Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 April 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ एप्रिल २०१७ दुपारी १.००वा.
****
राज्य पोलिस सेवेतल्या तसंच भारतीय पोलिस सेवेतल्या पोलिस अधीक्षक पोलिस उपायक्तांची
बदली करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला.
औरंगाबाद शहराचे पोलिस उपायुक्त वसंत परदेशी यांची ठाणे शहर पोलिस उपायुक्त
म्हणून, तर संदीप आटोळे यांची गोंदियाच्या अपर पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक एन डी रेड्डी यांची मुंबई शहराचे पोलिस उपायुक्त
म्हणून, तर पैठणचे सहाय्यक पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांची जळगावच्या अपर पोलिस अधिक्षकपदी
बदली करण्यात आली आहे.
परभणी पोलिस अधीक्षक नियती ठाकुर यांची चंद्रपूरच्या पोलिस अधीक्षकपदी बदली
झाली असून, नागपूरच्या पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य दिलीप झळगे यांची परभणीच्या
पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.
नांदेडचे पोलिस अधीक्षक म्हणून अकोल्याचे पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांची
नियुक्ती करण्यात आली असून, सध्याचे अधीक्षक संजय येनपुरे यांची मुंबईचे शहर पोलिस
उपायुक्त म्हणून बदली झाली आहे.
हिंगोलीचे पोलिस अधीक्षक म्हणून पुणे शहराचे पोलिस उपायुक्त बस्वराज तेली यांची
नियुक्ती झाली असून, सध्याचे पोलिस अधीक्षक अशोक मोराळे यांची पुणे शहर पोलिस उपायुक्त
म्हणून बदली झाली आहे.
लातूरच्या अप्पर पोलिस अधीक्षकपदी यवतमाळचे अपर पोलिस अधीक्षक काकासाहेब डोळे
यांची नियुक्ती झाली असून, सध्याच्या अपर पोलिस अधीक्षक लता फड यांची जालन्याच्या अपर
पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे.
****
२००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातले आरोपी कर्नल श्रीकांत पुरोहित
यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणातल्या मुख्य आरोपी
साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला, मात्र कर्नल
पुरोहीत यांना जामीन मंजूर न केल्यानं त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
****
हेरगिरीच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या सैन्य न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात
आलेल्या कुलभूषण जाधव यांचं आरोग्य प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी भारतानं पाकिस्तानकडे
केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी नवी दिल्ली इथं
ही माहिती दिली.
दरम्यान, जाधवांवर चालवलेला खटला विशिष्ठ पुराव्यांच्या आधारे, अतिशय पारदर्शकपणे
चालवण्यात आला असल्याचं पाकिस्ताननं स्पष्ट केलं.
****
२०२५ पर्यंत देशात क्षयरोगाचं पूर्णपणे निर्मूलन करण्याचं सरकारं उद्दिष्ट असल्याचं
केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत
ते बोलत होते. क्षयरोग निर्मुलनासाठी कार्यक्रम आणि योजना राबवण्यात येत असल्याचं ते
म्हणाले. गरीब जनतेला सहजरित्या औषध उपलब्ध होतील यासाठी जनेरिक औषधांच्या किमती कमी
करण्यात आल्याचं ते म्हणाले.
****
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्याबाबत सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अभ्यासासाठी
स्थापन करण्यात आलेल्या अर्थसचिव अशोक लवासा यांच्या अद्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीनं
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे अहवाल सादर केला. यानंतर हा अहवाल मंत्रिमंडळाच्या
मंजुरीसाठी पाठवणार असल्याचं लवासा यांनी सांगितलं.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो या वर्षअखेरीपर्यंत पाच संपर्क उपग्रह
अवकाशात सोडण्याची तयारी करत आहेत. इस्रोचे अध्यक्ष ए एस किरण कुमार यांनी हैदराबाद
इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. देशातल्या संवाद प्रणालीत सुधारणा करणं, हे या
प्रक्षेपणाचं उद्दीष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३० एप्रिल रोजी आकाशवाणीवरील ‘मन की
बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ३१ वा भाग असणार
आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम
प्रसारित होईल.
****
राज्यातल्या हवामानाची माहिती मिळण्यासाठी राज्य
शासनाच्या वतीनं सुरु करण्यात येणाऱ्या ‘महावेध’ प्रकल्पाचं
उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या रविवारी ३० एप्रिलला
होणार आहे. ‘महावेध’ प्रकल्पाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या हवामान
विषयक माहितीमध्ये अचूकता येणार असून त्याचा उपयोग पीक विमा योजना, हवामान
आधारित पीक विमा योजना, कृषी हवामान सल्ला आणि मार्गदर्शन, कृषी
संशोधन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून
राज्यातील सर्व दोन हजार ६५ महसूल मंडळामध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी
करण्यात येणार आहे.
****
कतारची राजधानी दोहा इथं सुरु असलेल्या तेहतिसाव्या आशियाई
स्नूकर स्पर्धेत भारताचा पंकज अडवाणी आज अंतिम सामना खेळणार आहे. अंतिम सामन्यात त्याच्यासमोर
चीनच्या एलवी हाओशियानचं आव्हान असेल. काल झालेल्या उपांत्य सामन्यात पंकजनं पाकिस्तानच्या
मोहम्मद बिलालचा पाच शून्य असा पराभव केला.
****
पुणे इथं आजपासून अखिल भारतीय हिंद केसरी स्पर्धेला सुरुवात
होणार आहे. बाबुराव सणस मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या मल्लांची
काल वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आज सायंकाळी क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते
स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे.
//****//
No comments:
Post a Comment