Wednesday, 26 April 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 April 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ एप्रिल २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      २२ एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रांवर आलेली सर्व तूर खरेदी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

·      मृद आणि जलसंधारण आयुक्तालय येत्या १ मे पासून औरंगाबाद इथं सुरू होणार

·      मालेगाव  बॉम्बस्फोट प्रकरणातल्या मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना जामीन मंजूर

आणि

·      येत्या दोन वर्षांत १९ लाख कुटुंबांना वीज जोडण्या देणार- ऊर्जामंत्री चंद्रशेखर बानवकुळे

****

राज्यात भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ - नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर २२ एप्रिलपर्यंत पोहोचलेली सर्व तूर राज्य शासन खरेदी करेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे, काल मुंबईत मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रतिक्विंटल पाच हजार ५० रुपये हमी भावानं ही तूर खरेदी करण्यासाठी एक हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यंदा देशभरात अकरा लाख टन तूर खरेदी झाली असून, त्यापैकी चार लाख टन तूर एकट्या महाराष्ट्रात खरेदी झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या नावावर तूर विक्रीसाठी आणणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा त्यांनी दिला.

****

रकारनं शेतकऱ्यांची सर्व तूर विकत घ्यावी, अशी मागणी संयुक्त जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी केली आहे. काल मुंबईत मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर संयुक्त जनता दलानं केलेल्या तूर विक्री आंदोलनावेळी ते बोलत होते. डाळ व्यावसायिकांशी हातमिळवणी करून, सरकारनं शेतकऱ्यांचं नुकसान करू नये, असं पाटील यावेळी म्हणाले.

****

राज्याचं मृद आणि जलसंधारण आयुक्तालय येत्या महाराष्ट्र दिनापासून औरंगाबाद इथं जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था- वाल्मीच्या परिसरात सुरू होणार आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या ऑक्टोबर महिन्यात औरंगाबाद इथं झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या आयुक्तालयाच्या स्थापनेचा निर्णय झाला होता. जलसंधारण विभागाचं नाव ‘मृद आणि जलसंधारण विभाग’ असं बदलण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचना करण्याच्या प्रस्तावासह १६ हजार ४७९ पदांच्या आकृतीबंधाला मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे. या अंतर्गत या आयुक्तालयासाठी १८७ पदांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला असून, १६ पदं नव्यानं निर्माण करण्यात येणार आहेत. मृद आणि जलसंधारण विभागात सध्या ६ हजार ११५ पदं मंजूर आहेत. कृषी विभागाकडची मृद संधारण यंत्रणा तिच्या नऊ हजार ९६७ पदांसह मृद आणि जलसंधारण विभागाकडे वर्ग करून घेण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयकासह संबंधित इतर विधेयकांना मंजुरी देण्यासाठी राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन १७ मे रोजी बोलावण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत घेण्यात आला. वस्तू आणि सेवा कर विधेयकाशी संबंधित विधेयकं विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात ज्या दिवशी मंजूर होतील, त्या दिवशी हे विशेष अधिवेशन संस्थगित करण्याबाबत राज्यपालांना शिफारस केली जाणार आहे. या कायद्यांची अंमलबजावणी येत्या एक जुलैपासून होण्यासाठी राज्य विधीमंडळांनी हे विधेयक संमत करणं आवश्यक आहे.

****

शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला कालपासून कोल्हापूर इथून प्रारंभ झाला. शेतकऱ्यांची सर्व तूर शासनानं खरेदी केली पाहिजे, आणि व्यापारी तसंच नाफेड अधिकाऱ्यांकडून तूर खरेदीत सुरु असणाऱ्या गैरव्यवहाराची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केली. ही यात्रा कोल्हापूरकडून सांगलीकडे मार्गस्थ झाली.

****

सरकारी रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांचे प्रश्न समजून घेण्यासाठी एक उच्चाधिकार समिती नेमण्यावर राज्य सरकारनं विचार करावा, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या महिन्यात डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाविरुद्ध दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं, ही अपेक्षा व्यक्त केली. निवासी डॉक्टरांना संपावर जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी अशी समिती नेमली जाणं आवश्यक असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.   

****

२००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. एप्रिल २०१६ मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेनं प्रज्ञासिंग यांना महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत निर्दोष ठरवलं होतं. त्यानंतर साध्वीनं विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला, मात्र विशेष न्यायालयानं सबळ पुरावे असल्याचं सांगत जामीन अर्ज फेटाळला होता. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला साध्वीनं उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायालयानं जामीन मंजूर केला, मात्र या प्रकरणातले अन्य आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

येत्या दोन वर्षांत राज्यात १९ लाख कुटुंबांना वीज जोडण्या दिल्या जातील, अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांनी केली आहे. काल औरंगाबाद इथं ३३ किलोवॅट वीज उपकेंद्रांच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते. औरंगाबाद जिल्ह्याच्या विद्युत विकासासाठी यावर्षी सुमारे पाचशे कोटी रुपये तरतूद केली असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. जिल्ह्याच्या विजेच्या समस्या मे महिन्यात १८ ते २० तारखेदरम्यान आपण स्वत: जनता दरबार भरवून सोडवणार असल्याचं ऊर्जामंत्री म्हणाले. एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत औरंगाबाद शहरात १०१ कोटी रुपये खर्चून दोन टप्प्यात सहा वीज उपकेंद्र उभारली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

****

जळगाव इथं ‘शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल उभारण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी काल मंत्रालयात वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. सुमारे ४७ एकर परिसरात उभारल्या जाणाऱ्या या संकुलात ॲलोपॅथी, आयुर्वेद, दंतोपचार, होमिओपॅथी, तसंच भौतिकोपचार या शाखांची महाविद्यालयं उभारली जाणार आहेत. यासाठी एक हजार २५० कोटी रूपयांच्या खर्चाला तसंच पदनिर्मिती आणि पद भरतीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली असल्याचं महाजन यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या सिंचन प्रकल्पात साचलेला गाळ उपसा करून, शेतकऱ्यांना मोफत देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. सध्या जायकवाडीसह पाच प्रकल्पांमध्ये प्रायोगिक स्तरावर ही योजना राबवली जाणार आहे. या प्रकल्पात सुमारे ३० ते ४० टक्के गाळ जमा झाला आहे. तो उपसा केल्यानं, प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता वाढेल, गाळ उपसा करण्यासाठी ई निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून, हा करार १५ वर्षांसाठी असेल. शेतजमिनीचा पोत सुधारण्यास उपयुक्त असलेला हा गाळ शेतकऱ्यांना मोफत मिळणार असून, त्यांना तो स्वखर्चाने उचलून न्यावा लागणार आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेसह सर्व शाखांना शिवसेनेनं काल टाळं ठोकलं. खरीप हंगामासाठी पीक विम्याचं वाटप सुरू न केल्याबद्दल हे आंदोलन करण्यात आलं. सात दिवसांच्या आत विम्याच्या रकमेचं वाटप सुरू करून, रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचं आश्वासन बँकेकडून देण्यात आल्यानं, आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात मागे घेण्यात आलं. मात्र बँकेनं आश्वासन पाळलं नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शिवसेनेच्यावतीनं देण्यात आला.

****

बीड जिल्ह्यात रेल्वेवर आधारित उद्योग आणावेत, अशी शिफारस पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभ यांच्याकडे केली आहे. नवी दिल्ली इथं मुंडे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. परळी बीड नगर रेल्वे मार्गाच्या कामाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. येत्या तीन जनला गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी मुंडे यांनी रेल्वेमंत्र्यांना आमंत्रित केलं. 

****

जालना इथं धर्मदायसह आयुक्त कार्यालयातला वरिष्ठ लिपिक सांडू डोंगरे याला काल ३०० रुपये लाच घेताना, रंगेहात अटक केली. बहुद्देशीय सेवाभावी संस्था नोंदणीसाठी डोंगरे यानं लाचेची मागणी केली होती.

****

नांदेड जिल्ह्यातल्या बिलोलीच्या नगराध्यक्ष मैथिली कुलकर्णी यांना नगरविकास विभागानं अपात्रतेची नोटीस बजावली आहे. २०१२-१३ मध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी नोटीस बजावली असून, त्यावर १५ दिवसांत खुलासा करण्यास सांगण्यात आलं आहे. या प्रकरणी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चार आमदारांनी लक्षवेधी सूचना दिली होती.

****

लातूर जिल्ह्यात पाणी फाऊंडेशनच्या वतीनं निलंगा तालुक्यात आनंदवाडी आणि तगरखेडा या दोन गावात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. या ठिकाणी काल पाणी फाऊंडेशनचा प्रणेता अभिनेता आमीर खान आणि किरण राव यांनी श्रमदान केलं. चळवळीत सहभागी महिलापुरुषांची बैठक घेऊन, आमीर खान यानं, पाण्याची समस्या जाणून घेत, त्या दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवल्या.

****

वैयक्तिक शौचायलं उभारणीसाठी गावची मानसिकता बदलणं आवश्यक असल्याचं, औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाटोदा या आदर्श गावचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं काल, पंचायत समितीच्यावतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

//*******//

     

No comments: