Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 4 October 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ४ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत २२ सप्टेंबर
अखेर ५६ लाख ५९ हजार शेतकरी कुटुंबांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांमध्ये
सत्त्याहत्तर लाख एकोणतीस हजार खातेदारांचा समावेश आहे. सहकारमंत्री
सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली. आज मंत्रालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्या
जिल्ह्यातल्या सगळ्या बँकांची परिपूर्ण माहिती प्राप्त होईल, त्या
जिल्ह्यात तातडीनं कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल, अशी
माहिती देशमुख यांनी दिली. शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक तातडीनं संबंधित बँकेत
द्यावा, अशी सूचनाही सहकारमंत्र्यांनी यावेळी केली.
****
दूध उत्पादकांना शासनानं ठरवून दिलेल्या दरानुसार खरेदी
दर न देणाऱ्या सहकारी दूध संघांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव
जानकर यांनी दिले आहेत. राज्य शासनानं जाहीर केलेले खरेदी दर काही दूध संघांनी लागू केले नाहीत, तर काहींनी
लागू करून पुन्हा दर कमी केल्याच्या
तक्रारी राज्य सरकारला प्राप्त झाल्यानं, जानकर यांनी हा आदेश दिला आहे.
****
रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक
वर्षातलं चौथं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर केलं. बँकेनं व्याज दरात कोणतेही बदल केलेलं
नसून, रेपो दर ६ टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो दर ५ पूर्णांक ७५ टक्क्यांवर कायम आहे.
देशाचा आर्थिक विकास दर ६ पूर्णांक ७ टक्के इतका राहील असा अंदाजही बँकेनं वर्तवला
आहे.
****
भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी
रजनीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षांसाठी ते या पदावर राहतील.
रजनीश कुमार सध्या राष्ट्रीय बँकींग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
****
गुजराथमधल्या कांडला बंदराचं नाव बदलून ते दीनदयाल बंदर असं करण्यास, केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत स्वित्झर्लंड, म्यानमार आणि लिथुआनिया या देशांबरोबरच्या महत्त्वाच्या
करारांना मंजुरी दिली.
****
पंचकुला हिंसाचार प्रकरणातली आरोपी हनीप्रीत हिला न्यायालयानं
सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. काल हनीप्रीतला अटक केल्यानंतर आज तिला
पंचकुला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. पोलिसांनी न्यायालयाकडे चौदा दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.
दरम्यान खंडणीच्या गुन्ह्याखाली ठाणे पोलिसांच्या ताब्यात
असलेल्या इकबाल कासकरच्या पोलिस कोठडीत ठाणे न्यायालयानं दहा ऑक्टोबरपर्यंत वाढ केली
आहे.
****
महत्त्वाकांक्षी मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाच्या विरोधात ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर
तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या महामार्गासाठी
जमिनी संपादित करता याव्यात, यासाठी सरकारनं महाराष्ट्र महामार्ग दुरुस्ती अधिनियम
२०१६ ला नुकतीच मंजुरी दिली होती. हा अधिनियम असंवैधानिक असल्याचं सांगत, शेतकऱ्यांनी या
अधिनियमालाच आव्हान दिलं आहे.
****
यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू पावलेल्या
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज भेट
घेतली. कीटकनाशक फवारलेल्या शेताचीही खोत यांनी पाहणी केली. आरोग्य यंत्रणा आणि
कृषी सहाय्यकांकडूनही त्यांनी माहिती घेतली. जबाबदार
कृषी अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांची चौकशी करून, दोषींवर कारवाई
करणार असल्याचं, खोत यांनी सांगितलं.
****
धुळे पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे यांना
सुमारे नऊ हजारांची लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं काल रात्री
ताब्यात घेतलं. देवरे यांनी तीन शिक्षिकांची
मूळ सेवा पुस्तकं अद्ययावत करण्यासाठी लाचेची मागणी केली होती.
****
बडोदा इथं होणाऱ्या एक्क्याण्णवाव्या
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुकांना उद्यापासून येत्या
अकरा तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. रविवार वगळता इतर दिवशी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात
हे अर्ज दाखल करता येतील. परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी
यांनी ही माहिती दिली.
****
मराठवाड्यात सर्व आठही जिल्ह्यातल्या दोन हजार १९ ग्रामपंचायतींसाठी
येत्या शनिवारी सात ऑक्टोबरला मतदान होत आहे. यंदा सरपंच पदासाठी थेट मतदान होणार असून, या निवडणुकीच्या प्रचाराची मुदत उद्या संपत आहे.
दरम्यान, नांदेड वाघाळा महापालिकेसाठीयेत्या ११ ऑक्टोबरला मतदान होणार
आहे. या निवडणुकीत मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा,
यासाठी सर्व आस्थापनांनी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी द्यावी,
असे निर्देश प्रशासनानं जारी केले आहेत.
****
No comments:
Post a Comment