Monday, 16 July 2018

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 16.07.2018 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 16 July 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ जुलै २०१८ सायंकाळी ६.००

****

दुधाच्या दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरु केलेल्या आंदोलनाचे पडसाद आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. या मुद्यावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज बाधित झालं.

या आंदोलनाबाबत सरकार आडमुठेपणाची भुमिका घेत असून, सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत विधानपरिषदेत विरोधकांनी गदारोळ केल्यानं सभागृहाचं कामकाज दोन वेळा तहकूब झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल तटकरे यांनी या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला.

विधानसभेतही राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी, सरकारनं या आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी, दुध भुकटी उत्पादकांना अनुदान देणार असल्याचं सांगितलं.

****

दरम्यान, राज्यात आज सर्वत्र हे आंदोलन करण्यात आलं. बीड जिल्ह्यात संघटनेच्या वतीनं ४५ हजार लीटर दुधाचं संकलन बंद करण्यात आलं. संकलन केलेलं दूध संघटनेच्या वतीनं अनाथ आश्रमात देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व दुध उत्पादक शेतकऱ्यांनी आज किटली आंदोलन करत आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

****

इयत्ता सहावीच्या भूगोल विषयाच्या मराठी माध्यमाच्या पुस्तकात काही पानं गुजराती भाषेतून असल्याचं आढळून आल्याबाबत मुद्रणालयाकडून झालेल्या चुकीबाबत खुलासा मागवण्यात आला असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. पुस्तकांची सदोष बांधणी करणाऱ्या मुद्रणालयावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, तसंच सदोष पुस्तकं बदलून देण्याची कार्यवाही पाठ्यपुस्तक मंडळातर्फे तात्काळ करण्यात येत असून, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, असंही तावडे यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर यापुढे कामाच्या वेळेत गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबीत करण्यात येईल, अशी घोषणा आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज विधान परिषदेत केली. औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तीव्र तुटवडा जाणवत असल्यानं रूग्णांचे हाल होत असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं.

****

संसदेच्या परवापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. लोकसभेचं कामकाज सुरळीत चालु देण्याचं आवाहन त्या करणार असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. 

****

नवी मुंबईतल्या सायन पनवेल महामार्गावर खड्ड्यांबाबत तीव्र आंदोलन करत नवी मुंबई मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज तुर्भे इथल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालात तोडफोड केली. सायन पनवेल महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांवर राज्य शासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कोणतीही कारवाही करत नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात मिशन इंद्रधनुष मोहीमेचा शुभारंभ आज अळणी इथं, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चना पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांच्या हस्ते झाला. या मोहीमेअंतर्गत १६ ते २३ जुलै दरम्यान जिल्ह्यातल्या शून्य ते दोन वर्षे वयोगटातल्या बालकांना आणि गरोदर मातांना लसीकरण करण्यात येणार आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बँक पिक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत असल्यानं या विरोधात आज काँग्रेसचा वतीनं सेनगाव इथल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर खासदार राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आलं. तालुक्यातल्या शेतकऱ्यांना तातडीनं पिक कर्ज वाटप न केल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सातव यांनी यावेळी दिला.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी पंचायत समिती कार्यालयासमोर रामवाडी इथल्या ग्रामस्थांनी आज शौच खड्डा खोदून आंदोलन केलं. वारंवार मागणी करुनही गावातल्या शौच खड्डयाचं रखडलेलं अनुदान मिळत नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं, यावेळी गावातले नागरीक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

****

परभणी जिल्ह्यात जिंतूरनजीक भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारी हा अपघात झाला.  

****

मराठवाड्यात आज अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. औरंगाबाद शहर आणि परिसरात दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. लातूर जिल्ह्यातही दिवसभर मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. परभणी शहरासह जिल्ह्यात अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात आज समाधानकारक पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

//***********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 09 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...