Sunday, 15 July 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 15.07.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१५ जुलै २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या उत्तरप्रदेश दौऱ्यावर असून, ते आज मिर्झापूर इथला बाणसागर कालवा राष्ट्राला समर्पित करणार आहेत. या प्रकल्पामुळे मिर्झापूर आणि अलाहाबाद जिल्ह्यातल्या सिंचन क्षमतेत वाढ होईल. मिर्झापूर वैदयकीय महाविद्यालयाच्या कोनशिला समारंभालाही आज पंतप्रधान उपस्थित राहणार असून, चुनार इथल्या बालुघाट इथं गंगा नदीवर बांधलेल्या पुलाचं उद्धाटनही करणार आहेत.

****



 दरम्यान, पंतप्रधान येत्या २९ जुलैला आकाशवाणी वरच्यामन की बातया कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४६ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय जी ओ व्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.    

****



 राज्यातल्या ज्या कृषी बाजार समित्यांची वार्षिक उलाढाल चाळीस लाखांपेक्षा जास्त आहे अशा बाजार समित्यांसाठी पणन विभागाच्या वतीनं प्रयोग शाळा दिली जाणार आहे. राज्याचे  सहकार, पणन, आणि वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी काल सोलापूर इथं ही माहिती दिली. शेत मालाची प्रतवारी ठरवण्यासाठी ग्रेडर बसवण्यात येणार असून, व्यापाऱ्यांना नोंदणी करणं सुलभ व्हावं यासाठी नवीन प्रणाली कार्यान्वित केली जाणार असल्याचंही देशमुख यांनी सांगितलं.

****



 शासनाच्या १३ कोटी वृक्ष मोहिमे अंतर्गत औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - घाटी रुग्णालयात काल वृक्षारोपण करण्यात आलं. आमदार अतुल सावे, मराठवाडा विकास महामंडाळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, महापौर नंदकुमार घोडेले, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं.

****



 मुंबईसह राज्याच्या काही भागात आज अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. राज्यात कालही अनेक भागात पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहर आणि परिसरात, तसंच जालना शहरासह बदनापूर, परतूर, मंठा तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातही काल सलग तिसऱ्या दिवशी सर्वत्र पावसानं हजेरी लावली.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...