Friday, 28 April 2017

AIR News Bulletin, Aurangabad 28.04.2017....17.25

Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.04.2017....17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 28 April 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ एप्रिल २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

राज्यातल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

औरंगाबादचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची मुंबई शहर वाहतूक सह आयुक्तपदी तर मिलिंद भारंबे यांची औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. तर औरंगाबाद शहर पोलिस उपायुक्तपदी उस्मानाबादच्या अपर पोलिस अधिक्षक दिपाली दाटे यांची नियुक्ती झाली आहे.  

बीड जिल्ह्यातल्या आंबाजोगाईचे अप्पर पोलिस अधिक्षक दीक्षित कुमार अशोक गेडाम यांची सिंधुदुर्गचे पोलिस अधिक्षक बदली झाली असून, त्यांच्या जागी दौंडच्या राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक सातचे समादेशक अजित बोराडे यांची नियुक्ती झाली आहे. माजलगावचे सहाय्यक पोलिस अधिक्षक डॉ. हरी बालाजी एन यांची गडचिरोलीचे अप्पर पोलिस अधिक्षक म्हणून बदली झाली आहे. 

 नांदेडचे अप्पर पोलिस अधिक्षक संदीप डोईफोडे यांची बुलढाणा अपर पोलिस अधिक्षक म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागी नागपूरच्या कामठीचे सहाय्यक पोलिस अधिक्षक मंगेश शिंदे यांची नियुक्ती झाली आहे.

जालन्याचे पोलिस अधिक्षक म्हणून पुण्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधिक्षक रामनाथ पोकळे यांची नियुक्ती झाली, तर सध्याच्या पोलिस अधिक्षक ज्योती सिंह यांची पुणे शहर पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. तर, अपर पोलिस अधिक्षक राहुल माकणीकर यांची नागपूरच्या पोलिस उपायुक्त पदी बदली झाली आहे. 

****

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे नवे महासंचालक म्हणून ज्येष्ठ पोलीस अधिकारी आर.आर. भटनागर यांनी आज पदभार स्वीकारला. पूर्वीचे महासंचालक के. दूर्गाप्रसाद या २८ फेब्रुवारीला निवृत्त झाल्यानंतर सुमारे दोन महिने हे पद रिक्त होतं.

****

      कर्जदारांसाठीच्या जोखीम व्यवस्थापन योजनेत एकसंधता आणण्यासाठी मुख्य जोखीम अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या आणि कार्यकाळ निश्चित करण्याची सूचना रिझर्व्ह बँकेनं केली आहे. प्रत्येक बँकेची यासंदर्भातली धोरणं वेगवेगळी आहेत. परंतु कर्जाची परतफेड प्रक्रिया आणि कर्जाच्या जोखमी व्यवस्थापनाविषयी सर्व बँकांचं समान धोरण असावं असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.

****

अक्षय तृतीया, महात्मा बसवेश्वर जयंती आणि परशुराम जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत सह्याद्री अतिथी गृह इथं महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी, तर औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त प्रल्हाद कचरे यांनी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

लातूर इथं यानिमित्त मोटर सायलर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. परशुराम जयंतीनिमित्त औरंगाबाद शहरात मिरवणुक काढण्यात येत आहे. 

****

नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून अरुण डोंगरे यांनी आज पदभार स्वीकारला. कार्यालयातल्या कर्मचार्यांनी त्यांचं स्वागत केलं. लोकाभिमुख प्रशासनाद्वारे जिल्ह्याचा विकास करण्यावर भर देणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या येरमाळा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र मोताळे यांच्यावर २०१२ मध्ये झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी आरोपीस १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. उस्मानाबाद इथल्या दुसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावली. मोक्का प्रकरणातील आरोपी पोपट पवार याला अटक करण्यासाठी मोताळे त्यांच्या घरी गेले असता त्यांच्यावर आरोपीनं हा हल्ला केला होता.

****





औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांनी परफॉर्मन्स कार्ड तयार केलं आहे. वाढलेली पटसंख्या, डिजिटायझेशन आणि गुणवत्ता ही कार्डमधली माहिती नवीन प्रवेशासाठी फायदेशीर ठरणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आर्दड आणि शिक्षणाधिकारी एम के देशमुख यांच्या संकल्पनेतून आगामी शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद शाळांचीपटसंख्या वाढावी यासाठी झेडपी शाळांचा सकारात्मक आलेख दर्शवण्यासाठी एक बुकलेट तयार करण्यात येणार आहे. 

****

दिल्ली निवडणुकांत नविन चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे आपल्याला घवघवीत यश संपादन करता आलं. तसंच हा पॅटर्न आगामी निवडणुकात वापणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांनी दिली. औरंगाबाद इथं ते आज वार्ताहर परिषदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जात,पात, धर्म यांचा विचार न करता विकासाभिमुख राजकारण केलं असल्याचंही ते यावेळी म्हणाले. या वार्ताहर परिषदेला महापौर बापू घडामोडे, डॉक्टर भागवत कराड, माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

****

जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रातल्या वरच्या भागातल्या धरणांची क्षमता जास्त असल्यानं जायकवाडी धरणाचं सिंचन क्षेत्र सव्वा लाख हेक्टरनं कमी झालं आहे. त्यामुळे वैतरणेचं जादा पाणी गोदावरीत सोडावं अशी मागणी जलतज्ज्ञ शंकरराव नागरे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय स्तरावर चर्चा करण्यात येत असून, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी या मागणीच्या संदर्भात जलतज्ज्ञांची भेट घेवून चर्चा केली.

//*******//

Audio - AIR News Bulletin, Aurangabad 28.04.2017....01.00

Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.04.2017....01.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 April 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ एप्रिल २०१७ दुपारी १.००वा.

****

राज्य पोलिस सेवेतल्या तसंच भारतीय पोलिस सेवेतल्या पोलिस अधीक्षक पोलिस उपायक्तांची बदली करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला.

औरंगाबाद शहराचे पोलिस उपायुक्त वसंत परदेशी यांची ठाणे शहर पोलिस उपायुक्त म्हणून, तर संदीप आटोळे यांची गोंदियाच्या अपर पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक एन डी रेड्डी यांची मुंबई शहराचे पोलिस उपायुक्त म्हणून, तर पैठणचे सहाय्यक पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांची जळगावच्या अपर पोलिस अधिक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

परभणी पोलिस अधीक्षक नियती ठाकुर यांची चंद्रपूरच्या पोलिस अधीक्षकपदी बदली झाली असून, नागपूरच्या पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य दिलीप झळगे यांची परभणीच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

नांदेडचे पोलिस अधीक्षक म्हणून अकोल्याचे पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांची नियुक्ती करण्यात आली असून, सध्याचे अधीक्षक संजय येनपुरे यांची मुंबईचे शहर पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे.

हिंगोलीचे पोलिस अधीक्षक म्हणून पुणे शहराचे पोलिस उपायुक्त बस्वराज तेली यांची नियुक्ती झाली असून, सध्याचे पोलिस अधीक्षक अशोक मोराळे यांची पुणे शहर पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. 

लातूरच्या अप्पर पोलिस अधीक्षकपदी यवतमाळचे अपर पोलिस अधीक्षक काकासाहेब डोळे यांची नियुक्ती झाली असून, सध्याच्या अपर पोलिस अधीक्षक लता फड यांची जालन्याच्या अपर पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे.

****

२००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातले आरोपी कर्नल श्रीकांत पुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणातल्या मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला, मात्र कर्नल पुरोहीत यांना जामीन मंजूर न केल्यानं त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

****

हेरगिरीच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या सैन्य न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कुलभूषण जाधव यांचं आरोग्य प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी भारतानं पाकिस्तानकडे केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी नवी दिल्ली इथं ही माहिती दिली.

दरम्यान, जाधवांवर चालवलेला खटला विशिष्ठ पुराव्यांच्या आधारे, अतिशय पारदर्शकपणे चालवण्यात आला असल्याचं पाकिस्ताननं स्पष्ट केलं.

****

२०२५ पर्यंत देशात क्षयरोगाचं पूर्णपणे निर्मूलन करण्याचं सरकारं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. क्षयरोग निर्मुलनासाठी कार्यक्रम आणि योजना राबवण्यात येत असल्याचं ते म्हणाले. गरीब जनतेला सहजरित्या औषध उपलब्ध होतील यासाठी जनेरिक औषधांच्या किमती कमी करण्यात आल्याचं ते म्हणाले.  

****

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्याबाबत सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अभ्यासासाठी स्थापन करण्यात आलेल्या अर्थसचिव अशोक लवासा यांच्या अद्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीनं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे अहवाल सादर केला. यानंतर हा अहवाल मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवणार असल्याचं लवासा यांनी सांगितलं.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो या वर्षअखेरीपर्यंत पाच संपर्क उपग्रह अवकाशात सोडण्याची तयारी करत आहेत. इस्रोचे अध्यक्ष ए एस किरण कुमार यांनी हैदराबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. देशातल्या संवाद प्रणालीत सुधारणा करणं, हे या प्रक्षेपणाचं उद्दीष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३० एप्रिल रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ३१ वा भाग असणार आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

राज्यातल्या हवामानाची माहिती मिळण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं सुरु करण्यात येणाऱ्या ‘महावेध’ प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या रविवारी ३० एप्रिलला होणार आहे. ‘महावेध’ प्रकल्पाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या हवामान विषयक माहितीमध्ये अचूकता येणार असून त्याचा उपयोग पीक विमा योजना, हवामान आधारित पीक विमा योजना, कृषी हवामान सल्ला आणि मार्गदर्शन, कृषी संशोधन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील सर्व दोन हजार ६५ महसूल मंडळामध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे.

****

कतारची राजधानी दोहा इथं सुरु असलेल्या तेहतिसाव्या आशियाई स्नूकर स्पर्धेत भारताचा पंकज अडवाणी आज अंतिम सामना खेळणार आहे. अंतिम सामन्यात त्याच्यासमोर चीनच्या एलवी हाओशियानचं आव्हान असेल. काल झालेल्या उपांत्य सामन्यात पंकजनं पाकिस्तानच्या मोहम्मद बिलालचा पाच शून्य असा पराभव केला.

****

पुणे इथं आजपासून अखिल भारतीय हिंद केसरी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. बाबुराव सणस मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या मल्लांची काल वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आज सायंकाळी क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे.

//****//

Audio - AIR News Bulletin, Aurangabad 28.04.2017....10.00

Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.04.2017 - 10.00am


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२८ एप्रिल २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

राज्यातल्या विविध १४ जिल्ह्यांतल्या ८० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि दोन हजार ४४० ग्रामपंचायतींमधल्या तीन हजार ९०९ रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी २७ मे रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी काल मुंबईत केली. यामध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एक, नांदेड आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पोट निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातल्या १२०,  नांदेड  १६०, उस्मानाबाद ७४, जालना ८६ आणि लातूर जिल्ह्यात ५३ जागांसाठी मतदान होईल.

****

राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सन २०१७-१८ मध्ये राज्यातील मुंबई आणि उपनगर हे २ जिल्हे वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यांमध्ये गोवर्धन गोवंश सेवा केंद्र सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासबंधीचा शासननिर्णय कृषी, पशुसंवर्धन, विभागाने काल जारी केला. या निर्णयामुळे शेती आणि दूध यासाठी अनुत्पादक असलेल्या गोवंशीय पशुधनाच्या संख्येत वाढ होणार आहे.

****

अक्षय्य तृतीयेनिमित्त आज महात्मा बसवेश्वर, तसंच भगवान परशूराम यांची जयंती सर्वत्र साजरी होत आहे. या निमित्तानं दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद शहरातून आज सकाळी दुचाकी फेरी काढण्यात आली. पारंपारिक पोशाखात महिला पुरुष या दुचाकी फेरीत सहभागी झाले होते. शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदीर परिसरातून सायंकाळी शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

****

समाजाला आज महापुरुषांच्या विचाराची गरज असल्याचं मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगानं, नांदेड जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी भीम जयंती मंडळाच्या वतीनं आयोजित व्याख्यानात ते काल बोलत होते.

****

आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी घराबरोबरच सामाजिक स्वच्छतेची गरज लक्षात घ्यावी, असं औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाटोदा या आदर्श गावाचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी म्हटलं आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत काल लातूर इथं आयोजित जिल्हा स्तरावरील महिला मेळाव्यात ते बोलत होते. महिलांनी वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन पेरे पाटील यांनी यावेळी केलं.
//****//

AIR News Urdu Bulletin, Aurangabad. Date:28.04.2017, Time:8.40-8.45 AM


Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...