Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 November
2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ नोव्हेंबर
२०१८ दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय
अन्वेषण विभाग - सीबीआयचे सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले संचालक आलोक वर्मा यांना
केंद्रीय दक्षता आयोगाच्या अहवालाची प्रत देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले
आहेत. सीबीआय अधिकाऱ्याच्या वादावर दक्षता आयोगानं आपला अहवाल सादर केल्यानंतर आज यावर
न्यायालयात सुनावणी झाली. वर्मा यांनी या आदेशावरचं स्पष्टीकरण सीलबंद लिफाफ्यातून
न्यायालयात सादर करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. मात्र वर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचा
आरोप केलेले सहसंचालक राकेश अस्थाना यांना आयोगाच्या अहवालाची प्रत देण्यास न्यायालयानं
नकार दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० नोव्हेंबर रोजी होणार आहे.
****
इमारती,
बांधकाम आणि २० हजार ते ५० हजार चौरस मीटर परिसरावरचं क्षेत्र विकास प्रकल्पांकडून
पर्यावरणासंबंधीच्या अटींची पूर्तता करुन घेण्याचा अधिकार, केंद्र सरकारनं स्थानिक
स्वराज्य संस्थांना दिले आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं यासंबंधीची अधिसूचना
जारी केली आहे. तसंच याद्वारे औद्योगिक वास्तू, शिक्षणसंस्था, रुग्णालयं आणि वसतीगृहांमधे
पर्यावरणविषयक अटी पूर्ततेची खबरदारी घेण्याचे अधिकारही स्थानिक स्वराज्य संस्थांना
देण्यात आले आहेत. महापालिका विकास प्राधिकरणं, जिल्हा पंचायती, अशा स्थानिक संस्थांनी
बांधकाम प्रकल्पांना आणि इमारतींना परवानगी देतानाच, पर्यावरणविषयक नियम आणि अटी ठरवून
देतील, असंही या अधिसूचनेत म्हटलं आहे.
****
जोरदार
वारा आणि तुफानी पावसासह गज चक्रीवादळानं तामिळनाडूमध्ये ११ बळी घेतले आहेत. रात्री
साडेबारा वाजता हे वादळ कोसळायला सुरुवात झाली आणि त्यानंतर दोन तासात नागप्पट्टीणम
आणि वेदारण्यम यांच्या मधे त्याचं थैमान सुरु झालं. मात्र या वादळाचा बाह्य भाग अद्याप
समुद्रात असून त्याची वाटचाल सुरुच आहे. नागप्पट्टीणम जिल्ह्याचा बहुतांश भाग आणि लगतच्या
भागात वादळाचा जोर कायम असून, ते शांत व्हायला आणखी बरेच तास लागणार असल्याचं हवामान
खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मध्य पश्चिम तामिळनाडू आणि केरळमार्गे ते अरबी समुद्रात
उद्यापर्यंत पोहोचेल.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या २५ नोव्हेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी
संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ५०वा भाग आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या
सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर,
माय जी ओ व्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं
आहे.
****
शेती
उन्नत करण्यासाठी आणि शेतकरी समृद्ध होण्यासाठी शासनाच्या वतीनं विविध योजना राबवण्यात
येत असून, त्या योजनांचा लाभ शेतकर्यांना मिळवून देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा झपाट्यानं
काम करत असल्याचं विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं
आज राष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य दिनानिमित्त गट शेती संदर्भात आयोजित कार्यशाळेत बोलत
होते. मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यातले शेतकरी या कार्यशाळेत सहभागी झाले असून, कृषीतज्ज्ञ
त्यांना गटशेतीसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
****
अवयवदानाच्या
जनजागृतीसाठी द फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅण्ड बॉडी डोनेशनच्या पदयात्रेला आज औरंगाबाद इथल्या
महात्मा गांधी मिशन संस्थेपासून सुरूवात झाली. एमजीएमचे सचिव अंकुश कदम, प्राचार्य
प्रताप बोराडे यांनी या पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवला. या पदयात्रेत ज्येष्ठ नागरिकांचा
समावेश आहे. चाळीस दिवस सहाशे चौसष्ठ किलोमीटर मराठवाड्यातल्या विशेषत: ग्रमीण भागात
ही पदयात्रा अवयव दानाविषयी जनजागृती करणार असल्याची माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण
समितीचे अध्यक्ष डॉ.सुधीर कुलकर्णी यांनी दिली.
****
येत्या
१९ तारखेच्या कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरला जाण्यासाठी नांदेड विभागातून दोन विशेष
रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. येत्या १८ आणि २२ नोव्हेंबरला नांदेड इथून संध्याकाळी
सात वाजून पंचवीस मिनिटांनी ही गाडी सुटणार असून पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ
मार्गे पंढरपूर इथं सकाळी आठ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी १९ नोव्हेंबरला
सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी पंढरपूर इथून सुटेल तर नांदेड इथं रात्री अकरा वाजता पोहचेल.
दुसरी गाडी २३ नोव्हेंबरला रात्री दहा वाजता पंढरपूर इथून सुटेल तर २४ नोव्हेंबरला
दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी नांदेड इथं पोहोचणार असल्याची माहिती दक्षिण मध्य
रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं दिली आहे.
****
आय
बी एस एफ बिलियर्डस् स्पर्धेत ‘एकशे-पन्नास-अप’ प्रकारात विजेतेपदाच्या मुकुटावर पंकज
अडवाणीनं सलग तिसऱ्यांदा नाव कोरलं असून, त्याच्या जागतिक विजेतेपदांची संख्या आता
२० झाली आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंकजनं म्यानमारच्या नै श्वाय ऊ याच्यावर
मात केली.
****
No comments:
Post a Comment