Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 April 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ एप्रिल २०१७ दुपारी १.००वा.
*****
आतापर्यंत
जेवढ्या शेतकऱ्यांनी तूर खरेदी केंद्रावर नोंदणी केली आहे, त्यांची तूर पाच हजार ५०
रुपये हमीभावानं खरेदी केली जाईल, असा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. आज मुंबईत यासंदर्भात
झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
एकूण
तूर खरेदी ११ लाख टन आहे. यापैकी एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक चार लाख टन म्हणजे ४५
टक्के तूर खरेदी करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
ज्यांनी
मोठ्या प्रमाणात तूर विक्रीसाठी आणली त्यांच्या शेतीची सॅटेलाईट मॅपिंग करुन ती त्यांचीच
तूर आहे का, याची तपासणी केली जाईल. तेवढं पीक न आढळल्यास संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई
केली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
नक्षलवादी
त्यांच्या उद्देशात कधीही सफल होणार नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी
म्हटलं आहे. छत्तीसगढमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांसोबत
काल झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या २५
जवानांना गृहमंत्र्यांनी आज रायपूर इथं श्रद्धांजली अर्पण केली, त्यानंतर ते वार्ताहरांशी
बोलत होते. नक्षलविरोधी धोरणाची समिक्षा करण्यासाठी येत्या आठ मे ला गृहमंत्रालयाची
बैठक होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नसल्याचं
ते म्हणाले. छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमण सिंग यावेळी उपस्थित होते.
****
२००८
साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर
यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. एप्रिल २०१६ मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेनं प्रज्ञासिंग
यांना महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण
कायद्याअंतर्गत निर्दोष ठरवलं
होतं. त्यानंतर
साध्वीनं विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला, मात्र विशेष न्यायालयानं सबळ पुरावे
असल्याचं सांगत जामीन अर्ज फेटाळला होता. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला साध्वीनं
उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आज न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली असता न्यायालयानं
जामीन मंजूर केला. मात्र लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा जामीन अर्ज न्यायालयाकडून
फेटाळण्यात आला आहे.
****
जागतिक मलेरिया दिवस आज पाळण्यात येत आहे. डासांमुळे होणाऱ्या
आजाराबाबत समाजात जागृती करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेनं
‘मलेरियाचं मुळापासून उच्चाटन’ हे यंदाचं घोषवाक्य निश्चित केलं आहे. यानिमित्त आज
विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
दिव्यांगांसाठी
केंद्रीय विद्यापीठ उत्तर प्रदेशात उभारण्यात येणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री
प्रकाश जावडेकर यांनी लखनऊ इथं एका कार्यक्रमात ही माहिती दिली. सामाजिक न्याय आणि
सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांच्याशी याबद्दल चर्चा केली असल्याचं ते म्हणाले.
सुगम्य भारत योजनेअंतर्गत देशातल्या प्रत्येक शैक्षणिक संस्थेत दिव्यांगांसाठी सोयीसुविधा
उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
निवडणूक
काळात ज्या आमदार, खासदारांविरोधात मतदारांना पैसे दिल्याचा आरोप सिद्ध होईल, त्याला
अपात्र घोषित करण्याची तरतूद करावी, अशी शिफारस निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला एका
पत्राद्वारे केली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यातल्या कलम ८ मध्ये दुरुस्ती करण्यात यावी,
असंही आयोगानं कायदा मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. लोकप्रतिनिधी विरोधात
गंभीर गुन्हा सिद्ध होऊन त्याला शिक्षा सुनावल्यानंतर पदावरून हटवून शिक्षेचा कालावधी
पूर्ण होईपर्यंत आणि त्यानंतर सहा वर्षे त्याला निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याची लोकप्रतिनिधी
कायद्यात तरतूद आहे. यावर पाच वर्षांऐवजी एक वर्षाची शिक्षा दिल्यानंतरही त्याला पदावरून
हटवून निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याची तरतूद करावी, अशी शिफारस आयोगाने केली आहे.
****
प्राण्यांची
सुरक्षा आणि देखभालीसाठी 'आधार' कार्डसारखी योजना राबवण्याचा सरकारचा विचार आहे. प्राण्यांची,
विशेष करून गायींची संपूर्ण तपशीलवार माहिती ठेवणं हा यामागचा उद्देश असल्याचं सरकारनं
सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. प्राण्यांची सुरक्षा आणि देखभालीच्या प्रश्नांवरील
उपायांसाठी केंद्र सरकारनं सहसचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती.
या समितीचा अहवाल सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सादर केला.
****
बीड
जिल्ह्यात रेल्वेवर आधारित उद्योग आणावेत, अशी शिफारस पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी
रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्याकडे केली आहे. नवी दिल्ली इथं मुंडे यांनी रेल्वेमंत्र्यांची
भेट घेतली, त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. परळी बीड नगर रेल्वे मार्गाच्या कामाबाबत
यावेळी चर्चा करण्यात आली. येत्या तीन जुनला गोपिनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त
गोपिनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी मुंडे यांनी रेल्वेमंत्र्यांना
आमंत्रित केलं.
//******//
No comments:
Post a Comment