Tuesday, 17 July 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.07.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१७ जुलै २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 दूध दरवाढीसाठीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज विधान परिषदेत नियम ९७ अंतर्गत चर्चा घेण्यात येत आहे. राज्य सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांचा अंत न पाहता, दुधाला प्रतिलीटर पाच रुपये अनुदान जाहीर करावं, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी परराज्यातून येणाऱ्या दुधावर कर लावण्याची मागणी केली. दूध संघांच्या मजबुतीकरणाची गरजही गोऱ्हे यांनी व्यक्त केली.



 पशुसंवर्धन आणि दुग्धोत्पादन मंत्री महादेव जानकर यांनी या चर्चेला दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं, विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली, त्यामुळे सभापतींनी कामकाज १५ मिनिटांसाठी स्थगित केलं.

****



 ज्येष्ठ अभिनेत्री रिता भादुरी यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. त्या ६२ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून मूत्रपिंडांच्या आजारानं त्रस्त असलेल्या भादुरी यांच्यावर दोन आठवड्यांपासून मुंबईत एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, आज पहाटे हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचं निधन झालं. रिता भादुरी यांनी जुली, गोपलकृष्ण, बेटा, कभी हां कभी ना, घर हो तो ऐसा, अंत, विरासत, राजा, क्या कहना, आदी हिंदी, गुजराथी चित्रपटांमधून, तसंच दूरदर्शनसह विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरच्या अनेक मालिकांमध्ये अनेकविध भूमिका साकारल्या आहेत.

****



 समावेशक, न्याय संगत आणि शाश्वत विकासाचं उद्दीष्ट साध्य करण्यासाठी महिला सक्षमीकरण आवश्यक असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं महिला सक्षमीकरणावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महिलांची सक्रिय भागीदारी असेल, तर शिक्षण, आरोग्य, पोषण, रोजगार आणि सामाजिक सुरक्षेसारख्या क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल होतील, असं ते म्हणाले.

****



 राज्यात पावसाचा जोर आजही कायम आहे. नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधला विसर्ग वाढवण्यात आला आहे. नदीकाठच्या भागात नागरिकांनी सतर्कता बाळगावी, जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...