Tuesday, 25 April 2017

text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 25.04.2017 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 April 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ एप्रिल २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      छत्तीसगढमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या २५ जवानांना वीरमरण

·      २२ एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रांवर तूर आणलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारकडे मागणी

·      पेट्रोलवरचा अधिभार मागे घ्यावा- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण

आणि

·      ेतकऱ्यांनी एकाच प्रकारचं पीक मोठ्या प्रमाणावर घेऊ नये-औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांचं आवाहन

****

छत्तीसगढमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या २५ जवानांना वीरमरण आलं. बुर्कपाल आणि चिंतागुफा भागात दबा धरून बसलेल्या सुमारे तीनशे नक्षलवाद्यांनी, रस्ता बांधणी प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी तैनात जवानांच्या पथकावर दुपारी भोजनाच्या वेळेदरम्यान हल्ला केला. या हल्ल्यात नक्षलवाद्यांनी मृत जवानांची हत्यारंही पळवली. जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या या चकमकीत अनेक नक्षलवादीही मारले गेल्याचं वृत्त आहे.

राष्ट्रपती, पंतप्रधानांसह केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी या घटनेची तीव्र शब्दात निंदा केली आहे.

****

भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ - नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर २२ एप्रिलपर्यंत तूर आणणाऱ्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अन्न तसंच ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली आहे. नाफेडनं २२ एप्रिलपासून राज्यात तूर खरेदी बंद केली आहे, त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काल नवी दिल्ली इथं पासवान यांची भेट घेतली. तुरीवरचा आयात कर वाढवून तो २५ टक्के करावा,  तसंच, तूर खरेदीसाठी योग्य धोरण आखावं, अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

रम्यान, तूर खरेदी तत्काळ सुरू न केल्यास, राज्यभरात आंदोलन छेडण्याचा इशारा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिला आहे. ते काल मुंबईत बोलत होते. सरकारनं तूर खरेदी बंद करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याचं, चव्हाण म्हणाले.

विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात बोलताना, संपूर्ण तूर खरेदी होईपर्यंत प्रक्रिया सुरू ठेवावी, तसंच शेतकऱ्यांना तुरीचे पैसे तातडीनं मिळतील, याची व्यवस्था करण्याची मागणी केली.

विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या खरेदी प्रक्रियेवर टीका करत, तूर उत्पादन मोठ्या प्रमाणावर होण्याचा अंदाज असूनही, सरकारनं खरेदीसाठी नियोजन केलं नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कमी भावानं तूर विकू नये, असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापूर इथं बोलत होते. तूर खरेदीत मोठा घोटाळा झाला असून, नाफेड आणि व्यापाऱ्यांच्या संगनमतानं, शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.

शेतकऱ्यांची तूर खरेदीविना शिल्लक असल्याच्या कारणावरून अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. प्रत्येक मंत्र्यांच्या दारात एक ट्रॅक्टर तूर टाकण्याचा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे.

दरम्यान तूर खरेदी बंद झाल्यानं, राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. लातूर जिल्ह्यात जळकोट तसंच चाकूर इथं तूर प्रतिकात्मक जाळून शेतकऱ्यांनी तूर खरेदी बंदीचा निषेध केला. येत्या तीन दिवसांत तूर खरेदी सुरू केली नाही, तर तुरीची गोदामं पेटवून देण्याचा इशारा, लातूर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी संतोष तिडके यांनी दिला आहे.

जालना, अकोला, बुलडाणा तसंच यवतमाळ इथंही तूर उत्पादकांनी आंदोलन केल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, उत्पादनाचा अंदाज न आल्यामुळे सरकार तूर खरेदीच्या नियोजनात कमी पडल्याची कबुली अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलताना दिली.  

****

राज्यातल्या ४६ हजार गावांचं सर्वेक्षण करुन गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी दिली जाईल, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. सरसकट कर्जमाफी दिली, तर कर्जमाफीची आवश्यकता नसलेल्या, मोठ्या शेतकऱ्यांची कर्जही माफ होतील, असं पाटील यावेळी म्हणाले.

****

राज्यातल्या नाशवंत शेतमालाच्या बाबतीत विविध समस्या तसंच प्रश्नांचा अभ्यास करून शेतमालाचं काढणी पश्चात नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारनं अकरा सदस्यीय समिती गठित केली आहे. शेतमालाला योग्य बाजार भाव मिळावा, याकरता उपाययोजना सुचण्यासाठीही ही समिती अभ्यास करेल. या समितीनं येत्या ६० दिवसांत शासनाला आपला अहवाल सादर करावयाचा आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

      राज्य सरकारनं पेट्रोलवरचा अधिभार मागे घ्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. राज्य सरकार पेट्रोलवर २६ टक्के मूल्यवर्धित आकारतं, मात्र मद्यविक्रीच्या महसुलातली घट भरून काढण्यासाठी सरकारनं पेट्रोलवर अधिभार लावला, यावरून आर्थिक आघाडीवर राज्य सरकार अपयशी ठरल्याचं स्पष्ट होतं, अशी टीका चव्हाण यांनी केली. दुष्काळनिधीसाठी राज्य सरकार पेट्रोलवर प्रतिलीटर ६ रुपये अधिभार आकारतं, सद्यस्थितीत राज्यात दुष्काळी परिस्थिती नाही, तसंच या अधिभाराची मुदतही ३१ मार्च २०१७ रोजी संपली आहे. त्यामुळे पेट्रोलवरचे दोन्ही अधिभार रद्द करावेत, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

****

ेतकऱ्यांनी एकाच प्रकारचं पीक मोठ्या प्रमाणावर घेऊ नये, असं आवाहन औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केलं आहे, काल औरंगाबाद इथं खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. या खरीप हंगामात जिल्ह्यात सुमारे सात लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे, यासाठी ५० हजार ८४८ क्विंटल बियाणांची मागणी नोंदवण्यात आली असून, रासायनिक खतांची टंचाई भासणार नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

दरम्यान, औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातल्या विविध विकास कामांचा आढावाही पालकमंत्री रामदास कदम यांनी घेतला. यावेळी त्यांनी २० कोटी रूपये खर्च करून महात्मा गांधी मिशन- एमजीएमच्या नजिक सिडको परिसरात स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान विकसित केलं जाणार असल्याची तसंच आंबेडकरनगरमध्ये सात कोटी रूपये खर्च करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्पितळ बांधण्यात येणार असल्याची घोषणा केली. याशिवाय चिकलठाणा विमानतळाच्या परीसरात अजिंठा लेणी आणि कैलास स्तंभाची प्रतिकृती उभारण्यात येणार असल्याचं कदम यांनी सांगितलं.

****

शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज कोल्हापूर इथून प्रारंभ होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल सोलापूर इथं ही माहिती दिली. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी या तिसऱ्या टप्प्यात संवाद साधणार असल्याचं, तटकरे यांनी सांगितलं.

****

बीड जवळ मांजरसुंबा इथं एक जीप आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. काल पहाटे चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातले मयत चारही जण बुलडाणा जिल्ह्यातल्या मोताळा इथले रहिवासी आहेत. यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. जखमींवर बीडच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

****

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उद्या राज्यभरात आक्रोश मोर्चा काढणार आहे. औरंगाबाद इथं काल पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षक बदली धोरणाच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

****

ॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ सुधीर गव्हाणे यांचा काल औरंगाबाद इथं सेवागौरव सत्कार करण्यात आला. डॉ गव्हाणे या आठवड्यात सेवानिवृत्त होत आहेत, या निमित्तानं या सेवागौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. निवृत्त न्यायाधीश बी एन देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

लोअर दुधना प्रकल्पातील अपूर्ण आणि वाढीव कामांचे प्रस्ताव तातडीनं तयार करून, आठ दिवसांत त्यांना प्रशासकीय मान्यता द्यावी असे निर्देश, जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले. काल मंठा तहसील कार्यालयात या कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या प्रकल्पासाठी मंजूर ६०० कोटी रुपये निधीपैकी आतापर्यंत ४५२ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

****

जालना इथल्या लघुसिंचन विभागात कार्यरत कार्यकारी अभियंता धनंजय कोंडेकर याला एक लाख रुपयांची लाच घेताना, काल अटक करण्यात आली. सिमेंट नाला बंधारा बांधण्याच्या कामाला मुदतवाढ देण्यासाठी कोंडेकर यानं ही लाच मागितली होती.

****

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेनं राहुरी इथल्या डॉ बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखाना सील करून जप्तीची कारवाई केली. या कारखान्याने बँकेकडून ४४ कोटी रुपये कर्ज घेतलं होतं, या कर्जाची व्याजासह एकूण थकबाकी ९० कोटी रुपयांपर्यत गेल्यानं, बँकेनं ही कारवाई केली.

//******//




No comments: