Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 15 July 2018
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
१५ जुलै २०१८ दुपारी १.०० वा.
****
शेतकऱ्यांच्या विकासासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार कठोर मेहनत घेत
असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातल्या मिर्झापूर इथं आज बाणसागर कालव्याचं
राष्ट्रार्पण केल्यानंतर ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या मुद्यावर विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी
यावेळी केला. सरकारच्या विविध योजनांमुळे गरीबांचा खर्च कमी झाला असल्याचं पंतप्रधानांनी
नमूद केलं. उत्तर प्रदेशातल्या १०० जनऔषधी केंद्राचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते
यावेळी करण्यात आलं.
****
जीएसटी न भरणाऱ्यांचा
तपास करण्यासाठी डेटा विश्लेषकांची मदत घेतली जाईल, असं वस्तू आणि सेवाकरासंबंधित
मंत्रीगटाचे अध्यक्ष आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी म्हटलं आहे. बंगळुरू
इथं जीएसटी संदर्भातल्या नवव्या बैठकी नंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. जीएसटी
नेटवर्कमुळे सर्व कर चुकवणाऱ्यांची माहिती उपलब्ध होऊ शकते, असं ते
म्हणाले. जीएसटी परिषदेनं येत्या एक ऑक्टोबरपासून कालबद्ध रितीनं
टीडीएस सुरू करण्याची सूचना केली असून, मोठी
कंत्राटं देणाऱ्या सरकारी विभागांपासून टीएसची सुरुवात करण्यात येईल,
असंही मोदी यांनी यावेळी सांगितलं. जीएसटी करप्रणालीत आता पर्यंत एक कोटी बारा लाख व्यावसायिकांनी
नोंदणी केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
****
छत्तीसगढ मधल्या कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी
केलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले, तर एक जण जखमी झाला. नक्षलवाद्यांनी
आज सकाळी प्रतापपूर भागातल्या महाला जंगलात शोध मोहीमेवर असलेल्या सुरक्षा दलाच्या
ताफ्यावर हल्ला केल्याचं पोलिस अधिक्षक के. एल. ध्रुव यांनी सांगितलं.
****
कंपनी व्यवहार मंत्रालयानं कंपनी कायदा २०१३ ची समिक्षा
करण्यासाठी दहा सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या कायद्या अंतर्गत असलेल्या काही
गुन्ह्यांना, गुन्ह्यांच्या श्रेणीतून काढण्याची गरज पडेल, यामुळे न्यायालयांना गंभीर
गुन्ह्यांकडे अधिक लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल, असं सरकारी पत्रकात म्हटलं आहे. कायद्यात
बदल करण्याचा मसुदा तयार करण्यासाठी ही समिती अभ्यास करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परिक्षेचा
निकाल काल जाहीर झाला. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट यु पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट
इन या संकेत स्थळावर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल, असं आयोगाकडून सांगण्यात
आलं आहे. या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परिक्षेसाठी नव्यानं
अर्ज करावे लागतील, असंही आयोगानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
नाशिक मध्ये आदिवासी विकास विभागात लाभार्थ्यांच्या
पाईपलाईन खरेदीत एक कोटी चार लाख रुपयांच्या रकमेचा अपहार झाल्याचं उघडकीस आलं आहे.
या प्रकरणी तत्कालीन प्रकल्प अधिकारी कैलास मोते यांच्या विरुद्ध नाशिकच्या मुंबई नाका
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मोते यांनी अनावश्यक पाईप खरेदी करून शासकीय
रकमेचा अपहार केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातल्या राजूर
इथल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातला तत्कालीन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत
दगडू भारमल याच्याविरुद्धही शहात्तर लाख २० हजार रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी राजूर
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्ष २००५ ते २००८ या कालावधीत आदिवासी
विकास विभागाच्या कन्यादान योजनेतल्या मंगळसूत्र आणि संसारपयोगी साहित्यात हा अपहार
झाल्याचं उघडकीस आलं आहे.
****
राज्य गुप्तवार्ता विभागासाठी सहायक गुप्तचर अधिकारी
या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या वेळी बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथल्या सिद्धि
विनायक टेक्निकल कॅम्पसवर मोबाइल फोनद्वारे कॉपी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या
प्रकरणी जालना जिल्ह्यातल्या दोन आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या एकाला शेगाव ग्रामीण पोलिसांनी
अटक केली असून, न्यायालयानं त्यांना १६ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
****
बेल्जियम इथल्या एंटवर्प इथं सुरु असलेल्या
महिला कनिष्ठ हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं आयर्लंडचा चार - एक असा पराभव
केला. आयर्लंडनं पाचव्या मिनिटालाच
पहिला गोल केला होता, मात्र त्यानंतर भारतीय संघानं सलग तीन गोल करुन विजय मिळवला.
****
झेक प्रजासत्ताक मधल्या पेलजाईन इथं झालेल्या होप्स
कनिष्ठ आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सौरभ चौधरीनं १० मीटर एयर पिस्टल
प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. या स्पर्धेत महिलांच्या २५ आणि १० मीटर पिस्टल प्रकारात
मनु भाकेरनं दोन सुवर्ण पदकं जिंकली.
****
थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचा
अंतिम सामना आज भारताची पी. व्ही. सिंधू आणि जपानच्या नोझोमी ओकुहारा यांच्यात होणार
आहे. सिंधूनं इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंग हिचा २३ - २१, १६ - २१,
२१ - नऊ असा पराभव करुन अंतिम फेरीत धडक मारली.
*****
***
No comments:
Post a Comment