Monday, 10 December 2018

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 10.12.2018 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 December 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० डिसेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचं पटेल यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.

****

संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. अधिवेशन काळात राज्यसभेत आठ, तर लोकसभेत १५ विधेयकं मांडण्यात येणार आहेत. अधिवेशन आठ जानेवारीपर्यंत चालणार आहे.  

दरम्यान, या अधिवेशनात देशातले नागरिक आणि विकासाशी संबंधित मुद्यांवर चर्चा व्हायला पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर संसदीय कार्यमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली.

****

धुळे महापालिकेत भारतीय जनता पक्षानं स्पष्ट बहुमत मिळवलं असून, अहमदनगर महापालिकेत मात्र त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.

धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं ७४ पैकी ५० जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेस नऊ, काँग्रेस पाच, शिवसेना आणि एमआयएम दोन तसंच लोकसंग्राम पक्षानं एका जागेवर विजय मिळवला.

अहमदनगर महानगरपालिकेत ६८ पैकी २४ जागा जिंकून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं १८, भाजपनं १४ तर काँग्रेसनं पाच जागांवर विजय मिळवला.

****

नांदेड जिल्ह्यातल्या लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला आहे. थेट नगराध्यक्ष पदाच्या लढतीत भाजप उमेदवार गजानन सूर्यवंशी विजयी झाले असून, नगर परिषदेच्या एकूण १७ जागांपैकी १३ जागांवर भाजप, तर चार जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले.

****

वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड नगर परिषदेत नगरसेवकांच्या २० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी खासदार आणि मंत्री अनंतराव देशमुख यांच्या जन विकास आघाडीला नऊ, कॉंग्रेस, शिवसेना आणि अपक्ष उमेदवारांना प्रत्येकी तीन जागा मिळाल्या.

****

यवतमाळच्या नेर नगरपरिषदेवर शिवसेनेनं पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. १८ जागांपैकी शिवसेनेनं नऊ, काँग्रेसनं चार, राष्ट्रवादी काँग्रेसनं तीन, तर अपक्ष उमेदवारांनी दोन जागा जिंकल्या. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुनिता जयस्वाल विजयी झाल्या. 

****

छत्तीसगढ, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची उद्या मतमोजणी होणार आहे.

****

सध्याच्या काळात मानवी हक्कांचं संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी असून, या हक्काच्या अमंलबजावणीसाठी प्रत्येक ठिकाणी यंत्रणा निर्माण करावी, असं सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. रोजगार संधी, कृषी उत्पादन खरेदी, शेतकऱ्यांना योग्य दर मिळणं आदींचा समावेशही मानवी हक्काच्या व्याख्येत व्हायला हवा, असंही त्या म्हणाल्या.  

****

नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा इथं येत्या १२ डिसेंबर ते आठ जानेवारी दरम्यान चेतक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे औरंगाबाद प्रादेशिक व्यवस्थापक विजय जाधव यांनी आज औरंगाबाद इथं ही माहिती दिली. सारंगखेडा इथल्या घोडे बाजाराला सुमारे तीनशे वर्षांची परंपरा असून, इथल्या घोड्यांना देशभरातून तसंच विदेशातूनही मागणी असल्याचं ते म्हणाले.

****

नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा १८ वा दीक्षांत समारंभ आज आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा यांच्या उपस्थितीत पार पडला. वैद्यकीय क्षेत्राचा संबंध सामान्य माणसाच्या आरोग्याशी येत असल्यानं या क्षेत्रातल्या उच्च गुणवत्तेसाठी विद्यार्थी, प्राध्यापक आणि विद्यापीठानं एकत्रित प्रयत्न करावेत, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

परभणी जिल्ह्यात गोवर रुबेला लसीकरण मोहीमेअंतर्गत आतापर्यंत एक लाख ५८ हजार मुलांना लसीकरण करण्यात आलं. जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी आज परभणी इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. या मोहिमेमध्ये नऊ महिने ते १५ वर्ष वयोगटातल्या एकूण पाच लाख १२ हजार ९३ विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याचं उद्दीष्ट निश्चित करण्यात आलं आहे. गोवर, रुबेला आजाराचं उच्चाटन करण्यासाठी पालकांनी सहभाग नोंदवून ही मोहिम यशस्वी करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं.

****

परभणी जिल्ह्यातल्या चारही विधानसभा मतदार संघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि मतदानाची पावती देणारं व्ही व्ही पॅट यंत्राबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी आज दिली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या यंत्राची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर मतदान यंत्राच्या वापराबाबतची विश्वासार्हता निर्माण व्हावी, यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

//***********//

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 06 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...