Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 April 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ एप्रिल २०१७ दुपारी १.००वा.
*****
हिंदी
चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं आज मुंबई
इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. दयावान, कच्चे धागे,
अमर अकबर अँथोनि, पूरब और पश्चिम यासारख्या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका गाजल्या.
२०१५ साली प्रदर्शित झालेला दिलवाले हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. विनोद खन्ना यांना
पाच वेळा फिल्मफेअर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. माजी केंद्रीय मंत्री राहिलेले खन्ना हे पंजाबमधील गुरुदासपूरचे विद्यमान खासदार
होते.
****
हवाई
सेवेत भारतात सर्वात जास्त संधी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
शिमला इथं आज प्रादेशिक जोडणी योजना, ‘उडे देश का आम नागरिक’ अर्थात-
‘उडान’ योजनेची सुरुवात पंतप्रधानांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. व्हिडीओ
लिंकिंगद्वारे नांदेड - हैदराबाद, तसंच सिमला - दिल्ली आणि कडप्पा - हैदराबाद विमान सेवेची
सुरुवात केली. यानिमित्तानं नांदेड इथं विशेष कार्यक्रमाचं
आयोजन करण्यात आलं होतं. नांदेड-मुंबई विमानसेवाही लवकरच सुर होणार असल्याचं ते म्हणाले.
तसंच शिख धर्मियांचं तीर्थक्षेत्र असणाऱ्या नांदेड, अमृतसर आणि पाटणा या शहरांनाही
विमानसेवेनं जोडण्याचा प्रस्ताव असल्याचं त्यांनी सांगितलं. उडान योजनेमुळे सामान्य
नागरिकांना अवघ्या अडीच हजार रुपयांत देशांतर्गत विमान प्रवास करता येणार आहे.
****
झारखंड
वस्तु आणि सेवा कर विधेयक पारित करण्यासाठी आज झारखंड विधानसभेचं विशेष सत्र बोलावण्यात
आलं आहे. येत्या एक जुलै पासून देशभरात जीएसटी कायदा लागू करण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी
आपापल्या विधिमंडळात जीएसटी विधेयक संमत करणं आवश्यक आहे. याआधी बिहार
राज्यानं हे विधेयक पारित केलं आहे.
****
रेल्वेमध्ये
होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी भ्रष्ट रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई
करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात
भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी येत असतात, या पार्श्वभूमीवर हे निर्देश दिल्याचं पंतप्रधान
कार्यालयाकडून सांगण्यात आलं. रेल्वे संदर्भात येणाऱ्या सर्व प्रकारच्या तक्रारींचं
निवारण करण्यासाठी मदत क्रमांक सुरू करण्याच्या दिशेनं पावलं उचलली जावीत, याचा वापर
रेल्वे अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीतही केला जाईल,
अशी यंत्रणा उभारावी, असं पंतप्रधानांनी रेल्वे मंत्रालयाला सांगितलं आहे.
****
रेल्वे
प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी रेल्वेशी संबधित सर्व विभांगांचं कामकाज
डिजिटल पद्धतीनं करण्यात येणार आहे. त्यासाठी कृती आराखडा
तयार करण्यात येत असून, त्यामुळे साठ हजार कोटी रुपये वाचतील, असं
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं पीटीआय या वृत्त संस्थेशी
बोलत होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक कार्यक्षम आणि फायदेशीर करण्यात येणार असल्याचं
ते म्हणाले.
****
उत्तेजक
द्रव्य सेवन प्रकरणांची गंभीर दखल घेत, भारतीय ऑलिंपिक संघटना, राष्ट्रीय डोपिंग विरोधी
संस्था - नाडा, राष्ट्रीय क्रीडा संघटना आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणानं उत्तेजक द्रव्य
सेवन प्रकरणं जराही खपवून न घेण्याच्या धोरणाचा अवलंब करावा, असे निर्देश केंद्रीय
क्रीडा राज्यमंत्री विजय गोयल यांनी दिले आहेत. यासंदर्भात नवी दिल्ली इथं नाडानं आयोजित
केलेल्या चर्चासत्रात, ही बाब हाताळण्यासाठी प्रभावी धोरण निश्चित करावं, उत्तेजक द्रव्य
सेवन प्रकरणाला फौजदारी गुन्ह्याअंतर्गत आणण्याबाबतही चर्चा व्हावी, असं गोयल यांनी
सांगितलं.
****
स्वयंसेवी
संस्था आणि त्यांच्या निधी वितरणावर नियंत्रण ठेवणारा कायदा करण्याबाबत केंद्र सरकारनं
आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. स्वयंसेवी संस्थांना
लाखो रुपये सरकार देतं, मात्र, त्यांचे हिशोब ठेवले जात नाहीत. यासंदर्भात सहा वर्षांपूर्वी
एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यावरील पुढील सुनावणी आठ आठवड्यांनंतर
होणार आहे.
****
माध्यमिक
शालांत प्रमाणपत्र परिक्षा इयत्ता दहावीमध्ये शास्त्रीय कला,
तसंच लोककला
या प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण
देण्यात येतात. यासाठीच्या संस्थांच्या यादीत मार्च २०१७ पासून अखिल भारतीय गंधर्व
महाविद्यालय, सरफोजी राजे भोसले डान्स रिसर्च इन्स्टिट्यूट, नालंदा नृत्य कला महाविद्यालय,
श्री वल्लभ संगीतालय आणि पुणे भारत गायन समाज या पाच संस्थांचा समावेश करण्यात आला
आहे. मंडळानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली.
****
राज्यातल्या
टंचाईग्रस्त आणि ग्रामीण भागांमध्ये गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत पाणी पुरवठा करण्यासाठी
शासनानं हाती घेतलेल्या जलस्वराज्य दोन, या कार्यक्रमात एकोणनव्वद टंचाईग्रस्त
गावांमध्ये सामुदायिक पाणी साठवण टाक्या उभारण्यात येणार आहेत. या गावांमध्ये नांदेड
जिल्ह्यातल्या किनवट, मुखेड आणि लोहा या तालुक्यांतल्या पाच तांड्यांचा समवेश आहे.
//*******//
No comments:
Post a Comment