Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 1 January 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ जानेवारी २०१८ दुपारी
१.०० वा.
****
देशासमोर असलेली सामाजिक आर्थिक आव्हानं
सोडवण्यासाठी वैज्ञानिकांनी संशोधन आणि नवीन उपक्रमांवर भर द्यावा, असं आवाहन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विख्यात
शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्या
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त आज
कोलकाता इथं आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून
सहभाग नोंदवला, त्यावेळी ते बोलत होते. सामान्य माणसाशी संबंधित
प्रश्न सोडवण्यासाठी विज्ञान प्रयोगशाळांनी त्यांच्या साधनसंपत्तीत वाढ करायला पाहिजे,
असं ते म्हणाले. समाजातल्या मागास वर्गासाठी शास्त्रज्ञ, संशोधक आणि विकास संस्थांनी
एकत्रितपणे काम केलं पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. सत्येंद्रनाथ बोस यांना आदरांजली
अर्पण करुन पंतप्रधानांनी, भारतानं जगाला आधुनिक विज्ञानाला गती देणारे अनेक नामवंत
शास्त्रज्ञ दिले असल्याचं नमूद केलं.
****
उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून,
दिल्लीमध्ये दाट धुकं पडलं आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, दिल्लीच्या इंदिरा
गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर, दृश्यमानता पन्नास मीटर पेक्षाही कमी झाल्यानं, विमान
वाहतुक थांबवण्यात आली होती. तसंच दिल्लीहून येणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवरही
धुक्याचा परिणाम झाला आहे. काही गाड्या रद्द, तर काहींच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
यामुळे दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधल्या अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
तेलंगणा सरकारनं आजपासून कृषी क्षेत्रासाठी
२४ तास वीज पुरवठा सुरु केला आहे. राज्यातल्या ३१ जिल्ह्यात जवळजवळ २३ लाख वीज पंपांना
मध्यरात्रीपासून वीज पुरवठा सुरु करण्यात आला. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी गेल्या
विधानसभा निवडणुकीच्या वेळी कृषी क्षेत्राला २४ तास वीज पुरवठा देण्याचं आश्वासन दिलं
होतं. कृषी क्षेत्राची वीजेची मागणी पूर्ण करण्यासाठी तेलंगणा सरकारनं साडे सात हजार
मेगावॅट वीजेची व्यवस्था केली आहे.
****
देशात गेल्या वर्षभरात डेंग्यूची एक
लाख ५० हजार प्रकरणं नोंदली गेली असून, २५० जणांना
या आजारामुळे प्राण गमवावे लागले आहेत. राष्ट्रीय साथीचे रोग नियंत्रण कार्यक्रम
विभागानं संकलित केलेल्या माहितीनुसार डेंग्यूचे सर्वाधिक ६३ बळी
तामिळनाडूत नोंदवण्यात आले. महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात ४१ जणांचा
या आजारामुळे मृत्यू झाला आहे, तर राजधानी दिल्लीत डेंग्युचे नऊ हजार रुग्ण आढळले.
****
मुंबईतल्या कमला मिल आग दुर्घटनाप्रकरणी
संबंधित पबच्या दोन व्यवस्थापकांना अटक करण्यात आली आहे. केविन बावा आणि लिस्बन लोपेज
अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. गेल्या शुक्रवारी इथं घडलेल्या अग्निकांडात
१४ जणांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. पबच्या मालकांविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात
आलेली आहे.
****
केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या
संविधानाबद्दलच्या विधानानं दलित समाजामध्ये काही संभ्रम निर्माण झाला असल्यास त्यांनी
तो दूर करावा, असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं
आहे. ते पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. संविधान हेच प्रत्येक भारतीयाचा धर्मग्रंथ
असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं असून, सरकार संविधानाच्या
बाजुने असल्याचं ते म्हणाले.
****
वाशिम इथं आज भारतीय सैन्यातल्या शूर
सैन्यदल "महार रेजिमेंट" च्या माजी सैनिकांच्या वतीनं पुण्याजवळील भीमा कोरेगांव
इथं एक जानेवारी १८१८ रोजी झालेल्या लढाईचा द्विशतकी स्मृतिदिन पाळण्यात आला. यावेळी
या लढाईत बलिदान दिलेल्या सैनिकांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं. १९६२ च्या भारत-चीन,
१९६५ ला भारत - पाकिस्तान आणि १९७१ ला बांगलादेश मुक्ती या युद्धात आपलं कर्तुत्व गाजवणारे
महार रेजिमेंटचे सैनिक सेवानिवृत्त कॅप्टन केशवराव जुमडे यावेळी अध्यक्षस्थानी होते.
****
रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातल्या
कोसुंब इथं एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात डोंबिवलीच्या एका
महिलेचा मृत्यू झाला, तर एक प्रवासी जखमी झाला. आज सकाळी हा अपघात झाला.
****
टाटा महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेची
मुख्य फेरी आज पुण्यात सुरु होत आहे. या स्पर्धेत एटीपी मानांकनात पहिल्या
५० मध्ये असणारे पाच खेळाडू या मुख्य फेरीत खेळणार आहेत. पात्रता
फेरी पार करुन मरीन सिलीक तसंच गतविजेता रोबर्टो बॉटिस्ता अॅगुट मुख्य फेरीत दाखल
झाले आहेत. याशिवाय अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झालेल्या
दक्षिण आफ्रीकेच्या केविन अॅंडरसन तसंच भारताचा युकी भांबरी या फेरीत खेळणार आहेत.
*****
No comments:
Post a Comment