्यालयं काही सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी खुली राहणार आहेत.

येणारा गुरुवार २६ मार्च, शनिवार २८ मार्च, रविवार २९ मार्च आणि ३१ मार्च या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये कार्यरत राहतील तसंच, ज्या कार्यालयांची साप्ताहिक सुट्टी शनिवार आणि रविवार वगळता अन्य दिवशी असते, ती कार्यालयं देखील त्यांच्या दोन साप्ताहिक सुट्ट्यांपैकी एक दिवस चालू राहणार आहेत.

****

राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि इंग्लंडच्या बाल गुंतवणूक निधी संस्था - सीआयएफएफ’ यांच्यात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. हा उपक्रम राज्यात माता आणि बाल आरोग्य, पोषण, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि रोग नियंत्रण यांसारख्या विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीस बळकटी देईल. या कराराच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, संवाद माध्यमं आणि समुदाय सहभाग यांचा वापर केला जाणार आहे तसंच कुपोषण, स्वच्छता, लसीकरण आणि आरोग्यदायी सवयी याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

****

इचलकरंजीच्या श्री शिष्य संवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे, पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी तसंच छत्रपती संभाजीनगर इथले उद्योजक विवेक देशपांडे यांना श्रीमंत अनुबाई घोरपडे सरकार पुरस्काराने आज संध्याकाळी इचलकरंजी इथं सन्मानित करण्यात येणार आहे. खासदार मेधा कुलकर्णी यांच्या पुण्यातील राजकीय तसंच सामाजिक योगदानाबद्दल तर उद्योजक विवेक देशपांडे यांच्या सामाजिक, राजकीय तसंच औद्योगिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

****

हवामान -

दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी विजा, जोराचे वारे यांच्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भातही असंच हवामान राहण्याचा अंदाज आहे.

****

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या ‘ऑरलियन्स मास्टर्स’ बॅडमिंटन स्पर्धेत आज महिला एकेरीत भारताची तन्वी शर्मा हिचा सामना जपानच्या नोझोमी ओकुहाराशी तर दुसऱ्या उपांत्य फेरीत ईशरानी बरुआ हिचा थायलंडच्या पिचामोन ओपटनीपुथशी सामना होणार आहे. 

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 May 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...