Tuesday, 5 September 2017

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 05.09.2017 11.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

०५ सप्टेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

     आज अनंत चतुर्दशी. गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. मराठवाड्यात सर्वत्र गणेश विसर्जनासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला असून, विसर्जनासाठी ठराविक जागा नेमून दिल्या आहेत. औरंगाबाद इथल्या श्री गणेश महासंघ उत्सव समितीतर्फे थोड्याच वेळात संस्थान गणपती इथून मुख्य विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. शहरात औरंगपुरा भागात जिल्हा परिषद मैदानावर मुख्य विर्सजन विहीर असून शिवाजीनगर, हडको एन १२, हर्सुल, सातारा परिसर, चिकलठाणा, संर्घषनगर, मुकुंदवाडी याठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

      परभणी इथं महापालिकेच्यावतीनं घरगुती गणेशमूर्तींचं संकलन करून, त्यांचं विसर्जन केलं जाणार आहे. प्रभाग समिती अ अंतर्गत विसावा क्वॉर्नर इथं, प्रभाग समिती क अंतर्गत दुर्गा माता मंदीर आशीर्वाद नगर इथं, तर प्रभाग समिती ब अंतर्गत कृत्रीम रेशीम केंद्र कार्यालय इथं गणेशमूर्ती जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जलशुद्धीकरण केंद्राजवळ तयार केलेल्या हौदातच गणेशभक्तांनी गणपती विसर्जन करण्याचं आवाहन मनपा आयुक्त राहूल रेखावार यांनी केलं आहे.

      हिंगोली शहरात कयाधू नदीसह चार ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली  आहे. विसर्जन मार्गावरचे अडथळे दूर करण्यात आले असून, विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

****

पैठण इथं जायकवाडी धरणात सुमारे ८१ टक्के पाणीसाठा झाला आहे. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्याहस्ते काल नाथसागराचं जलपूजन करण्यात आलं. यावेळी एका शिष्टमंडळानं खासदार खैरे यांची भेट घेऊन, विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं. यात पैठण शहरातल्या विकास कामांना चालना द्यावी, जायकवाडी अंतर्गत प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करावीत, आदी मागण्यांसह १९९० तसंच २००६ साली नियोजन न करता नाथसागरातून अचानक विसर्ग केल्यानं, नुकसानास जबाबदार तत्कालिन अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी चौकशी समिती नेमावी आदी मागण्यांचा समावेश आहे.

****

आज शिक्षक दिन, या निमित्तानं नवी दिल्लीत आज राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. राज्यातल्या २५ शिक्षकांचा यावेळी गौरव होणार असून, यामध्ये मराठवाड्यातल्या पाच शिक्षकांचा समावेश आहे. लातूर इथले रामकिसन सुरवसे, गोपाल सूर्यवंशी, उस्मानाबाद इथल्या उर्मिला भोसले, तसंच बीड इथले नंदा राऊत, आणि कमलाकर राऊत यांचा यामध्ये समावेश आहे. सन्मान पदक, प्रमाणपत्र आणि  ५० हजार रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 01 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 June 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...