Friday, 21 April 2017

text - AIR News Bulletin, Aurangabad 21.04.2017 10.00am


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२१ एप्रिल २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

हैदराबादहून औरंगाबादला येणारी पॅसेंजर रेल्वे गाडीचं इंजिन आणि तीन डबे मध्य रात्रीच्या सुमारास विकाराबादजवळ रुळावरुन घसरले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, या अपघातामुळे काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. औरंगाबाद हैदराबाद पॅसेंजर, नांदेड बंगळुरु एक्सप्रेस, पुर्णा हैदराबाद पॅसेंजर या गाड्या, तसंच परळीमार्गे जाणार्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.    

****

लातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिकांसाठीची मतमोजणी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. परभणी महानगरपालिकेसाठी ६५ टक्के तर लातूर महानगरपालिकेसाठी ६२ टक्के मतदान झालं होतं. रभणीत ६५ जागांसाठी ४१८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. लातूर महानगरपालिकेत १८ प्रभागातून ७० नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. दुपारपर्यंत काही निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

****

औरंगाबाद इथल्या चिकलठाणा विमानतळावरुन होणाऱ्या विमान वाहतुकीच्या वेळेत येत्या चार महिन्यांसाठी बदल करण्यात आला आहे. या विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्तीचं काम सुरु झाल्यानं विमानांच्या वेळा बदलाव्या लागल्या आहेत. सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही धावपट्टी बंद असणार आहे.

****









पत्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता, राज्याच्या हिताकरता आणि विकासाची दिशा दाखवण्यासाठी लेखणीच्या माध्यमातून काम करत असतात. यातूनच प्रशासन, शासन आणि लोकप्रतिनिधींनाही धोरण आखता येतात. त्यामुळे पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं नांदेडचे जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे. नांदेड इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते.

****

वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरु झाकीर नाईक यांच्याविरुद्ध मुंबईतल्या विशेष न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. तीन वेळा समन्स बजावूनही नाईक चौकशीसाठी हजर राहीले नाहीत, आता त्यांना भारतात आणण्यासाठी इंटरपोलची मदत घ्यावी लागेल, असं राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएनं न्यायालयात सांगितलं. गेल्या वर्षी एनआयएनं बेकायदेशिर कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नाईक यांच्याविरोधात खटला दाखल केला होता, त्यावेळी अटक टाळण्यासाठी त्यांनी परदेशात पलायन केलं. 

//******//






No comments: