Tuesday, 11 December 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 11.12.2018 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11  December 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ डिसेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.

****



v संसदेच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ; राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर

v भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

v पाच राज्यातल्या विधानसभा मतदानाची आज मतमोजणी  

v लोहा नगर परिषद आणि धुळे महानगरपालिकेमध्ये भाजपला बहुमत तर अहमदनगर महापालिका त्रिशंकू

v उत्तर प्रदेशात प्रयागराज संगमावर अस्थि विसर्जनासाठी गेलेल्या नांदेड जिल्ह्याच्या कोळंबी गावातल्या तीन महिलांसह पाच जणांचा बुडून मृत्यू

आणि

v ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा ३१ धावांनी ऐतिहासिक विजय

****



 संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. अधिवेशन काळात राज्यसभेत आठ, तर लोकसभेत १५ विधेयकं मांडण्यात येणार आहेत. हे अधिवेशन आठ जानेवारीपर्यंत चालणार आहे.  



 दरम्यान, या अधिवेशनात देशातले नागरिक आणि विकासाशी संबंधित मुद्यांवर चर्चा व्हायला पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर संसदीय कार्यमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांचीही काल बैठक झाली. राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही काल सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केली.

****



 राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी काल केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवला आहे. बिहारमध्ये जागा वाटपावरून कुशवाह नाराज होते.

****



 भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचं पटेल यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं. रघुराम राजन यांच्या राजीनाम्यानंतर ५ सप्टेंबर २०१६ रोजी त्यांची तीन वर्षांसाठी या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यापूर्वी ते रिजर्व्ह बँकेतच डेप्युटी गव्हर्नर होते.

****



 दरम्यान, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होणार आहे.

****



 नांदेड जिल्ह्यातल्या लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं बहुमत मिळवलं आहे. थेट नगराध्यक्ष पदाच्या लढतीत भाजप उमेदवार गजानन सूर्यवंशी विजयी झाले असून, नगर परिषदेच्या एकूण १७ जागांपैकी १३ जागांवर भाजप, तर चार जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत.

****



 धुळे महापालिकेत भारतीय जनता पक्षानं स्पष्ट बहुमत मिळवलं असून, अहमदनगर महापालिकेत मात्र त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. धुळे महानगरपालिकेत भाजपनं ७४ पैकी ५० जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसनं नऊ, काँग्रेसनं पाच, तर शिवसेना आणि एमआयएम पक्षानं प्रत्येकी दोन जागेवर विजय मिळवला. भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन लोकसंग्राम पक्षाच्या झेंड्याखाली निवडणूक लढवली होती. मात्र त्यांच्या या पक्षाला अवघी एक जागा मिळाली.



 अहमदनगर महानगरपालिकेत कोणत्याच राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. ६८ पैकी २४ जागा जिंकून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं १८, भाजपनं १४ तर काँग्रेसनं पाच जागांवर विजय मिळवला.

****



 वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड नगर परिषदेत नागरसेवकांच्या २० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या जन विकास आघाडीला नऊ, कॉंग्रेस, शिवसेना आणि अपक्ष उमेदवारांना प्रत्येकी तीन जागा मिळाल्या आहेत.

****



 यवतमाळच्या नेर नगरपरिषदेवर शिवसेनेनं पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. १८ जागांपैकी शिवसेनेनं नऊ, काँग्रेसनं चार, राष्ट्रवादी काँग्रेसनं तीन, तर अपक्ष उमेदवारांनी दोन जागा जिंकल्या. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुनिता जयस्वाल विजयी झाल्या. 

****



 मराठा आरक्षणासाठीच्या नव्या कायद्याअंतर्गत राज्यसरकारनं नोकर भरतीची जाहिरात जारी केल्याबद्दल, मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. नव्यानं निर्माण केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाअंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ही जाहिरात दिली असल्याचं, आरक्षणविरोधी याचिकाकर्त्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिल्या. त्यावर, मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल झालेल्या असताना राज्य सरकारला या भरतीची इतकी घाई का? असा प्रश्न न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या पीठानं केला. प्रलंबित प्रकरणातल्या कोट्याअंतर्गत राज्य सरकार भरती करणार आहे का, याबाबत न्यायालयात माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयानं सरकारला दिले आहेत.



 दरम्यान, या प्रकरणातले अर्जदाराचे वकिल गुणरत्न सदावर्ते यांना काल न्यायालयाबाहेर मारहाण करण्यात आली. मारहाण करणारा तरूण वैजनाथ मुकणे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तो जालना जिल्ह्याच्या घनसांवगी तालुक्यातल्या मुरमा गावचा रहिवाशी आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



उत्तर प्रदेशात प्रयागराज संगमावर अस्थि विसर्जनासाठी गेलेल्या नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातल्या कोळंबी गावातल्या कच्छवे आणि वैश्य कुटुंबांची नाव,  यमुना नदीत उलटून तीन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला, तीन जण अजूनही बेपत्ता आहेत. बारा जणांसह एक पुजारी आणि नावाडी असे १४ जण असलेली ही बोट काल सायंकाळी नदीत उलटली. पुजारी आणि नावाड्याने तीर गाठून, प्रशासनाला दुर्घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर सहा जणांना वाचवण्यात यश आलं असून, तीन जणांचा शोध अद्याप सुरू असल्याचं, पोलिसांनी सांगितलं.

****



 औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी, उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन आणि काटेकोर वापर आवश्यक असून यासाठी प्रत्येक आठवड्याचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले आहेत. पैठण आणि वैजापूर तालुक्याच्या दुष्काळ परिस्थितीचा काल त्यांनी आढावा घेतला. नारंगी-सारंगी मध्यम प्रकल्प आणि बोर दहेगांव मध्यम प्रकल्पांचीही सावंत यांनी पाहणी केली. पैठण तालुक्यातल्या कापूसवाडी, बालानगरसह अन्य गावातल्या पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

****



औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या करमाड उपबाजाराचं उदघाटन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते काल झालं. यावेळी बोलताना बागडे यांनी आता बाजार समितीला माल विकणारा शेतकरीही बाजार समितीचा मतदार होणार असल्याचं सांगितलं.

**** 



 अॅडलेड इथं झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर ३१ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. विजयासाठी ३२३ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव २९१ धावात आटोपला. भारतानं चार सामन्यांच्या मालिकेत एक- शून्य अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात रिषभ पंतनं अकरा झेल घेऊन, यष्टीरक्षकानं कसोटीत घेतलेल्या सर्वाधिक झेलांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. पहिल्या डावात शतक, तर दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावणारा चेतेश्वर पुजारा सामनावीर ठरला.

****



 लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ पोक्सो आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केलेल्या सुधारणांबाबत, महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं औरंगाबाद इथं आज एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आायोजित केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया राहटकर यांनी काल औरंगाबाद इथं ही माहिती दिली. सकाळी दहा वाजता हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या परिषदेचं उदघाटन होणार आहे.

****



 परभणी जिल्ह्यात गोवर रुबेला लसीकरण मोहीमेअंतर्गत आतापर्यंत एक लाख ५८ हजार मुलांचं लसीकरण करण्यात आलं. जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी काल परभणी इथं ही माहिती दिली.

****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 06 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...