Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 17 July 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ जुलै २०१८
सकाळी ६.५० मि.
****
Ø दूध दर वाढ आंदोलनावरून विधीमंडळाच्या दोन्ही सदनांचं
कामकाज बाधित
Ø सर्व कनिष्ठ महाविद्यालयातल्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना
जैवमितिक हजेरी बंधनकारक
Ø औरंगाबाद इथं विविध विमान कंपन्यांची विमान सेवा सुरू
होण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार
आणि
Ø मराठवाड्यात काल अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी
****
दूध दर वाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं
सुरु केलेल्या आंदोलनाचे पडसाद काल विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. या मुद्यावरुन
विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज बाधित झालं.
विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनिल
तटकरे यांनी या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला. या आंदोलनाबाबत सरकार आडमुठेपणाची
भुमिका घेत असून, सरकारनं दूध उत्पादकांची फसवणूक केल्याचा आरोप करत विरोधकांनी गदारोळ
केल्यानं विधान परिषदेचं कामकाज दोन वेळा तहकूब झालं.
विधान सभेतही राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी,
सरकारनं या आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना
दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी, दुध भुकटी उत्पादकांना अनुदान
देणार असल्याचं सांगितलं.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार
राजू शेट्टी यांनी पंढरपूर इथून या आंदोलनाला सुरुवात केली.
औरंगाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी दूध रस्त्यावर ओतून
देण्यात आलं. दूध दरवाढ झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हा
प्रवक्ते विजय भांडे यांनी दिला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीला
दुधाचा अभिषेक करुन हे आंदोलन सुरु झालं. दुधाला पाच रुपये प्रतिलीटर दरवाढ मिळेपर्यंत
हे आंदोलन सुरु राहणार असल्याचं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष
रवींद्र इंगळे यांनी सांगितलं.
बीड जिल्ह्यात ४५ हजार लीटर दुधाचं संकलन काल बंद
होतं. संकलित झालेलं दूध, संघटनेच्या वतीनं अनाथाश्रमात वाटण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
नांदेड शहरातच्या दूध पुरवठ्यावरही काल या आंदोलनाचा
परिणाम झाला.
अहमदनगर जिल्ह्यात दूध उत्पादकांनी काल, संकलन केंद्रावर
दूध आणण्याचं टाळलं, त्यामुळे जिल्ह्यातले सहकारी तसंच खासगी दूध संकलन केंद्र काल
बंद होते. नाशिक इथंही या आंदोलनाला प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
इयत्ता
सहावीच्या भूगोल विषयाच्या मराठी माध्यमाच्या पुस्तकात, काही पानं
गुजराती भाषेतून असल्याचं आढळून आल्याबाबत मुद्रणालयाकडून
खुलासा मागवण्यात आला आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल विधान परिषदेत ही माहिती दिली. पुस्तकांची सदोष बांधणी करणाऱ्या मुद्रणालयावर नियमानुसार
कारवाई करण्यात येईल, सदोष पुस्तकं
बदलून देण्याची कार्यवाही पाठ्यपुस्तक मंडळातर्फे तत्काळ करण्यात येत असून, विद्यार्थ्यांचं
शैक्षणिक नुकसान होणार नाही, असंही तावडे यांनी सांगितलं.
****
जळगावच्या उत्तर महाराष्ट्र
विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं नाव देण्याबाबतच्या विधेयकाला काल
विधानसभेत एकमतानं मंजुरी देण्यात आली. बहिणाबाईंच्या जयंतीदिनी, येत्या ११
ऑगस्टला विद्यापीठाचा नामविस्तार केला जाणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधल्या जाणाऱ्या
रस्ते प्रकल्पांसाठी भूमिधारकांना चौपट मोबदला देऊन भूसंपादन करण्याबाबतचं महाराष्ट्र
महामार्ग सुधारणा विधेयक २०१८ काल विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं.
****
राज्यातल्या सर्व खासगी अनुदानित, विनाअनुदानित,
अंशत: अनुदानित, स्वयंअर्थ सहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयातल्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी
जैवमितिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. ही योजना टप्याटप्यानं कार्यान्वित करण्यात
येत असून, चालू शैक्षणिक वर्षाकरता औरंगाबाद सहित मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, या पाच
विभागात हा नियम लागू करण्यात आला आहे. जैवमितीय हजेरी शिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेला
बसू दिलं जाणार नाही, असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल विधान सभेत स्पष्ट केलं.
ग्रामीण भागात एकात्मिक पद्धतीला मान्यता देणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात
येईल, असा इशाराही तावडे यांनी दिला.
****
राज्यातल्या कायम विना अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयाचा
‘कायम’ शब्द काढण्या बाबत लवकरच बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल, असं तावडे यांनी काल
विधान परिषदेत सांगितलं. सदस्य विक्रम काळे यांनी हा तारांकित प्रश्न उपस्थित केला
होता. काळे यांच्याच अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात तावडे यांनी, प्राथमिक, माध्यमिक,
आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये इंग्रजी, गणित, आणि विज्ञान विषयांच्या शिक्षकांची पदं
भरण्यास मान्यता दिल्याचं सांगितलं.
****
राज्यातल्या
प्राथमिक आरोग्य केंद्रांवर
यापुढे कामाच्या वेळेत गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबीत करण्यात येईल, अशी
घोषणा आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काल विधान परिषदेत केली. आमदार सतीश चव्हाण
यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
****
राज्यातल्या पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी २०
हजार घरांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल
विधान सभेत सांगितलं. ज्या भागात घरं मोडकळीस आली आहे, अशा ठिकाणी हा आराखडा प्रामुख्यानं
राबवण्यात येणार आहे.
****
विधान परिषदेच्या अकरा जागा बिनविरोध
निवडल्या गेल्याची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांनी काल केली. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे
चार, शिवसेना, काँग्रेस चे प्रत्येकी दोन, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष
आणि शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेत स्थळावरही
उपलब्ध आहे.
****
औरंगाबादच्या पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारासाठी
विविध विमान कंपन्यांच्या सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणं आवश्यक आहे, या कंपन्यांना
आपली विमान सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल
असं आश्वासन केंद्रीय नागरी विमान सेवा मंत्रालयाच्या सहसचिव उषा पाधी यांनी दिलं आहे.
औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात विविध विमानसेवा कंपनीच्या प्रतिनिधीं सोबत काल
झालेल्या विशेष बैठकीत त्या बोलत होत्या. औरंगाबादच्या विमानसेवेच्या वृद्धी आणि विकासासाठी
शासन प्रयत्नशील असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
मराठवाड्यात काल अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी
लावली. औरंगाबाद शहर आणि परिसरात पहाटे पासून पावसाची भुरभुर सुरू होती, दुपार नंतर
जोरदार पावसाला सुरुवात झाली. लातूर जिल्ह्यातही दिवसभर मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
परभणी शहरासह जिल्ह्यात अनेक दिवसांच्या प्रतिक्षेत नंतर काल पावसानं हजेरी लावली.
जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त
होत आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या विविध धरणांमधून काल पाण्याचा
विसर्ग करण्यात आला. यामध्ये गंगापूर धरणातून ३ हजार १४४, दारणा धरणातून ३ हजार ६२६
तर नांदूर मधमेश्वर धरणातून ७ हजार २१०, घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाणी सोडण्यात
येत आहे. यामुळे गोदावरी, दारणासह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, नागरिकांना
सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातल्या ३८ प्रादेशिक
पाणी पुरवठा योजनांचं, पुनरुज्जीवन करण्याचे आदेश पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर
यांनी काल दिले. ते काल विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठकीत बोलत होते.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात लोहारा नगर पंचायतीच्या पोटनिवडणुकीत
कॉंग्रेस पक्षाच्या जयश्री कांबळे १२५ मतं घेऊन विजयी झाल्या. नगर सेवकाच्या निधनामुळे
रिक्त जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या कवयित्री
प्राध्यापक संध्या रंगारी यांच्या "वाताहतीची कैफियत" या कविता संग्रहाला
यावर्षीचा "राज्य स्तरीय काव्य स्नेहभूषण " पुरस्कार जाहीर झाला आहे. नाशिक
इथल्या काव्यक्षर कला मंच या संस्थे तर्फे हा पुरस्कार दिला जातो.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात अळणी इथं, काल मिशन इंद्रधनुष
मोहिमेचा शुभारंभ, करण्यात आला. या मोहिमे अंतर्गत २३ जुलै पर्यंत जिल्ह्यातल्या शून्य
ते दोन वर्षे वयोगटातल्या बालकांना आणि गर्भवतींना लसीकरण करण्यात येणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं भारतीय स्टेट बँकेच्या
शाखे समोर खासदार राजीव सातव यांच्या नेतृत्वात काल धरणे आंदोलन करण्यात आलं. पीक कर्ज
वाटप तातडीनं न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सातव यांनी यावेळी दिला.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूरनजीक भरधाव ट्रकनं दुचाकीला
धडक देऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. काल दुपारी हा अपघात झाला.
*****
***
No comments:
Post a Comment