Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 14 July 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ जुलै २०१८
सकाळी ६.५० मि.
****
Ø गणेशोत्सवादरम्यान थर्माकोल बंदी शिथील करण्यास,
मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
Ø चित्रपटगृहं, फूडमॉल आणि मल्टिप्लेक्समध्ये स्वत:चे
खाद्यपदार्थ नेण्यास प्रेक्षकांना बंधन घातल्यास, एक ऑगस्टपासून कारवाईचा इशारा
Ø शिधापत्रिकाधारकांना आता तूर डाळ ३५ रूपये प्रति
किलो दरानं मिळणार
Ø महिला सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा
‘महिला सेफ्टी ऑडिट’ हा पथदर्शी उपक्रम
आणि
Ø औरंगाबाद पंढरपूर सायकल वारीला प्रारंभ
****
थर्माकोल
वापरावर असलेली बंदी गणेशोत्सवादरम्यान शिथील करण्यास, मुंबई उच्च न्यायालयानं नकार
दिला आहे. थर्माकोल उत्पादक आणि सजावट संघटनेनं याबाबत दाखल केलेली याचिका, न्यायमूर्ती
अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या पीठानं काल फेटाळून लावली. राज्य सरकारनं
प्लास्टिकसह थर्माकोलच्या वापरावर बंदी घातली आहे, येत्या गणेशोत्सवादरम्यान, गणपतीचं
मखर आणि इतर सजावटीपुरती थर्माकोल बंदी शिथील करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली
होती.
****
रत्नागिरी जिल्ह्यातला प्रस्तावित नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प
पर्यावरणपूरक असून, हा प्रकल्प कोणावरही लादणार नसल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी दिलं आहे. विधानसभेत काल यासंदर्भात निवेदन करतांना ते बोलत होते. नाणार
प्रकल्पात संपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, हा प्रकल्प उभारण्यासाठी
तीन लाख कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ग्रामस्थांशी
चर्चा करुनच यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचं
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनानं समाधान
न झाल्यानं, विरोधकांनी कालही या मुद्यावरुन गदारोळ केला. या प्रकल्पासाठी भूसंपादनात
घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. हा प्रकल्प
रद्द करण्याची मागणी करत, विरोधकांनी, अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी केली.
या गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज काल वारंवार तहकूब झालं.
****
मुंबईत दादर इथल्या इंदू मिल परिसरात होत असलेलं
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करण्याचा
सरकारचा प्रयत्न असून, त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी
काल विधानपरिषदेत केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधी
सूचनेच्या माध्यमातून, या स्मारकासाठी साडे बारा एकर जमीन अद्याप हस्तांतरित झालेली
नाही असा आरोप केला. मुख्यमंत्र्यांनी, गजभिये यांचे आरोप फेटाळून लावत, या स्मारकासाठी
शंभर टक्के जागा हस्तांतरित झाली असून, स्मारकासाठी जागेवर आरक्षणही टाकलं असल्याचं
सांगितलं.
****
चित्रपटगृहं, फूडमॉल तसंच मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांना
स्वत:चे खाद्यपदार्थ तसंच पाणी नेण्यास बंधन घातल्यास, येत्या एक ऑगस्ट पासून कारवाईचा
इशारा राज्यसरकारनं दिला आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र
चव्हाण यांनी काल विधान परिषदेत ही माहिती दिली. फूडमॉल तसंच मल्टिप्लेक्स मध्ये खाद्य
पदार्थांची विक्री, छापील किंमतीपेक्षा जादा दराने होत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडली होती. छापील किंमतीपेक्षा जादा दराने खाद्य
पदार्थांची विक्री करणाऱ्या तीन आस्थापनांविरूद्ध गेल्या महिन्यात गुन्हे दाखल करण्यात
आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.
****
राज्यातला एकही पात्र
शेतकरी कर्ज माफीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी
काल विधानसभेत दिली. आधार पत्राशिवाय कर्जमाफी अर्ज पोर्टलवर
सादर करण्याची सुविधा शासनानं उपलब्ध करुन दिली होती, त्यानुसार राज्यातल्या शेतकऱ्यांनी
आपले अर्ज दाखल केलेल्या दोन लाख ४० हजार आधार कार्ड नसलेल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
बीड जिल्ह्याच्या गेवराई
तालुक्यातल्या जयभवानी सहकारी साखर कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबाबत
संबंधितांसोबत बैठक घेऊन दोन महिन्यांत कार्यवाही केली जाईल, असंही देशमुख यांनी सांगितलं
****
शिधापत्रिकाधारकांना आता तूर डाळ
३५ रूपये प्रति किलो या दरानं मिळणार आहे. अधिकृत शिधावाटप दुकानातून तूरडाळ ५५ रूपये
प्रति किलो या दरानं उपलब्ध करुन देण्यात आली होती. मात्र तूरडाळीचे सध्याचे बाजारातले
दर लक्षात घेता, हा दर ३५ रूपये प्रति किलो करण्यात आला आहे.
****
राज्यात सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना जास्त कामं मिळावीत,
यासाठी त्यांची नोंदणी मर्यादा ५० लाख रुपयांवरुन दीड कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात
आल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितलं. आमदार
सतीश चव्हाण यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
****
राज्यस्तरीय पोषण अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ काल
नागपूर इथं ग्रामविकास आणि महिला तसंच बाल
विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. बालमृत्यू थांबवण्यासाठी तसंच
कुपोषण निर्मूलनासाठी या कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी, असं आवाहन
मुंडे यांनी यावेळी केलं.
****
राज्याचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वारसा असलेल्या गड-
किल्ल्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना- मनरेगा आणि
पुरातत्व विभागाच्या सहयोगातून विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार असल्याची माहिती
पर्यटन आणि रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी काल नागपूर इथं ही माहिती दिली.
****
हे बातमीपत्र
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
महिला सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षानं राज्यपातळीवर ‘महिला सेफ्टी ऑडिट’ हा पथदर्शी उपक्रम हाती घेतला आहे. राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे. त्या काल जालना
इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातल्या चार गावांमध्ये
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची समिती स्थापन करून गाव आणि वार्ड पातळीवर
दबाव गट तयार केला जाणार असून टप्प्याटप्प्यानं या उपक्रमाची व्याप्ती वाढवली जाईल
असं वाघ यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षाच्या
सरकारच्या काळात राज्यात महिलांवरच्या अत्याचारांमध्ये तीस टक्क्यांनी वाढ झाली असून,
कायदा सुव्यवस्था केवळ सरकारच्या जाहिरातमध्येच दिसून येत आहे, अशी टिका वाघ यांनी
केली.
****
आषाढी वारीसाठी आळंदीहून निघालेल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या
पालखीचा काल नीरा नदी स्नानानंतर सातारा जिल्ह्यात प्रवेश झाला. काल या पालखीचा लोणंद
इथं मुक्काम होता. आज पालखीचं पहिलं उभं रिंगण चांदोबाचा लिंब इथं होणार असून, तरडगाव
इथं पालखीचा मुक्काम असेल.
दे हूहून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीहून तर पैठणहून
निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज खर्डा इथून निघेल.
शेगावहून निघालेली संत गजानन महाराजांची पालखी आज उस्मानाबादहून
तुळजापूरमार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करेल.
औरंगाबाद ते पंढरपूर सायकल वारीला आजपासून
प्रारंभ झाला. औरंगाबाद पोलिस आयुक्त कार्यालयाच्या वतीनं आयोजित ही सायकल वारी आज
पहाटे औरंगाबादहून रवाना झाली, परवा सोळा तारखेला ती पंढरपुरला पोहोचणं अपेक्षित आहे.
पोलिस आणि नागरिक यांचा परस्पर संबंध अधिक दृढ व्हावा, या उद्देशानं ही सायकल वारी
आयोजित करण्यात आली आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सोयाबीन पीक विम्या पासून वंचित ठेवणार
नाही अशी ग्वाही कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. काल मुंबईत
यांसंदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी पाटील बोलत होते. पीक विमा कंपन्यांनी मदत न केल्यास, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन सकारात्मक
पावलं उचलत असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार
सुजितसिंह ठाकूर, या बैठकीला
उपस्थित होती.
****
साधू वासवानी मिशनचे प्रमुख, दादा वासवानी यांच्या पार्थिव
देहावर काल पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी यावेळी दादा वासवानी यांचं अंत्यदर्शन
घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
परभणी जिल्ह्यात पिक विम्यासाठी आंदोलन केलेल्या शेतकऱ्यांना
न्याय देण्याची मागणी आमदार राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे
केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी येत्या १७ जुलैला शेतकऱ्यांचे
दोन प्रतिनिधी आणि जिल्ह्यातल्या सर्व आमदारांना चर्चेसाठी बोलावलं असल्याचं पाटील
यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्हा प्रशासनासह महसूल विभागाच्या कार्यालयीन
कामकाजात ई-ऑफीस या संगणकीय प्रणालीमुळे अधिक पारदर्शकता तसंच गतिमानता येईल, असं मत
औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं आयोजित ई-ऑफीस
प्रशिक्षण कार्यशाळेत ते काल बोलत होते. या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांवरचा कामाचा ताणही
कमी होईल असं चौधरी यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यातल्या सर्व तालुका न्यायालयांमध्ये
आज राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. या अदालतीमध्ये भूसंपादनाची प्रकरणं
मोठ्या प्रमाणात तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
****
भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरु असलेल्या तीन एकदिवसीय क्रिकेट
सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज लॉर्ड्स इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार
दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. गुरुवारी झालेला पहिला सामना जिंकून
भारत मालिकेत एक शून्यनं आघाडीवर आहे.
****
बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड
खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधुनं उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
उपांत्य फेरीत तिची गाठ आता जपानच्या नोझोमी ओकुहारा हिच्याशी पडेल.
*****
***
No comments:
Post a Comment