Sunday, 15 July 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad - 15.07.2018 - 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 15 July 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ जुलै २०१८ सायंकाळी ६.००

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी दिल्याप्रकरणी सहा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचं कुलगुरु प्रोफेसर बी. ए. चोपडे यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर ते आज वार्ताहर परिषदेत बोलत होते. तांत्रिक चुकीमुळे ही पदवी प्रमाणपत्रे महाविद्यालयांकडे गेली असली, तरी अद्याप कुणाही अनुत्तीर्ण विद्यार्थ्याला पदवी देण्यात आली नसल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमल्याचंही ते म्हणाले.

****

दुधाला योग्य भाव मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज मध्यरात्रीपासून दूध बंद आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी पंढरपूर इथं या आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. हे आंदोलन चिघळण्याची भिती व्यक्त करत सोलापूर जिल्ह्यातल्या खाजगी आणि सहकारी दूध संघांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे.

****

आषाढी वारीसाठी आळंदीहून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज फलटण इथं, तर देहूहून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी आज निमगाव केतकी इथं मुक्कामी असेल. पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज अनाळे इथं मुक्कामी असून, पालखीचं तिसरं रिंगण आज नागरडोह इथं पार पडलं.

दरम्यान, आज सकाळी सातारा जिल्ह्यातल्या तरडगावहून दिंड्या निघत असताना ट्रकनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका वारकरी महिलेचा मृत्यू झाला. वेगवेगळ्या दिंड्यांमध्ये असणाऱ्या तीन वारकऱ्यांचा सकाळी फलटण इथं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. मृत वारकरी औरंगाबाद आणि सिंदखेड राजा इथले असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध होत आहे.

****

जालना जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गटांना व्यवसाय उभारणीसाठी १७ कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. मंठा इथं आयोजित बचत गट मेळाव्यात ते आज बोलत होते. बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सुमारे ३८ हजार कुटुंबांना उपजीविका मिळाल्याचं लोणीकर यांनी यावेळी सांगितलं.

****

कौशल्य विकास कार्यक्रमात औरंगाबादच्या हर्सुल मध्यवर्ती कारागृहाला सॅनिटरी नॅपकिन बनवणारं मशीन देण्यात येत आहे. या कारागृहात आज सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनचं लोकार्पण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते झालं. राज्यातल्या नऊ महिला कारागृहांत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, तसंच वापर झालेले नॅपकिन जैविकरित्या नष्ट करण्याकरता बर्निंग मशीन देण्यात येत असल्याचं रहाटकर यांनी यावेळी सांगितलं.

****

मराठवाडा विभागासाठी सध्या असलेलं गटशेतीचं ५० गटांचं उद्दिष्ट वाढवून ते एक हजार गटांचं करण्याची मागणी राज्य शासनाकडे केल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी दिली. औरंगाबाद इथं आज ग्रामीण भागातल्या उद्योजकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या रूरल चेंबर ऑफ कॉमर्स इंडियाचं उद्घाटन करताना ते बोलत होते.

****

मराठवाडा साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षपदी परभणीच्या देविदास कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिषदेच्या कार्यकारिणीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी या पदावर भास्कर बडे कार्यरत होते.

****

भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूला थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. आज झालेल्या अंतिम सामन्यात जपानच्या नोजोमि ओकुहारानं सिंधूचा २१ - १५, २१ - १८ असा पराभव केला.

****

रशियातल्या मॉस्को इथं आज विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात खेळला जाणार आहे. क्रोएशियानं प्रथमच, तर फ्रान्सनं तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता सामन्याला सुरूवात होणार असून, हा चषक कोण पटकावणार याकडे फुटबॉलप्रेमी जगताचं लक्ष लागलं आहे.

****

राज्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर ओसरला होता, मात्र आज अनेक ठिकाणी पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मुंबई शहर आणि परिसरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.

नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे गोदावरीची पाणीपातळी वाढली असून, आपत्ती व्यवस्थापन विभागानं नदीकाठालगतच्या विक्रेत्यांना तातडीनं स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यानं गोदावरीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

जळगावमध्येही आज २२ दिवसांनी पावसाचं आगमन झालं. गडचिरोली, अमरावती, औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. आज आणि उद्या राज्यात सर्वत्र मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 11 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...