Wednesday, 3 January 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.01.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३ जानेवारी   २०१८ सकाळी ११.०० वाजता

****

 भारतीय रिपब्लिकन पार्टी बहुजन महासंघानं पुकारलेल्या आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि इतर शहरांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार इथं बससेवा सुरळीत सुरू असून, बहुतांशी शैक्षणिक संस्थांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. जालना तसंच लातूर जिल्ह्यात एस टी महामंडळानं खबरदारीचा उपाय म्हणून बससेवा बंद ठेवली आहे. औरंगाबाद इथं वाहतुक सुरळीत सुरू असून, सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शांतता राखण्याचं तसंच अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

****

 मुस्लीम महिला विवाह संरक्षण अर्थात तिहेरी तलाकसंदर्भातलं विधेयक आज राज्यसभेत सादर होत आहे. कायदामंत्री रवीशंकर प्रसाद हे विधेयक सादर करतील. लोकसभेत हे विधेयक याआधीच मंजूर झालं आहे. या विधेयकात काहीही दुरुस्ती न सुचवता, विधेयक एकमतानं संमत करण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे.

****

 १९९१ ते १९९४ या कालावधीत झालेल्या चारा घोटाळा प्रकरणी सीबीआयचं विशेष न्यायालय आज, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि अन्य पंधरा आरोपींना शिक्षा सुनावणार आहे. गेल्या २३ डिसेंबरला न्यायालयानं या सर्वांना याप्रकरणी दोषी घोषित केलं होतं.

****

 सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेबाबत राज्य शासनानं नवीन नियम जारी केले असून, आता उघड्यावर मलमूत्र विसजर्ण करणं, थुंकणं किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कचरा टाकल्यास, संबंधितांना त्याच जागी दंड करण्याचे धिकारी नगरपालिका आणि परिषदांना देण्यात आले आहेत. असा कचरा केल्यास, शंभर ते पाचशे रुपयांपर्यंतचा दंड तत्काळ भरावा लागेल. केंद्रानं सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यानं सुरू केलेल्या स्वच्छ्ता अभियानांतर्गत हे नवे नियम लागू केल्याचं यासंदर्भातल्या शासन निर्णयात म्हटलं आहे.

*****

No comments: