Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 SEP. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ सप्टेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** देशाची भावी पिढी घडवण्याचं श्रेय शिक्षकांना द्यायला हवं - उपराष्ट्रपतींचं
प्रतिपादन; राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान
** बारा दिवस भक्तीभावानं पूजन केलेल्या गणपतीला
काल ढोल ताशांच्या गजरात निरोप
** गणेश विसर्जनादरम्यान राज्यभरात तेरा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू
आणि
** कोयना
धरण परिसरासह कोकण किनारपट्टीला काल भूकंपाचा सौम्य धक्का
****
राष्ट्र उभारणीत शिक्षणाचं स्थान सर्वाधिक महत्त्वाचं असून, देशाची भावी पिढी
घडवण्याचं श्रेय शिक्षकांना द्यायला हवं, असं प्रतिपादन, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
यांनी केलं आहे. काल शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीत उपराष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय
शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये
राज्यातल्या २५ शिक्षकांचा समावेश असून, मराठवाड्यातल्या लातूर इथले रामकिसन सुरवसे,
गोपाल सूर्यवंशी, उस्मानाबाद इथल्या उर्मिला भोसले, तसंच बीड इथले नंदा राऊत, आणि कमलाकर
राऊत यांना यावेळी राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. सन्मान पदक, प्रमाणपत्र
आणि ५० हजार रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
देशांतर्गत कृषी उत्पादनं, जागतिक बाजारात नेण्यासाठी लवकरच धोरण तयार केलं
जाईल, अशी माहिती, केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे.
ते काल नवी दिल्ली इथं एका कृषी संमेलनात बोलत होते. शेतमालाला जागतिक स्तरावर चांगला
भाव मिळाला पाहिजे. यासाठी एक धोरण तयार करणार असल्याचं प्रभू यांनी सांगितलं.
****
सर्वसामान्यांच्या
जीवनात कायापालट घडवून आणण्यासाठी काम करा, असा संदेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी भारतीय प्रशासन सेवा - आय ए एस मध्ये निवड झालेल्या नवीन अधिकाऱ्यांना दिला.
२०१६ च्या तुकडीतून महाराष्ट्र केडरमध्ये
निवड झालेल्या आय ए एस अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते काल मुंबईत बोलत होते.
दरम्यान, गणेशोत्सवाचं,
आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँडिग करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी
म्हटलं आहे. मुंबईत गिरगाव चौपाटी इथं, गणेश विसर्जन कार्यक्रमास भेट दिल्यानंतर ते
पत्रकारांशी बोलत होते.
****
बारा दिवस भक्तीभावानं पूजन केलेल्या गणपतीला काल ढोल ताशांच्या गजरात निरोप देण्यात
आला. मुंबईसह राज्यभरात गणेश विसर्जन सोहळा काल मोठ्या उत्साहात साजरा झाला. राज्यातल्या
प्रमुख शहरांमध्ये विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आबालवृद्धांच्या गर्दीनं रस्ते फुलून
गेले होते. मुंबईत पहाटेपर्यंत गणेशमूर्तींचं विसर्जन सुरू होतं, लालबागच्या राजाचं
विसर्जन आज सकाळी होणार आहे. ठाण्यातही पहाटे चार वाजेदरम्यान समुद्राला ओहोटी आल्यानं,
मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन थांबवण्यात आलं होतं, सकाळी सात वाजेनंतर विसर्जन पुन्हा
सुरू होणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
पुण्यातही मानाच्या गणपतींसह विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींच्या
विसर्जन मिरवणुकीत, हजारोच्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते.
नाशिक शहरात भाविकांनी गोदावरी पात्रात गणेशमूर्तीचं विसर्जन केलं. प्रदूषण टाळण्यासाठी
‘‘देव द्या - देवपण घ्या’’ ही गणेश मूर्तींचं दान स्वीकारण्याची चळवळ हे नाशिकच्या
गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य आहे. कालही या मोहिमेंतर्गत, दोन लाखांवर गणेशमूर्ती दान म्हणून
स्वीकारण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
मराठवाड्यात औरंगाबादसह सर्वत्र, गणेशविसर्जन सोहळा पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशांच्या
गजरात साजरा झाला. त्यामुळे अनेक ठिकाणच्या विसर्जन मिरवणुका यंदा डॉल्बीमुक्त ठरल्या.
औरंगाबाद इथं जिल्हा परिषद मैदानावर असलेल्या विसर्जन विहिरीत, काल सकाळपासूनच घरगुती
गणपतींचं विसर्जन सुरू होतं. शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची विसर्जन मिरवणूक,
दुपारच्या सुमारास निघाली, त्या पाठोपाठ इतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना
प्रारंभ झाला. शहरात विविध भागात विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत
बहुतांश ठिकाणी विसर्जन सुरू होतं. विसर्जन सोहळा शांततेत व्हावा, यासाठी पोलिस बंदोबस्तासह
ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं मिरवणुकीवर नजर ठेवली जात होती.
बीड जिल्ह्यातही गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात, गुलालाची उधळण करत, गणपती बाप्पांला
निरोप देण्यात आला. रात्री साडे बारा वाजेपर्यंत विसर्जन मिरवणूक सुरू होती. स्वयंसेवी
संघटनांतर्फे गणेश भक्तांना, या विसर्जन मिरवणुकीत पाणी तसंच फळं वाटप करण्यात आलं.
नांदेड
जिल्हा, तसंच
शहरात, दुपारनंतर
श्री विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. भाविकांच्या सुरक्षेसाठी विसर्जन घाटावर, १७०
जीवन रक्षक तैनात करण्यात आले होते. शहरात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला
होता.
लातूर
इथं, पारंपरिक
वाद्यांच्या गजरात, मानाच्या, आजोबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीनं गणेश विसर्जन सोहळ्याला
प्रारंभ झाला. महापालिकेच्या वतीनें शहरात पाच ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती.
या सर्वच ठिकाणी अग्निशामक दला सोबत, जीवनरक्षक तैनात करण्यात आले होते.
परभणी
इथं, सायंकाळपर्यंत
बहुतांश घरगुती गणपतींचं विसर्जन झालं होतं. महापालिकेच्या वतीनं शहरात अनेक ठिकाणी
गणेश मूर्तींचं संकलन करून, त्यांचं विसर्जन करण्यात आलं. मिरवणूक मार्गावर सामाजिक
संघटनांच्यावतीनं पाणी आणि फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.
हिंगोली
इथं, मोदकाचा
गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या, चिंतामणी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी, भाविकांनी
काल सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या.
जालना
जिल्ह्यात गणपती विसर्जन शांततेत पार पडलं. भोकरदन तालुक्यात वालसावंगी इथं मुस्लीम
बांधवांनी विसर्जन मिरवणुकीचं आरती करून स्वागत केलं.
उस्मानाबाद
जिल्ह्यातही गणेश विसर्जन सोहळा, मोठ्या उत्साहात साजरा झाल्याचं वृत्त आहे.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
गणेश
विसर्जनादरम्यान, काल राज्यभरात तेरा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यापैकी पाच
जण मराठवाड्यातले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात अशा दोन घटनांमध्ये चार जण
मरण पावले. पैठण तालुक्यात बिडकीन इथं काल दुपारच्या
सुमारास शिवनाई तलावात तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गणपती विसर्जनासाठी
चार मुलं या तलावात उतरली असता, तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही तिन्ही मुलं
१२ ते १५ वर्ष वयोगटातली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दुसरी घटना दौलताबाद जवळ, केसापुरी तांडा इथं घडली. गणपती विसर्जनासाठी तलावात उतरलेला, पंधरा वर्षांचा मुलगा पाण्यात बुडाला. नागरिकांनी त्याला तातडीनं औरंगाबाद इथल्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - घाटी रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला
तपासून मृत घोषीत केलं.
बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यात उमरी इथं, पंधरा वर्षीय
मुलाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
राज्यात
इतरत्रही गणेश विसर्जनादरम्यान, अशा घटना घडल्या. पुणे जिल्ह्यात चार जणांचा पाण्यात
बुडून मृत्यू झाला. जळगाव तसंच अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर नाशिक आणि धुळे जिल्ह्यात प्रत्येकी एका
तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कोयना धरण परिसरासह कोकण किनारपट्टीला काल
भूकंपाचा सौम्य धक्का बसला. सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास बसलेल्या या धक्क्याची
तीव्रता रिश्टर स्केलवर तीन एवढी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून
साडे तेरा किलोमीटरवर वारणेच्या खोऱ्यात असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या बिंदुसरा नदीवरील पूल, ८४ वर्षे जुना आणि जीर्ण झाला असून, पूलाचा
डेक स्लॅब वारंवार कोसळत असल्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे
पूल सर्व प्रकारच्या वाहतुकी करता बंद ठेवण्यात यावा, असं भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या, प्रकल्प
सुधारणा विभागाकडून कळवण्यात आलं आहे. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत या पुलावरून होणारी
वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
****
भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यातला एकमेव टी-20
सामना, आज कोलंबो इथं, खेळला जाणार आहे. यापूर्वी झालेली कसोटी मालिका, तसंच, एकदिवसीय
सामन्यांच्या मालिकेत भारतानं यजमान श्रीलंका संघावर निर्भेळ विजय मिळवला आहे.
****
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा
रोहन बोपण्णा आणि त्याची कॅनडाची जोडीदार गॅब्रियल डॅब्रोव्हॅस्की या जोडीचं मिश्र
दुहेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडचा मायकल व्हिनस
आणि तैपेर्इची हाओ-चिंग चॅन या जोडीनं बोपण्णा-डॅब्रोव्हॅस्की जोडीवर ४-६, ६-३, १०-८
असा विजय मिळवला. या स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या सानिया मिर्झाचा उपांत्य फेरीचा
सामना आज होणार आहे.
****
भारत सरकार मॅट्रिकोत्तर
शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी, राज्य सरकारनं, ६०५
अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे.
****
No comments:
Post a Comment