Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 18 July 2018
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
१८ जुलै २०१८ दुपारी १.०० वा.
****
संसदेचं पावसाळी अधिवेशन आज पासून
सुरू झालं. संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
राज्यसभेचे बहुतांश सदस्य आता आपल्या मातृभाषेतून आपलं म्हणणं मांडू शकतील, असं सभापती
एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं. राज्यसभेत आज सात नवीन सदस्यांनी पदाची शपथ घेतली.
कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच, आंध्रप्रदेशला
विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरून सदस्यांनी गदारोळ केल्यानं, राज्यसभेचं
कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं.
फिनलंडमध्ये झालेल्या एथलेटिक्स स्पर्धेत आसामच्या
हीना दासनं चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत मिळवलेल्या सुवर्णपदकाबद्दल लोकसभेमध्ये
तिचं अभिनंदन करण्यात आलं.
लोकसभेत शून्य काळात हिंगोलीचे खासदार राजीव सातव
यांनी राज्यात पीक कर्ज वाटपाच्या संथ गतीकडे लक्ष वेधलं.
दरम्यान, तेलुगु देशम पक्षानं आज लोकसभेत सरकार विरोधात
अविश्वास प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावावर चर्चा करण्याची तारीख आपण येत्या दोन
दिवसात सांगू, असं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितलं.
औरंगाबाद महापालिका
बरखास्त करण्याची मागणी आज आमदार सुभाष झांबड यांनी केली आहे. औरंगाबाद शहराच्या कचऱ्याचा
मुद्दा, आमदार सतीश चव्हाण यांनी, नियम ९७ अंतर्गत आज विधान परिषदेत उपस्थित केला.
त्यावर झांबड बोलत होते. महापालिकेला रस्त्यासह इतर कामांसाठी उपलब्ध करून दिलेल्या
निधीचा वेळेत वापर होत नाही, प्रशासकीय यंत्रणेचं त्यावर नियंत्रण नसल्याचा आरोप चव्हाण
यांनी केला. आमदार विद्या चव्हाण यांनीही औरंगाबाद शहरात पर्यटकांसाठी किमान सुविधा
नसल्याबद्दल खंत व्यक्त केली.
****
अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कार्यरत
पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव यांना शासनानं तत्काळ निलंबित करावं, असे निर्देश विधानसभेचे
अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विषयी कदम
यांनी अपशब्द वापरल्या मुळे, भुजबळ यांनी हक्कभंग सूचना सादर केली होती.
****
लोकशाहीर अण्णाभाऊ
साठे यांच्या आज असलेल्या स्मृतीदिनाच्या औचित्यानं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. शोषितांचा आक्रोश
शब्दांतून मांडणारे थोर समाज सेवक अण्णाभाऊ
साठे यांना आपण नमन करतो, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी अभिवादनपर कार्यक्रम घेऊन अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
करण्यात आलं.
****
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध संकलन बंद आंदोलनाचे
पडसाद जालना जिल्ह्यात आज तिसऱ्या दिवशी ही जाणवले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी
आज पहाटे औरंगाबादहून नागपूरकडे दूध घेऊन जाणारे चार टँकर जालना वळण रस्त्यावर अडवले
आणि त्यातल्या एका टँकरमधलं दूध रस्त्यावर ओतून दिलं. मात्र त्यानंतर पोलिस बंदोबस्तात
सगळे टँकर घटनास्थळावरुन पुढे रवाना केल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार
यांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दूध दराच्या मागणीसाठी
आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं शाळकरी
मुलांना दुधाचं वाटप करण्यात आलं. संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, यांच्या
नेतृत्वात हे अभिनव आंदोलन करण्यात आलं. सिल्लोड तालुक्यात येणारे दुधाचे टेम्पो आज
पहाटे अडवण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हा प्रवक्ते विजय भांडे यांनी दिली.
****
मराठवाडा आणि विदर्भातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना
आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याच्या दृष्टीनं सुरू करण्यात आलेल्या एका दुग्ध विकास योजनेतून
राज्यातल्या सत्तावीस हजार दूध उत्पादकांना लाभ झाल्याचं सरकारनं जारी केलेल्या एका
अहवालात म्हटलं आहे. राष्ट्रीय डेअरी विकास मंडळानं सुरू केलेल्या या योजनेद्वारे सुमारे
एकशे अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी या भागातल्या सुमारे सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या
खात्यात जमा झाल्याचं याबाबतच्या पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. मराठवाड्यातल्या नांदेड,
उस्मानाबाद, लातूर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू आहे.
****
भारताचा भालाफेक खेळाडू नीरज चोपडा यानं फ्रान्सच्या
सोटेविले एथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. काल झालेल्या या स्पर्धेत नीरजनं
पंच्याऐंशी पूर्णांक सतरामीटर भाला फेकून हे पदक मिळवलं.गोल्ड कोस्ट इथे नुकत्याच झालेल्या
राष्ट्रकुल स्पर्धांमध्येही नीरजनं सुवर्णपदक जिंकलं होतं.
*****
***
No comments:
Post a Comment