Monday, 16 July 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.07.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 July 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  १६ जुलै २०१ सकाळी .५० मि.

****



Ø  दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं दूध बंद आंदोलन

Ø  कायदा हातात घेणाऱ्या आंदोलकांवर कारवाईचा सरकारचा इशारा

Ø  औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनचं लोकार्पण

आणि

Ø विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्स अजिंक्य; विम्बल्डन पुरुष एकेरीचं अजिंक्यपद नोवाक जोकोविचनं पटकावलं तर थायलंड खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूला उपविजेतेपद

****



 दुधाला योग्य भाव मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मध्यरात्रीपासून दूध बंद आंदोलन सुरु केलं आहे. संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पंढरपूर इथं या आंदोलनाला सुरुवात केली. हे आंदोलन चिघळण्याची भीती व्यक्त करत सोलापूर जिल्ह्यातल्या खाजगी आणि सहकारी दूध संघांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे.



 या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचं वृत्त आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरहून औरंगाबादला दुधाच्या पिशव्या घेऊन जाणारा ट्रक वैजापूर तालुक्याच्या हडस पिंपळगाव इथं अडवून, दूध पिशव्या रस्त्यावर फेकून देण्यात आल्या.



 उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीला दूधाचा अभिषेक करुन हे आंदोलन सुरू होत आहे. दूधाला पाच रुपये प्रती लिटर दरवाढ मिळेपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी सांगितलं.



 दूध उत्पादकांच्या आंदोलनांमध्ये सहभागी होऊ नये, यासाठी राज्यातल्या किसान सभेच्या कार्यकर्त्यांना पोलिस नोटीस देत असल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीचे डॉ. अजित नवले यांनी केला आहे. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनाही नोटीस बजावून पोलिसांनी, किसान सभा आणि संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना, आंदोलन करण्यास, प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर अशाप्रकारे नोटीस बजावून दडपशाही करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप डॉ. नवले यांनी केला.



 दरम्यान, मुंबईचा दूध पुरवठा सुरळीत राहील आणि विविध भागात पोलीस बंदोबस्तात दूध पुरवठा केला जाईल, असं राज्याचे पशू संवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलं आहे, ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. आंदोलनाविषयी आपण बोलणार नाही पण कायदा हातात घेणाऱ्या आंदोलकांवर कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले.

****



 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रं जारी केल्याप्रकरणी सहा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कुलगुरु प्राध्यापक बी.ए.चोपडे यांनी ही माहिती दिली. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. तांत्रिक चुकीमुळे ही पदवी प्रमाणपत्रे महाविद्यालयांकडे गेली असली, तरी अद्याप कुणाही अनुत्तीर्ण विद्यार्थ्याला पदवी देण्यात आली नसल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमल्याचंही ते म्हणाले.

****



 मुंबई- पुणे महामार्गावर लोणावळ्याजवळच्या कार्ला या गावानजिक काल झालेल्या एका रस्ते अपघातात सात जण ठार झाले. अपघातात मयत झालेले सर्व जण पिंपरी चिंचवडचे रहिवाशी होते. अपघातानंतर या महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

****



 मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेस पात्र अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क भरण्याची मुदत वाढवण्याबाबत सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी, शैक्षणिक संस्थांना सूचना द्याव्यात, असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. या विद्यार्थ्यांना शुल्क रायला उशीर झाल्यानं प्रवेश मिळाला नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या बँक खात्यारक्कम जमा होईपर्यंत शुल्क भरण्याची मुदत वाढवून देण्याचे निर्देश, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं दिले आहेत.   शैक्षणिक संस्थांकडून होणा-या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शिष्यवृत्ती योजनेच्या मार्गदर्शक तत्वात सुधारणा करण्यात आली आहे

****



 आषाढी वारीसाठी आळंदीहून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज फलटण इथून बरड मुक्कामाकडे मार्गस्थ होईल, तर देहूहून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी निमगाव केतकी इथून इंदापूर मुक्कामाकडे प्रयाण करेल. इंदापूर इथं पालखीचं दुसरं गोल रिंगण होणार आहे.



पैठणहून निघालेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं तिसरं रिंगण काल नागरडोह इथं पार पडलं. आज पालखी अनाळे इथून परंड्याकडे मार्गस्थ होईल.



दरम्यान, काल सकाळी सातारा जिल्ह्यातल्या तरडगावहून दिंड्या निघत असताना ट्रकनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका वारकरी महिलेचा मृत्यू झाला. वेगवेगळ्या दिंड्यांमध्ये असणाऱ्या तीन वारकऱ्यांचा सकाळी फलटण इथं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. मृत वारकरी औरंगाबाद आणि सिंदखेड राजा इथले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

****



 संसदेचं पावसाळी अधिवेशन परवा बुधवारपासून सुरु होत आहे. १० ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांची आज बैठक होत आहे. राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी ही बैठक बोलावली आहे.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून येत्या रविवारी २९ जुलैला, सकाळी अकरा वाजता देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ४६वा भाग असणार आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 कौशल्य विकास कार्यक्रमात औरंगाबादच्या हर्सुल मध्यवर्ती कारागृहात काल सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनचं लोकार्पण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या हस्ते झालं. राज्यातल्या नऊ महिला कारागृहांत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, तसंच वापर झालेले नॅपकिन जैविकरित्या नष्ट करण्याकरता यंत्र देण्यात येत असल्याचं रहाटकर यांनी यावेळी सांगितलं.

****



 रशियातल्या मॉस्को इथं झालेली विश्वचषक फुटबॉल स्पर्धा फ्रान्सनं जिंकली आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात फ्रान्सनं क्रोएशियावर चार-दोन अशा फरकानं मात केली. क्रोएशियाचा लुक मॉडरीच गोल्डन बॉलचा मानकरी ठरला, स्पर्धेत सर्वाधिक सहा गोल करणाऱ्या इंग्लंडच्या हॅरी केननं गोल्डन बूट पटकावला. बेल्जियमच्या थीबॉट कोर्टोइस गोल्डन ग्लोव्हज, फ्रान्सच्या एमबापे यानं युवा खेळाडूचा तर फेअर प्ले पुरस्कार स्पेनच्या संघाला मिळाला.

****



 विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा पुरुष एकेरीचा किताब सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं पटकावला. काल झालेल्या अंतिम सामन्यात जोकोविचनं दक्षिण अफ्रिकेच्या केविन अँडरसनला ६-२, ६-२, ७-६ अशा सरळ तीन सेटमध्ये पराभूत केलं.

****



 थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात जपानच्या नोजोमी ओकुहारानं सिंधूचा २१ - १५, २१ - १८ असा पराभव केला.

****



 जालना जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गटांना व्यवसाय उभारणीसाठी १७ कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी मंठा इथं आयोजित बचत गट मेळाव्यात ही माहिती दिली. बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सुमारे ३८ हजार कुटुंबांना रोजगार मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 मराठवाडा विभागासाठी सध्या असलेलं गटशेतीचं ५० गटांचं उद्दिष्ट वाढवून ते एक हजार गटांचं करण्याची मागणी राज्य शासनाकडे केल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी दिली. औरंगाबाद इथं काल ग्रामीण भागातल्या उद्योजकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या रूरल चेंबर ऑफ कॉमर्स इंडियाचं उद्घाटन करताना ते बोलत होते.

****



 मराठवाडा साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षपदी परभणीचे देविदास कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिषदेच्या कार्यकारिणीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी या पदावर भास्कर बडे कार्यरत होते.

****



 नांदेडहून सुटणाऱ्या तीन रेल्वे गाड्यांचे डबे वाढवण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वे कार्यालयानं कळवलं आहे. यात नांदेड-अमृतसर साप्ताहिक रेल्वेगाडीला परवा बुधवारी, अठरा जुलैपासून आणि नांदेड - उना साप्ताहिक रेल्वेला येत्या शनिवार पासून, प्रत्येकी एक द्वितीय श्रेणी शयनयान असलेला डबा कायम स्वरुपी जोडण्यात येणार आहे. नांदेड-पनवेल एक्स्प्रेसला येत्या सात ऑगस्टपासून सात फेब्रुवारी २०१९ पर्यंत, वातानुकुलित प्रथम श्रेणीचा एक आणि द्वितीय श्रेणीचा एक असे दोन डबे तात्पुरते जोडले जातील.

****



 जळगाव जिल्ह्यातल्या पाटणादेवीच्या जंगलात चंदनाची झाडं तोडण्यासाठी आलेल्या तिघांपैकी एकाला काल वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली. वनपरिक्षेत्र अधिकारी एम.बी.पटवर्धन आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली. पळून गेलेल्या अन्य दोघांचा शोध सुरु असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 लातूर जिल्ह्यात रामेगाव इथं प्रस्तावित बुद्ध महाविहार परिसरात पंचशील ध्वजारोहण, तसंच नामफलकाचं अनावरण काल करण्यात आलं. खासदार डॉक्टर सुनील गायकवाड, आमदार अमित देशमुख, भदंत काश्यपायन महाथेरोंसह मान्यवरांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपणही करण्यात आलं.

*****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...