Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 12 July 2018
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
१२ जुलै २०१८ दुपारी १.०० वा.
****
रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यात उभारण्यात येणारा नाणार तेलशुद्धीकरण
प्रकल्प पर्यावरणपूरक असून, हा प्रकल्प कोणावरही लादणार नसल्याचं आश्वासन मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. विधानसभेत आज यासंदर्भात निवेदन देताना ते बोलत होते.
नाणार प्रकल्पात संपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, हा प्रकल्प
उभारण्यासाठी तीन लाख कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक होणार असल्याचं ते म्हणाले. या प्रकल्पाला
विरोध असणाऱ्या ग्रामस्थांशी चर्चा करुनच पुढील निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
स्पष्ट केलं.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनानंतर समाधान न झाल्यानं, या मुद्यावरुन
आजही विरोधकांनी गदारोळ केला. या प्रकल्पासाठी भूसंपादनात घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी
पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करत विरोधकांनी
अध्यक्षांसमोरच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी केली. या गदारोळामुळे आज विधानसभेचं कामकाज
वारंवार तहकूब झालं.
****
जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर केलेल्या
हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे दोन जवान शहीद झाले, तर एक जवान जखमी झाले. आज
सकाळी हा हल्ला झाल्यानंतर या भागात जवानांनी शोध मोहीम सुरु केल्याचं पीटीआयचं वृत्त
आहे.
****
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना आरोग्य
विमा पुरवण्यासाठी आधार कार्ड गरजेचं नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.
आधारकार्ड असलेल्या आणि नसलेल्या सर्व गरजू लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, असं
केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत सुमारे १० कोटी
गरीब कुटुंबांना दरवर्षी पाच
लाख रूपयांचा आरोग्य विमा
पुरवण्याचं उद्दीष्ट आहे.
****
बँकेत खात्यावर पैसे जमा करणाऱ्याचं नाव नसल्यानं
निर्माण होणाऱ्या समस्या आणि पैशाचे गैरव्यवहार रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह
बँकेनं डिमांड ड्राफ्ट, चेक आणि पे ऑर्डरवर खरेदीदाराचं नाव समाविष्ट करणं
सक्तीचं केलं आहे. या संदर्भात काल मुंबईमध्ये बँकेनं एक अधिसूचना जारी केली असून,
बँकेचे हे निर्देश येत्या १५ सप्टेंबरपासून अंमलात येणार आहेत.
****
रेल्वेनं आपली पहिली एकीकृत पूल व्यवस्थापन प्रणाली
सुरू केली आहे. ही प्रणाली म्हणजे इंटरनेटशी जोडलेलं आयटी अॅप असून, त्यात
रेल्वेच्या दीड लाख पुलांची माहिती साठवता येणार आहे. रेल्वे पुलांशी संबंधित
विविध घडामोडींबाबतच्या माहितीचं योग्य विश्लेषण तसंच विस्ताराविषयीची सेवा या
अॅपद्वारे मिळणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिल्लीत या सेवेचा प्रारंभ
केला.
****
गेल्या महिन्यात अन्न धान्याचे भाव कमी झाले असले तरी, इंधन
दरवाढीमुळे ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर पाच टक्क्यावर
पोहोचला आहे. मे महिन्यात हा दर चार
पूर्णांक ८६ शतांश
टक्के होता. जूनमध्ये अन्नधान्य महागाई दर दोन पूर्णांक
९१ शतांश टक्के राहिल, असा अंदाज केंद्रीय
सांख्यिकी कार्यालयानं व्यक्त
केला आहे.
****
आषाढी वारीसाठी आळंदीहून निघालेली ज्ञानेश्वर महाराजांची
पालखी आज नीरा नदी स्नानानंतर सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या पालखी सोहळ्याचं
जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पाडेगाव इथं स्वागत करण्यात येणार असून, त्यानंतर पालखी
लोणंदकडे मार्गस्थ होईल. देहूहून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीला
मुक्कामी पोहोचेल. तर पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज दिघोळहून निघाली
असून, खर्डा इथं मुक्काम करेल.
दरम्यान, आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी
दक्षिण मध्य रेल्वेनं आदिलाबाद-पंढरपूर-आदिलाबाद आणि नगरसोल -पंढरपूर- नगरसोल या दोन
विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
****
अहमदनगर इथल्या भुईकोट किल्ल्याला ऐतिहासिक रूप मिळावं
यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी काल या किल्ल्याची
पाहणी केली. भुईकोट किल्ला सुशोभीकरणासाठी तातडीनं कारवाई करण्यात येणार असून, किल्ल्याचं
ऐतिहासिक महत्त्व अबाधित राहण्यासाठी प्रथम स्वच्छता मोहीम हाती घेणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी
यावेळी सांगितलं.
****
कोल्हापूर जिल्ह्याच्या गगनबावडा तालुक्यातल्या लोंघे
किरवे दरम्यान दोन एस टी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला,
तर १५ जण जखमी झाले. आज सकाळी हा अपघात झाला.
****
भारतीय धावपटू हिमा दास हीनं फिनलँड इथं झालेली २० वर्षांखालील
आय ए ए एफ जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा जिंकल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी
तीचं अभिनंदन केलं आहे. देशासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं
आहे. केंद्रीय क्रिडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही
हिमाचं अभिनंदन केलं आहे.
//*********//
No comments:
Post a Comment