Monday, 16 July 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.07.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 July 2018

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ जुलै २०१ दुपारी १.०० वा.

****



 विधान सभेत आज दूध आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सध्या सुरु असलेल्या दूध आंदोलना संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडून चर्चेची मागणी केली. राज्य सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, योग्य तो निर्णय घेणार असल्याचं पशु संवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितलं.

****



 दरम्यान, राज्यात अनेक भागात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं दूध बंद आंदोलन सुरु आहे. अनेक ठिकाणी दूध रस्त्यावर फेकून दिल्याचं वृत्त आहे.



 कोल्हापूर जिल्ह्यातल्या सहा हजारांहून अधिक दूध संस्था आणि दूध संघांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. गोकुळ दूध संघानं ११ लाख ५० हजार लिटरचं संकलन बंद ठेवलं असून, याला कोल्हापूरातल्या पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातलं दूध संकलन शंभर टक्के बंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.  

****



 शिया वक्फ मंडळाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून, देशातल्या विविध इमारती आणि धार्मिक स्थळांवर चंद्रकोर आणि चांदणी असलेले हिरवे झेंडे फडकावण्यावर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी घेताना न्यायालयानं केंद्र सरकारला यासंदर्भात उत्तर मागितलं आहे. चंद्रकोर आणि चांदणी असलेला हिरवा झेंडा, इस्लामचा ध्वज नसून, तो पाकिस्तानच्या एका राजकीय पक्षाच्या झेंड्यासारखा असल्याचं रिझवी यांनी या याचिकेत म्हटलं आहे.

****



 जम्मू काश्मीर मधल्या कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. यात लष्कराचे दोन जवान जखमी झाले. बातपोरा जंगलात ही चकमक झाली. या भागात दहशतवाद विरोधी अभियान सुरु असल्याचं याबाबातच्या वृत्तात म्हटलं आहे.  

****



 सामाजिक माध्यमांवर नियंत्रित आणण्याचा सरकारचा विचार नाही, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी म्हटलं आहे. गुजरात मधल्या गांधी नगर इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. सामाजिक माध्यमांनी स्वत:च आपल्या मर्यादा निश्चित केल्या पाहिजे, असं ते म्हणाले.



 दरम्यान, अहमदाबाद इथं एका कार्यक्रमात बोलताना राठोड यांनी, मुलांची क्रीडा क्षमता तपासण्यासाठी केंद्र सरकार लवकरच एक महत्त्वाकांक्षी योजना सुरु करणार असल्याचं सांगितलं. शारिरिक क्षमता निवड या कार्यक्रमा अंतर्गत दरवर्षी सुमारे एक हजार मुलांची निवड केली जाईल, या मुलांमधले क्रीडा गुण जोपासण्यासाठी त्यांना पाच लाख रुपये वार्षिक शिष्यवृत्ती, आठ वर्षे दिली जाईल, असं राठोड यांनी सांगितलं.

****



 लोणावळा इथल्या तुंग किल्ल्यावरुन दरीत पडल्यानं एका पंधरा वर्षीय गिर्यारोहक मुलीचा मृत्यू झाला. इशिता माटे असं तीचं नाव असून, ती पुणे इथली रहीवाशी आहे. किल्ल्याचा परिसर फिरुन खाली उतरत असताना पाय घसरल्यानं ती खोल दरीत पडली. काल दुपारी तिचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

****



 आषाढी वारीसाठी आळंदीहून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज फलटणचा मुक्काम आटोपून बरडकडे मार्गस्थ झाली, तर देहूहून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी निमगाव केतकी इथला मुक्काम आटोपून इंदापूरला पोहोचली. इंदापूर इथं पालखीचं गोल रिंगण साजरं झालं. पैठणहून निघालेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा आज परांडा इथं मुक्काम असेल.



 संत गजानन महाराज पालखीचं आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं, गंगेवाडी - कासेगाव इथं पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पालखीचं पूजन केलं.



 दरम्यान, फलटण इथल्या पालखी तळाजवळ, दोन वारकऱ्यांचा विजेचा धक्का बसल्यानं मृत्यू झाला. मृत वारकरी परभणी आणि नांदेड जिल्ह्यातले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची, तर उपसभापतीपदी श्रीशैल नरोळे यांची निवड झाली आहे. आज सकाळी बाजार समिती परिसरात ही निवड करण्यात आली.



 उस्मानबाद जिल्ह्यात लोहारा नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या जयश्री कांबळे 125 मतं घेऊन विजयी झाल्या.

****



 नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणातून एक हजार पाचशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं, गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस सुरू असल्यामुळे टप्याटप्यानं विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागानं दिली आहे.

****



सर्बिया इथं झालेल्या गोल्डन ग्लोव्ज मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतानं १७ पदक जिंकून पदक तालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे. या स्पर्धेत भारतीय मुष्टियोद्ध्यांनी सात सुवर्ण, सहा रौप्य आणि चार कांस्य पदकांची कमाई केली.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 09 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...