Sunday, 16 December 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.12.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१६  नोव्हेंबर डिसेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 विजय दिवस आज साजरा होत आहे. १९७१ मधे पाकिस्तान बरोबरच्या युद्धात मिळवलेल्या विजयाच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस पाळण्यात येतो. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, नौदल प्रमुख ॲडमिरल सुनिल लांबा, वायुदल प्रमुख एयर चिफ मार्शल विरेंद्र सिंह धनोआ आणि लष्कर उपाध्यक्ष लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांनी नवी दिल्लीत इंडिया गेट इथल्या अमर जवान ज्योती इथं हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.



 राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही १९७१च्या युद्धात वीरमरण आलेल्या सैनीकांना आदरांजली अर्पण केली आहे. देशासाठी प्राण गमावणाऱ्या सैनिकांप्रती देश सदैव कृतज्ञ राहील, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर सैनिकांची देशभक्ती आणि शौऱ्यामुळे देशाची सुरक्षा सुनिश्चित झाल्याचं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. 

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तरप्रदेशातल्या रायबरेलीच्या दौऱ्यावर असून, रेल्वेचे डबे बनवणाऱ्या आधुनिक कोच फॅक्टरीची त्यांनी पाहणी केली. या दौऱ्याच्या दरम्यान विविध विकास प्रकल्पांचं ते उद्घाटन करणार हेत. त्यानंतर पंतप्रधान प्रयागराज इथं कुंभमेळ्यासाठी अत्याधुनिक कंट्रोल केंद्राचं उद्घाटन करतील.

****



 प्रत्येक मुलामधलं कौशल्य आणि मुलांची आवड ओळखून त्यानुसार त्यांना यशस्वी भविष्यासाठी प्रोत्साहन देणं आवश्यक आहे, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातल्या अवलखेड इथल्या असिमा बाल शैक्षणिक केंद्राचं उद्घाटन करतांना ते बोलत होते. शिक्षणामुळे मुलांचं भविष्य घडत असतं, शालेय जीवनात त्यांचं कौशल्य विकसित केल्यास ते अधिक चांगली प्रगती करु शकतात, असं त्यांनी पुढे नमूद केलं.

****



 मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा उपक्रम असलेले फिरते वस्तूसंग्रहालय, कालपासून उस्मानाबाद इथं आलं आहे. १९ डिसेंबरपर्यंत शहरातल्या कन्या प्रशाला इथं सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे वस्तूसंग्रहालय सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. तुम्ही जर वस्तूसंग्रहालयापर्यंत पोहोचू शकत नसाल तर वस्तूसंग्रहालय तुमच्यापर्यंत पोहोचेल” हे घोषवाक्य घेऊन ही बस संपूर्ण राज्यभरात फिरत आहे.

*****

***

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.08.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 22 August 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छ...