आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१ जुलै २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
वस्तू आणि सेवा कर लागू होऊन
आज एक वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना
शुभेच्छा दिल्या आहेत. वस्तू आणि सेवा करामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत अनुकूल बदल झाला
असून, यामुळे कामकाजात पारदर्शिता आली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. या करपद्धतीमुळे
उत्पादकता वाढत असून व्यापार करणं सुलभ झालं आहे आणि लघु आणि मध्यम उद्योजकांना लाभ
होत आहे, असं पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.
****
आज सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड
अकाऊंटंटस् दिवस आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज नवी दिल्लीमध्ये, इंस्टिट्यूट ऑफ
चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया, या संस्थेच्या सत्तरावा वर्षप्रवेश, अर्थात प्लॅटिनम
ज्युबिली समारंभाचा शुभारंभ करणार असून, एक स्मारक टपाल तिकीटही जारी करणार आहेत. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या चार्टर्ड अकाटंटस् ना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रनिर्माणाच्या
कामात या समुदायाचं मोठं योगदान असल्याचं नमूद करत, ते यापुढेही भारताच्या विकासात
असंच योगदान ते देत राहतील, अशी आशा पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात व्यक्त
केली आहे.
****
डॉक्टरांचं काम म्हणजे मानवतेच्या
सेवेच्या कार्यांमधलं एक श्रेष्ठ कार्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर
दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना म्हटलं आहे. भारतीय डॉक्टरांना जागतिक स्तरावर
मिळत असलेली कीर्ती आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या संशोधन आणि अत्याधुनिक उपचारांच्या
क्षेत्रातलं त्यांचं अग्रणी स्थान, यामुळे संतोष होतो, असं पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या
संदेशात म्हटलं आहे.
****
स्वयंपाकाच्या अनुदानित गॅस
सिलेंडरच्या किमतीत दोन रुपये एक्काहत्तर पैसे इतकी तर विना अनुदानित सिलेंडरच्या किमतीत
पंचावन्न रुपये पन्नास पैसे इतकी वाढ करण्यात आली आहे. काल मध्यरात्रीपासून ही दरवाढ
लागू झाली आहे.
****
राज्यातल्या शंभरहून जास्त
एस.टी. बसस्थानकांचं नूतनीकरण, दर्जावाढ आणि नवीन बांधणी सुरू असल्याची माहिती परिवहनमंत्री
दिवाकर रावते यांनी दिली आहे. सातारा जिल्ह्यातल्या पाटण बसस्थानक नूतनीकरण कामाचं
भूमीपूजन काल त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी रावते यांनी ही माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment