आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Thursday, 30 May 2019
Wednesday, 29 May 2019
Text - AIR News Bulletin, 29.05.2019....News at 20.00
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29
May 2019
Time 20.00
to 20.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ मे २०१९ सायंकाळी २०.००
****
राज्याच्या
चार लाख चोवीस हजार एकोणतीस कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याला आज मंजुरी
देण्यात आली. राज्यस्तरीय बॅंकर्स समितीची आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
उपस्थितीत बैठक झाली. गेल्या वर्षी पीक कर्जाच्या उद्दिष्टाच्या केवळ चोपन्न टक्केच
कर्जं वितरीत झाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली.
बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणं अपेक्षित
आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
केंद्र
शासनाच्या मुद्रा बॅंक, प्रधानमंत्री जनधन योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन
ज्योती बीमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना यासारख्या योजनांच्या पत पुरवठ्यात
वाढ करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थ राज्यमंत्री
दीपक केसरकर यांच्यासह विविध विभाग आणि बँकांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित
होते.
****
राज्यात
दुष्काळग्रस्त भागात कामाची मागणी होताच, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून तातडीने काम उपलब्ध करुन देण्याची
सूचना रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी आज मुंबईत दिली. राज्यात चालू आठवड्यात
रोजगार हमी योजनेच्या कामावरच्या मजूर उपस्थितीमध्येही वाढ झाली असून सध्या राज्यात
३८ हजार ८११ कामं सुरू असून त्यावर तीन लाख ७७ हजार ३२८ मजूर काम करत असल्याचं त्यांनी
सांगितलं.
****
राज्यात
दिव्यांग धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांग हक्क आयोगाची स्थापना
केली जाणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय विभागाचे मंत्री राजकुमार
बडोले यांनी आज मुंबईत दिली.
दिव्यांगांसाठी
गठित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सल्लागार मंडळाची बैठक आज झाली, त्यावेळी ते
बोलत होते. दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगिण विकासाच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि
विशेष सहाय विभागानं नव्यानं धोरण निश्चित केलं आहे, यात दिव्यांगांना शिक्षण, त्यांना
उत्तम आरोग्य, रोजगार आणि कौशल्य विकास साधण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
ओडिसाचे मुख्यमंत्री म्हणून बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन
पटनायक यांनी आज पाचव्यांदा शपथ घेतली. त्यांच्यासोबत २० मंत्र्यांनीही शपथ घेतली.
शपथविधीनंतर पटनायक यांनी मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर केलं. गृह आणि सामान्य प्रशासन
खातं त्यांनी स्वतःकडे ठेवलं. अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे
नेते पेमा खांडू यांनी शपथ घेतली. राज्यपाल बी.डी.मिश्रा यांनी इटानगरमध्ये खांडू आणि
त्यांच्या मंत्रीमंडळातल्या अकरा सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन ४५ मिनिटे चर्चा केली. काल
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा
केली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर मनसेला आघाडीत घेण्याच्या
हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुकीतल्या पराभवानंतर काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी
काँग्रेस महाआघाडीची मंथन बैठक झाली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीत मनसेला बरोबर घ्यावं
असा सूर महाआघाडीच्या नेत्यांचा होता.
****
राज्यात
आतापर्यंत तीनशे चौऱ्याहत्तर तंबाखूमुक्ती केंद्रांची स्थापना करण्यात आली असल्याची
माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. येत्या शुक्रवारी जागतिक तंबाखू विरोधी
दिन साजरा होत आहे, यापार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ते आज बोलत होते. राज्यातल्या आठशे चार आरोग्य संस्था
आणि दोन हजार सातशे पंचावन्न शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
अकोला
लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीत १३९ मतांचा झालेला फरक हा मानवी चूक
असल्याचं स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी
दिलं आहे. कर्मचाऱ्यांकडून झालेली ही चूक असून यात कोणतीही अनियमितता झाली नसल्याचं
पापळकर म्हणाले.
दरम्यान,
वंचित बहुजन आघाडी मात्र, अकोला लोकसभा मतदारसंघातली निवडणूक रद्द करण्याच्या मागणीवर
कायम आहे, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अकोला
जिल्ह्यात, आणीबाणीच्या काळात मिसा कायद्याखाली कारावास भोगलेल्या पंच्याऐंशी व्यक्तींना
शासनानं दरमहा दहा हजार रुपये मानधन सुरु केलं आहे. तर, अशा कारावासात मरण पावलेल्या
बंदींच्या विधवा पत्नींना पाच हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. या सर्वांचं मानधन
आज खासदार संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आलं.
****
परभणी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाथरी शाखेअंतर्गत येणाऱ्या गावांतल्या शेतकऱ्यांना
दुष्काळ अनुदानाचा दुसरा हप्ता त्वरीत द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे
करण्यात आली आहे. या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसनं
दिला आहे.
****
Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.05.2019....Evening Bulletin
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29
May 2019
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ मे २०१९ सायंकाळी ६.००
****
शेती
आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बॅंकांनी पत पुरवठा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत
ते आज बोलत होते. राज्याच्या चार लाख चोवीस हजार एकोणतीस कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा
आराखड्याला यावेळी मंजुरी देण्यात आली. गेल्या वर्षीच्या पीक कर्जाच्या उद्दिष्टाच्या
केवळ चोपन्न टक्केच कर्जांचं वितरीत झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, बॅंकर्स
समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे, असं
मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. केंद्र शासनाच्या मुद्रा बॅंक, प्रधानमंत्री जनधन
योजना, स्टॅण्ड अप इंडिया, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना
आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना यासारख्या योजनांमधली पत पुरवठ्याची कामगिरी देखील
सुधारली पाहिजे, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बँकांना बजावलं. कृषिमंत्री चंद्रकांत
पाटील, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह विविध विभागांचे आणि बँकांचे वरिष्ठ
अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
****
बिजू
जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक यांनी आज पाचव्या वेळी ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ
घेतली.
भारतीय
जनता पक्षाचे नेते पेमा खांडू यांनी अरुणाचल प्रदेशचे दहावे मुख्यमंत्री म्हणून आज
शपथ घेतली. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल बी.डी.मिश्रा यांनी इटानगरमध्ये खांडू आणि त्यांच्या
मंत्रीमंडळातल्या अकरा मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
****
या
वर्षी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याच्या मुदतीत केंद्र सरकारनं
आज वाढ केली असून, आता, या अभ्यासक्रमांना येत्या एकतीस मेपर्यंत प्रवेश घेता येणार
आहे. याआधी ही मुदत अठरा मे पर्यंत होती. मात्र, या वाढीव मुदतीत, याआधी प्रवेश घेतलेल्या
विद्यार्थ्यांना घेतलेला प्रवेश रद्द करून दुसऱ्या अभ्यासक्रमासाठी अर्ज करता येणार
नाही, असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.
****
राष्ट्रीय
तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आत्तापर्यंत राज्यभरात तीनशे चौऱ्याहत्तर तंबाखूमुक्ती
केंद्रांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली
आहे. येत्या एकतीस तारखेला येणाऱ्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या औचित्यानं मुंबईत
झालेल्या एका कार्यक्रमात ते आज बोलत होते. राज्यातल्या आठशे चार आरोग्य संस्था आणि
दोन हजार सातशे पंचावन्न शाळा तंबाखूमुक्त
करण्यात आल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं. आपण सर्वांनी मिळून राज्य तंबाखूमुक्त
करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं आवाहनही आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी
केलं आहे.
****
बीड
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी तागाच्या पिशव्या निर्मिती
प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या तीन ते पंधरा जून या कालावधीत हे प्रशिक्षण
बीड ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रामध्ये देण्यात येणार आहे. प्लॅस्टिकच्या
पिशव्यांवर आलेल्या बंदीमुळे इतर पिशव्यांची मागणी वाढलेली असल्यामुळे या व्यवसायातली
संधी लक्षात घेत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं असून, विशेषत: बचत गटातल्या महिलांनी
या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्रशिक्षण संस्थेनं केलं आहे.
****
अकोला
लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी झालेलं मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मोजलेलं मतदान
यात एकशे एकोणचाळीस मतांचा फरक आढळल्या प्रकरणी, कर्मचाऱ्यांची मानवी चूक झाली आहे,
कुठंही अनियमितता झालेली नाही, असं अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळवलं
आहे. मात्र, वंचित बहूजन आघाडीनं अकोला लोकसभा मतदारसंघातली निवडणूक या मुद्दावर रद्द
करण्याची मागणी कायम ठेवली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अकोला
जिल्ह्यातल्या, आणीबाणीच्या काळात मिसा कायद्याखाली कारावास भोगलेल्या पंच्याऐंशी व्यक्तींना
शासनानं दरमहा दहा हजार रुपये मानधन सुरु केलं आहे. तर, अशा कारावासात मरण पावलेल्या
बंदींच्या विधवा पत्नींना पाच हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. या सर्वांचं मानधन
आज खासदार संजय धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरीत करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
परभणी
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाथरी शाखेअंतर्गत येणाऱ्या गावांतल्या शेतकऱ्यांना दुष्काळ
अनुदानाचा दुसरा हप्ता त्वरीत द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात
आली आहे. या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसनं दिला असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.05.2019 13.00
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 May
2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ मे २०१९ दुपारी १.०० वा.
****
जम्मू-कश्मीरमधे
कुलगाम जिल्ह्यातल्या ताज़ीपुरा मोहम्मदपुरा भागात आज पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दल
यांच्यात झालेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला. या भागात दहशतवादी लपले असल्याची
माहिती मिळाल्यानंतर लष्कर, केंद्रीय राखीव पोलिस दल आणि जम्मू-कश्मीर पोलिसांच्या
संयुक्त पथकानं या भागात शोध मोहीम हाती घेतली. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर झालेल्या चकमकीत हा अतिरेकी
मारला गेला.
****
परदेशातल्या
संपत्तीसंदर्भात मनी लाँडरिंग प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांना सक्त वसुली संचालनालयानं
आज नव्यानं समन बजावलं असून, उद्या चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. वाड्रा तपासात
सहकार्य करत नसल्यानं त्यांची कोठडी मिळावी, अशी मागणीही संचालनालयानं दिल्ली उच्च
न्यायालयाकडे केली आहे. वाड्रा यांच्या लंडनमध्ये
कोट्यवधी रुपये मूल्याच्या अनेक इमारती आणि सदनिका असल्याची नवी माहिती मिळाल्याचं
सक्त वसुली संचालनालयानं आज न्यायालयाला सांगितलं.
****
परदेशात
जाण्याची परवानगी मिळवताना न्यायालयाकडे जमा केलेले दहा कोटी रुपये परत मिळावेत, अशी
मागणी करणारी, काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार कार्ती चिदंबरम यांची याचिका सर्वोच्च
न्यायालयानं आज फेटाळून लावली. कार्ती चिदंबरम यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभाग आणि
सक्त वसुली संचालनालयानं गुन्हेगारी खटले दाखल केलेले आहेत. आपण ही रक्कम कर्ज घेऊन
जमा केली असून, त्यावर व्याज भरावं लागत आहे, असं प्रतिपादन कार्ती यांनी आज केलं.
त्यावर, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं, कार्ती यांनी आपल्या
मतदारसंघाकडे लक्ष पुरवावं, असं बजावत त्यांची याचिका फेटाळली.
****
राज्यातल्या
जलाशयांमध्ये सध्या तेरा पूर्णांक एक दशांश टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी
याच सुमारास हा साठा तेवीस पूर्णांक चौदा शतांश
टक्के इतका होता. सर्वाधिक जलसाठा कोकण विभागात तेहतीस पूर्णांक एकोणसत्तरदशांश टक्के आहे, तर मराठवाडा विभागात सर्वात कमी म्हणजे
केवळ दोन पूर्णांक शहाऐंशी दशांश टक्के, इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी मराठवाड्यात
याच काळात वीस टक्क्यांहून जास्त पाणीसाठा उपलब्ध होता.
राज्यात
सध्या सहा हजार दोनशे नऊ टँकर्सनं चार हजार नऊशे वीस गावं आणि दहा हजार पाचशे सहा वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत
आहे. यात औरंगाबाद विभागात सर्वाधिक म्हणजे दोन हजार दोनशे शहाऐंशी गावं आणि सातशे
पंच्याऐंशी वाड्यांना तीन हजार दोनशे तेहतीस टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत
असल्याची माहिती,राज्य सरकारनं दिली आहे.
****
सध्याच्या
तीव्र दुष्काळी परिस्थितीत जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीनं टँकरद्वारे पिण्याच्या
पाण्याचा पुरवठा करताना २०११ च्या लोकसंख्येऐवजी सध्याची लोकसंख्या विचारात घेण्याचे
आदेश राज्य शासनाने दिले आहेत, अशी माहिती पाणी पुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ
खोत यांनी दिली आहे. त्यानुसार आता ग्रामीण भागात प्रतिव्यक्ती वीस लिटर,तसंच मोठ्या
जनावरांसाठी प्रती जनावर पस्तीस लिटर, वासरांसाठी दहा लिटर तर शेळ्या मेंढ्यांसाठी
प्रत्येकी तीन लिटर इतका दैनंदिन पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिल्याचं खोत यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या
दूध संघांनी दूध पिशव्यांचं संकलन, पुनर्खरेदी किंवा पुनर्प्रक्रीया व्यवस्थेचा आराखडा
पंधरवड्यात सादर करावा, असे निर्देश पर्यावरणमंत्री
रामदास कदम यांनी दिले आहेत. प्लास्टीकबंदीबाबत उच्चाधिकार समितीची बैठक काल मुंबईत
झाली, त्यावेळी ते बोलत होते. दिलेल्या मुदतीत हा आराखडा सादर न करणाऱ्या पॅकिंग दूध
प्रकल्पांवर प्लास्टीक बंदी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही कदम
यांनी दिला आहे.
****
दक्षिण
आफ्रिकेतल्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पांच्या धर्तीवर महाराष्ट्रातल्या सहाही
व्याघ्रप्रकल्पांचा विकास करण्यासाठी आणि राज्यातलं वाघांचं वैभव देश विदेशातल्या पर्यटकांपर्यंत
पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती राज्याचे पर्यटन
मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. नैसर्गिक अधिवासामुळे राज्यातल्या वाघांची संख्या वाढत असून, वाघांच्या संख्येसंदर्भात महाराष्ट्र
देशात पाचव्या क्रमांकावर पोहोचला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राज्यात विशेष व्याघ्र
दलाची स्थापना करण्यात आल्याची माहितीही रावल यांनी दिली आहे.
****
Subscribe to:
Posts (Atom)
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...
-
आकाशवाणी औरंगाबाद. संक्षिप्त बातमीपत्र ३० जून २०१७ सकाळी १०.०० वाजता **** देशातली सर्वात मोठी कर सुधारणा म्हणून ओळखली जाणारी...
-
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad. Date: 18 February 2019 Time: 8:40 to 8:45 am آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ: ۱۸ ؍فر...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...