Sunday, 23 April 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 April 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ एप्रिल २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·       फक्त जेनेरिक औषधांचीच शिफारस करण्याचे भारतीय वैद्यकीय परिषदेचे वैद्यकीय व्यावसायिकांना निर्देश. 

·       राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय स्तरावर फेरबदल; नवलकिशोर राम- औरंगाबाद, जी. श्रीकांत - नांदेड, अभय महाजन - बीड, लातूर- एम. देवेंद्र सिंग तर आर. व्ही. गमे उस्मानाबादचे जिल्हाधिकारी.

·       डी. एम. मुगळीकर औरंगाबादचे महापालिका आयुक्त, दीपा मुधोळ विक्रीकर सह आयुक्त तर शीतल उगले सिडकोच्या मुख्य प्रशासक.

आणि

·      स्मानाबाद इथं सुरू असलेल्या अखिल भारतीय नाट्य महोत्सवाचा आज समारोप.

****

वैद्यकीय व्यावसायिकांनी रुग्णांना फक्त जेनेरिक औषधांचीच शिफारस करावी, असे निर्देश भारतीय वैद्यकीय परिषदेनं दिले आहेत. वैद्यकीय परिषदेच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन न करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा इशाराही परिषदेनं दिला आहे. रुग्णांना औषधं लिहून देताना औषध कंपन्यांच्या नावांऐवजी जेनरिक नावाचा उल्लेख करावा, अशी सुधारणा परिषदेच्या नियमावलीत गेल्या वर्षीच करण्यात आली होती, परिषदेनं हे निर्देश पुन्हा जारी केले आहेत.   

****

माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्व असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी म्हटलं आहे. काल नवी मुंबईत नेरुळ इथं डी वाय पाटील विद्यापीठात आयोजित मेडिव्हीजन २०१७ या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांसाठी सर्व राज्यांकरता भरीव तरतूद करण्यात आली आहे, मात्र कित्येक राज्यांकडून आरोग्यविषयी निधीचा वापरच केला जात नसल्याचं नड्डा म्हणाले. १९ वर्षांवरील वयोगटातल्या कर्करोग पीडितांना मोफत सुविधा देण्यासाठी विशेष योजनेअंतर्गत देशभरातले शंभर जिल्हे निवडण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्यांमध्ये दिव्यांगांचा अनुशेष लवकरच भरून काढला जाईल, असं आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिलं आहे. दिव्यांगांच्या एका शिष्टमंडळानं काल मुंबईत आठवले यांची भेट घेऊन, या संदर्भातलं निवेदन त्यांना दिलं. अशा नोकऱ्यांमध्ये दिव्यांगांचं आरक्षण तीन टक्क्यांवरून चार टक्के करण्यात आलं आहे. यानुसार असलेल्या अनुशेषाची माहिती घेऊन, योग्य कार्यवाही केली जाईल, असं आठवले म्हणाले.

****

ग्रामीण भागात विजेचं जाळं वाढवण्याच्या कामाला गती देण्यासाठी, राज्याचं नवीन पारेषण धोरण पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात ही माहिती दिली. महावितरणच्या विविध कार्यक्रमांसाठी पुण्यात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

****

राज्य सरकारनं काल मंत्रालय ते जिल्हास्तरावरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल केले. औरंगाबादच्या जिल्हाधिकारी निधी पांडेय यांची राजीव गांधी आरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे, बीडचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांच्या जागी नागपूरच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त अभय महाजन बीडचे जिल्हाधिकारी असतील.

नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांची विमानतळ विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली असून, अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आता नांदेडचे जिल्हाधिकारी असतील.

लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांची पुणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली असून, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम देवेंद्र सिंह आता लातूरचे जिल्हाधिकारी असतील.

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांची पालघरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली असून, बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आर व्ही गमे हे उस्मानाबादचे जिल्हाधिकारी असतील.

औरंगाबाद महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली असून, औरंगाबाद इथले विक्री कर सह आयुक्त डी एम मुगळीकर औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त असतील. बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ औरंगाबादच्या विक्रीकर सहआयुक्त असतील.

रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांची औरंगाबाद इथं सिडकोच्या मुख्य प्रशासक म्हणून बदली झाली आहे.

सिडकोचे व्यवस्थापकीय सहसंचालक एस एम केंद्रेकर यांची औरंगाबाद इथं वीज महावितरणचे व्यवस्थापकीय सहसंचालक म्हणून बदली झाली आहे.

औरंगाबादचे अतिरिक्त आयुक्त जी एम बोडखे यांची पदोन्नतीवर मत्स्य संवर्धन आयुक्त म्हणून बदली झाली असून, हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथले सहायक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची नाशिक चे सहायक जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



****

स्मानाबाद इथं सुरू असलेल्या अखिल भारतीय नाट्य महोत्सवाचा आज समारोप होत आहे. परवा शुक्रवारपासून सुरू झालेल्या या सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला नाट्यरसिकांचा ांगला प्रतिसाद मिळत आहे, याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सुलभा देशपांडे नाट्य नगरीत स्थानिक कलाकारांच्या पारंपारिक लोककला,एकांकिका आणि एकपात्री नाटकांच्या प्रयोगाचं सादरीकरण झालं.नाट्य संमेलनाध्यक्ष जयंत सावरकारांच्या प्रकट मुलाखतीतून नव कलाकरांच्या सादरीकरणाला प्रेरणा मिळाली. उस्मानाबाद सारख्या भागात नाट्य रसिक मिळत असल्यामुळे व्यावसायिक नाट्यकर्मींनी आता नाट्य दौरे ग्रामीण भागातल्या प्रेक्षकांपर्यंत वळवावे असं आवाहन सावरकर यांनी या मुलाखतीदरम्यान केलं.

उस्मानाबाद सारख्या ग्रामीण भागात कलाकारांना नाट्यअभिनय, कला प्रशिक्षण देण्यासाठी वेळ द्यायला आवडेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.



दरम्यान, या नाट्यसंमेलनात आज अखेरच्या दिवशी सकाळच्या सत्रात तिन्ही रंगमंचावर स्थानिक कलाकारांचं सादरीकरण तसंच विविध कार्यक्रम सादर होणार असून, सायंकाळी पाच वाजता मुख्य रंगमंचावर खुलं अधिवेशन आणि समारोप होणार आहे.

****

चतुरंग प्रतिष्ठानचा ‘संगीत सन्मान पुरस्कार’ यंदा औरंगाबाद इथले ज्येष्ठ गायक पंडित नाथराव नेरळकर यांना जाहीर झाला आहे. मानपत्र आणि ७५ हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ संगीत साधना करणारे नेरळकर यांनी संपूर्ण भारतभरात विविध कार्यक्रमांद्वारे अभिजात संगीताचा प्रसार केला आहे. डोंबिवली इथं येत्या १३ मे रोजी हा पुरस्कार त्यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

****

मराठवाडा साहित्य परिषदेचा ‘यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार’ ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ‘लोक माझे सांगाती’ या ग्रंथासाठी आज औरंगाबाद इथं प्रदान करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात ‘नटवर्य लोटू पाटील पुरस्कार’ ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर जब्बार पटेल यांना दिला जाणार आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होईल. याप्रसंगी ‘लोक माझे सांगाती’ या ग्रंथावर डॉक्टर मनोहर जाधव आणि डॉक्टर जब्बार पटेल यांच्या कार्यावर रंगकर्मी प्रा. दिलीप घारे भाष्य करणार आहेत.

****

परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा इथं १४ एप्रिलला झालेल्या दगडफेक प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगामार्फत करण्यात येणार आहे. आयोगाचे अध्यक्ष विजयकुमार कांबळे यांनी काल परभणी इथं ही माहिती दिली. या दगडफेकीत जखमी झालेल्या व्यक्तींची कांबळे यांनी जिल्हा रुग्णालयात भेट घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

****

लातूर महापालिका निवडणुकीत जनतेनं भारतीय जनता पक्षावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रत्येक नवनिर्वाचित नगरसेवकाला येत्या तीन दिवसात विकास कामांचा आराखडा सादर करण्यास सांगितलं आहे. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही माहिती दिली. ते काल लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान,लातूरकरांनी दिलेला कौल मान्य असून, पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचं, आमदार अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.

****

अद्यावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यत पोहोचवून यंदाच्या खरीप हंगामात उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहिम प्रभावीपणे राबवण्याचं आवाहन कौशल्य विकास, कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं. लातूर इथं खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते काल बोलत होते.

//*******//


No comments: