Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 21July 2018
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
२१ जुलै २०१८ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर
प्रदेश मधल्या शहाजहानपूर इथं किसान कल्याण सभेत सहभागी झाले आहेत. पंतप्रधान थोड्याच
वेळात या सभेला संबोधित करणार असून, ते शेतकऱ्यांच्या हितासाठी काही महत्वाच्या घोषणा
करण्याची शक्यता असल्याचं भाजपचे जिल्हा अध्यक्ष राकेश कुमार यांनी म्हटलं आहे. या
ठिकाणी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत.
****
गृहमंत्री राजनाथ सिंह आज गुरगाव मध्ये पोलिस विद्यार्थी
कॅडेट कार्यक्रमाची सुरूवात करणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पोलिस
आणि जनते मधली संवादाची पोकळी भरून काढण्यासाठी या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात येणार
आहे. या माध्यमातून गुन्हे प्रतिबंध आणि नियंत्रण, तसंच विद्यार्थ्यांमध्ये मूल्य आणि
नैतिकता रुजवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, यासाठी निवड केलेल्या प्रत्येक शाळेसाठी
५० हजार रुपये एवढ्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे.
****
सर्वोच्च न्यायालयानं बांधकाम व्यावसायात काम करणाऱ्या
मजूरांसाठी ३० सप्टेंबर अखेर एक कल्याणकारी योजना आखण्याचे निर्देश केंद्र सरकारला
दिले आहेत. तसंच यानंतर सरकारला आणखी वेळ दिला जाणार नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट
केलं. सरकारनं या योजनेचा आराखडा कामगार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला
असून, १० ऑगस्ट पर्यंत त्यावर राज्यांकडून सूचना मागवल्या आहेत, तसंच इतर घटक देखील
३० ऑगस्ट पर्यंत याबाबत आपल्या सूचना मांडू शकत असल्याचं सरकारनं न्यायालयात सांगितलं.
****
दूध बंद आंदोलना दरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या
बसगाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी
काल विधान परिषदेत सांगितलं. या प्रकरणी ज्यांच्यावर गुन्हेगारी खटले दाखल करण्यात
आले आहेत आणि जे दोषी आहेत त्यांच्या कडून झालेल्या नुकसानीची भरपाई करून घेण्यात
येईल अशी घोषणा त्यांनी केली. राज्यभरात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या
आंदोलनात ११ एसटी बसगाड्यांचं एक
कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं रावते
यांनी सांगितलं.
****
ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके, गीतकार ग. दि. माडगूळकर
तसंच लेखक पु. ल. देशपांडे या तिघांची जन्मशताब्दी साजरी करण्याचा निर्णय शासनानं घेतला
आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन
करण्यात येणार आहे. या समितीत शासकीय प्रतिनिधीं बरोबरच कला, साहित्य तसंच संगीत क्षेत्रातल्या
मान्यवरांना आमंत्रित करणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी
दिली. २५ जुलै २०१८ पासून ते ८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत हा जन्मशताब्दी सोहळा साजरा
केला जाईल, असं तावडे यांनी सांगितलं.
****
आषाढी वारीसाठी आळंदी, तसंच देहूहून निघालेल्या संत
ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या आज वाखरीला पोहोचणार आहे. दोन्ही पालख्या
आज वाखरी इथं मुक्काम करुन उद्या पंढरपूरकडे प्रस्थान करतील. तत्पूर्वी ज्ञानेश्वर
महाराजांच्या पालखीचं उभं रिंगण भंडीशेगाव इथं होत आहे. तसंच दोन्ही पालख्यांचं सोबत
रिंगण आज बाजीराव विहीर इथं होणार आहे. हा रिंगण सोहळा भाविकांना अनुभवता यावा याकरता आज एस.टीच्या शंभर जादा बसेस सोडण्यात
येत आहेत.
पैठणहून
निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज करकंबचा मुक्काम आटोपून होळे इथं मुक्कामी जाणार आहे.
****
नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरूच असून इगतपुरी मधलं भावली
धरण पूर्ण भरलं असून, गंगापूर धरणातून अल्प प्रमाणात विसर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्यात
४८ टक्के पाऊस झाला असला, तरी पाच तालुक्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. येवला, सिन्नर,
मालेगाव, सुरगणा या तालुक्यांमध्ये ४८ टँकरनं पाणी पुरवठा सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
नवी दिल्लीत कनिष्ठ आशियाई कुस्ती अजिंक्यपद
स्पर्धेत काल भारतानं एक रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवलं. ५७ किलो वजनी गटात
मानसीनं रौप्य, तर ५३ किलो वजनी गटात स्वाती शिंदेनं कांस्य पदक पटकावलं.
****
महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा आज पासून लंडन इथं सुरु होत असून, पहिला सामना भारत आणि इंग्लंड यांच्या मध्ये होणार
आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता
सामन्याला सुरुवात होईल. एकूण सोळा संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
****
बर्लिन इथं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या
चौथ्या टप्प्यातल्या अंतिम स्पर्धेत सुवर्ण पदकासाठी आज भारतीय महीला संघाचा सामना
फ्रान्सबरोबर होणार आहे. त्रिशा देब, ज्योती वेन्नम, मुस्कान
किरार यांच्या संघानं काल तुर्कस्तानचा २३१ विरुद्ध २२८ अंकांनी पराभव करून अंतिम
सामन्यात स्थान मिळवलं.
दरम्यान, कंपाऊंड
स्पर्धेमध्ये ज्योती आणि अभिषेक वर्मा या जोडीनं कांस्य पदकाच्या प्ले ऑफ सामन्यात
धडक मारली आहे. या जोडीनं नेदरलँडच्या जोडीचा १५८ आणि १५५ असा परभाव केला.
*****
***
No comments:
Post a Comment