Saturday, 29 April 2017

text - AIR News Bulletin, Aurangabad 29.04.2017....10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२९ एप्रिल २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

नांदेड शहरातल्या प्रदुषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी यापुढे दर महिन्याचा पहिला गुरुवार हा "वाहन विरहीत दिन-नो व्हेईकल डे" म्हणून पाळण्याचं आवाहन नांदेड-वाघाळा शहर महापालिकेनं केलं आहे. या दिवशी खासगी वाहन न वापरता सार्वजनिक वाहन किंवा सायकलचा वापर करावा, असं महापालिकेनं म्हटलं आहे. या संकल्पामुळे शहरातली वाहतूक कोंडी कमी होऊन, इंधन बचतीला चालना मिळेल असं महापालिकेतर्फे जारी पत्रकात म्हटलं  आहे.

****

देशातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेनं देशाची सुरक्षा करत असताना शहिद झालेल्या संरक्षण, केंद्रीय सशस्त्र पोलिस आणि राज्य पोलीस दलातील शहिद जवानांच्या कुटुंबांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक अधिकारी एका कुटुंबाला पाच ते दहा वर्षांसाठी दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करेल. ज्या कुटुंबाला दत्तक घेण्यात येईल ती शक्यतो आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती असणाऱ्या राज्यातील असेल, अशी माहिती इंडियन सिव्हिल अॅण्ड अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असोसिएशनचे सचिव संजय भुसरेड्डी यांनी दिली.

****

मलेशियात सुलतान अझलनशहा चषक हॉकी स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेत भारत, मलेशिया, इंग्लंड, जपान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड, हे सहा देश सहभागी होत असून, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सलामीच्या सामन्यानं स्पर्धेला प्रारंभ होईल. भारताचा पहिला सामना आज इंग्लंडसोबत होणार आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास या सामन्याला सुरूवात होईल. भारताचा पुढचा सामना उद्या न्यूझीलंडसोबत, २ मे रोजी ऑस्ट्रेलिया, ३ मे रोजी जपान आणि ५ मे रोजी यजमान मलेशिया संघासोबत होईल. स्पर्धेचा अंतिम सामना ६ मे रोजी होणार आहे.

****

औरंगाबाद इथं आज आणि उद्या शेक्सपिअर महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आज सायंकाळी साडे सहा वाजता गोविंदभाई श्रॉफ सभागृहात होणाऱ्या या महोत्सवात प्राध्यापक मुस्तजीब खान यांचं शेक्सपिअरची नाटकं या विषयावर तर डॉ केशव देशपांडे यांचं राम गणेश गडकरींवर शेक्सपिअरचा प्रभाव या विषयावर व्याख्यान होणार आहे. या महोत्सवात 'ओळखलंत का मला', ही एकांकिका आज सादर होईल. तर उद्या सायंकाळी 'कसाब आणि मी' हे नाटक सादर होणार आहे.

//******//










No comments: