Wednesday, 6 September 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 06.09.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 SEP. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ सप्टेंबर २०१ दुपारी १.००वा.

****

भारत आणि म्यानमारच्या सीमेवर सुरक्षा आणि स्थैर्य कायम राखणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान म्यानमारच्या दौऱ्यावर असून, त्यांनी आज म्यानमारच्या स्टेट कौन्सिलर आँग सान सू की यांची भेट घेतली, त्यानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. भारताच्या ताब्यात असलेले म्यानमारचे ४० कैदी लवकर सोडणार असल्याचं, तसंच म्यानमारच्या नागरिकांना भारताकडून नि:शुल्क व्हिसा देणार असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी जाहीर केलं. म्यानमारला आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या धमकीवर भारतानं कठोर भूमिका घेतल्याबद्दल सू की यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.

यावेळी उभय देशांदरम्यान आठ महत्वपूर्ण करार करण्यात आले. तीन वर्षीय सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सहयोग, महिला पोलिस प्रशिक्षण केंद्राचं आधुनिकीकरण, म्यानमारला तंत्रज्ञान शिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी सहकार्य करणं, आदी करारांचा यात समावेश आहे.

पंतप्रधान आज बागा या म्यानमार मधल्या ऐतिहासिक शहरातल्या आनंदा मंदिराला भेट देणार आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या मंदिराचा जीर्णोद्धार करत आहे. 

****

दहशतवाद्यांना निधी पुरवण्याच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आज श्रीनगरमध्ये अकरा ठिकाणी आणि दिल्लीमध्ये पाच ठिकाणी छापे घातले. फुटिरवादी नेत्यांना पाकिस्तानातून निधी मिळत असून, त्याचा उपयोग काश्मीर खोऱ्यात तणाव निर्माण करण्यासाठी केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर हा तपास करण्यात आला.

****

कुपोषणमुक्त भारतासाठी नीति आयोगानं राष्ट्रीय पोषण धोरणाची सुरुवात केली आहे. पोषणाला राष्ट्रीय विकास आराखड्यात केंद्रस्थानी ठेवण्याचं या धोरणाचं उद्दिष्ट आहे. हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. एम. एस. स्वामीनाथन आणि नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी नवी दिल्ली इथं पोषण धोरणाची सुरुवात केली. या धोरणात अन्न, आरोग्य सेवा, उत्पन्न आणि पेयजल या चार तत्वांमध्ये ताळमेळ राखण्यावर भर देण्यात आला आहे.

****

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं सिरसा इथल्या डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात तपास करण्याची परवानगी दिली आहे. न्यायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हा तपास करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले. यासाठी न्यायालय आयुक्त म्हणून निवृत्त न्यायमूर्ती के. एस. पवार यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिसांनी तपासाची पूर्ण तयारी केली असून, तपासादरम्यान व्हिडिओ रेकोर्डिंग करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

पुढच्या तीन महिन्यात सरकार तीन नद्यांना जोडणारा प्रकल्प आणि नवीन बंधाऱ्यांचं काम सुरु करणार असल्याचं केंद्रीय जल संसाधन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं झालेल्या मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. पूर आणि दुष्काळ दोन्ही आपत्तींचा सामना करण्यासाठी नदीजोड प्रकल्प अत्यंत महत्वाचा असल्याचं ते म्हणाले.

****

राज्यातल्या पोलिस नियंत्रण कक्षांचं आधुनिकीकरण करण्यासाठी आणि मुंबईत वरळी इथं नियंत्रण, नियोजन आणि माहितीचं विश्लेषण केंद्र स्थापन करण्यासाठी राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला. ४२९ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असल्याचं यात म्हटलं आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना लवकरात लवकर सहकार्य मिळण्यासाठी नियंत्रण कक्षांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचं गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं.   

****

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत भारताची सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार चीनची शुआई पेंग यांचा उपांत्य फेरीचा सामना आज होणार आहे.

दरम्यान, भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याची कॅनडाची जोडीदार गॅब्रियेला डाब्रोव्हॅस्की या जोडीचं मिश्र दुहेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. उपांत्यपूर्व फेरीत न्यूझिलंडचा मायकेल व्हीनस आणि तैपेर्इची हाओ-चिंग चॅन या जोडीनं बोपण्णा-डाब्रोव्हॅस्की जोडीवर ४-६, ६-३, १०-८ असा विजय मिळवला.

****

भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यातला एकमेव ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट सामना आज कोलंबो इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे सहा वाजता सामन्याला सुरुवात होईल. यापूर्वी झालेली कसोटी मालिका, तसंच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतानं यजमान श्रीलंका संघावर निर्भेळ विजय मिळवला आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथं धुळे-सोलापूर महामार्गवर ट्रक आणि इंडिका कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

****

कन्याकुमारीच्या स्वामी विवेकानंद केंद्राच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं येत्या १० सप्टेंबरला विश्वबंधुत्व दिनानिमित्त भारत - एक दिव्य शक्ती या विषयावर निवृत्त मेजर जनरल जी. डी. बक्षी यांचं व्याख्यान आयोजित केलं आहे. औरंगाबादच्या एमजीएम महाविद्यालयाच्या परिसरातल्या रुक्मिणी सभागृहात हे व्याख्यान होणार आहे. 

****






No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...