आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१३ जुलै २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय धावपटू हिमा दास हीनं फिनलँड इथं झालेल्या २० वर्षांखालील आय ए ए एफ
जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारी ती पहिली भारतीय
महिला ठरली आहे. १८ वर्षीय हिमानं अंतिम स्पर्धेत ४०० मीटरचं अंतर ५१ पूर्णांक ४६ शतांश
सेकंदात पार केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल हिमाचं अभिनंदन केलं आहे. देशाला
हिमाचा अभिमान असून, तीच्या या यशामुळे तरुण क्रिडापटूंना प्रेरणा मिळेल, असं पंतप्रधानांनी
ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
****
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणनं अजिंठा लेणी, लेह राजवाडा आणि ताज महल या जागांना
सोडून इतर सर्व संरक्षित स्मारकांवर इतिहासकालीन जागा किंवा वस्तुंचे छायाचित्रण करण्यासाठी
मंजुरी दिली आहे. आधुनिक युगात माणसाला कोणत्याही ठिकाणची स्मृती छायाचित्रणाद्वारे
जपून ठेवण्याची सोय असतानाही ऐतिहासिक ठिकाणी छायाचित्रण करायला न देणं खेदजनक असल्याचं
मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली इथं धरोहर भवन इथल्या भाषणात व्यक्त
केलं होतं. पंतप्रधानांच्या या सूचनेनुसार हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय मंत्री महेश
शर्मा यांनी एका ट्विटमध्ये सांगितलं आहे.
****
दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी
संघटनेतर्फे येत्या १६ जुलै पासून राज्यभर दूध बंद आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेचे
अध्यक्ष खासदार राजु शेट्टी यांनी अहमदनगर इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. १५
जुलैला रात्री १२ वाजता पंढरपूरच्या विठ्ठलाला तसंच शिर्डीच्या साई बाबांसह गावोगावी
ग्रामदैवतांना दुग्धाभिषेक करुन या आंदोलनाची सुरुवात केली जाणार असल्याचं त्यांनी
सांगितलं.
****
मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यात काल दिवसभर
पावसाची संततधार सुरु होती.
परभणी जिल्ह्यात पूर्णा, सेलू, पाथरी, जिंतूर तालुक्यांध्ये दिवसभर रिमझिम पाऊस झाला.
या पावसामुळे लातूर जिल्ह्यात खरीप पिकांना जीवदान मिळाल्यानं, शेतकरी वर्गातून समाधान
व्यक्त होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काल सकाळपासून
ढगाळ वातावरण आहे, तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला.
****
केंद्र शासनाच्या पोषण अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ
महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज नागपूर इथून होणार आहे. जागतिक
महिला दिनी गेल्या आठ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ
करण्यात आला होता.
//**********//
No comments:
Post a Comment