Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 February
2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ फेब्रुवारी
२०१९ दुपारी १.०० वा.
****
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला
आज राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं प्रारंभ झाला. राज्यपालांनी, काश्मीरमध्ये
पुलवामा इथं, केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध
करत, हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अपुऱ्या पावसामुळे दुष्काळाची झळ बसत असलेल्या भागाला,
वीज देयक तसंच शैक्षणिक शुल्कात सवलत, चारा छावणी, टँकरद्वारे पेयजल पुरवठा, आदी योजनांचा
राज्यपालांनी आढावा घेतला. शेतकरी तसंच पशूपालकांसाठी राज्य सरकार राबवत असलेल्या विविध
योजनांची राज्यपालांनी माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत,
43 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाल्याचं राज्यपालांनी सांगितलं.
जलयक्त शिवार योजनेतून २२ हजारावर खेडी, पाण्याच्या दुर्भिक्ष्यातून बाहेर काढल्याची
माहिती त्यांनी दिली.
राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधानसभेत नियमित कामकाज
सुरू झालं, विविध विधेयकं यावेळी सदनासमोर मांडण्यात आली. पुलवामा इथं दहशतवादी हल्ल्यातल्या
हुतात्मा सैनिकांना, श्रद्धांजलीचा प्रस्ताव,
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मांडला. सदनानं स्तब्ध उभं राहून या हुतात्म्यांना
श्रद्धांजली अर्पण केली.
शिवाजीराव देशमुख, गुणवंतराव सरोदे, बापूराव पाटील
आष्टीकर यांच्यासह सदनाच्या दिवंगत माजी सदस्यांच्या निधनाबद्दल, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी शोकप्रस्ताव मांडला, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण तसंच राष्ट्रवादी
काँग्रेसचे अजित पवार यांनी दिवंगत सदस्यांच्या कार्याला उजाळा दिला, सदनानं दिवंगत
सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
या अधिवेशनात उद्या पुरवणी मागण्या तर परवा अंतरिम
अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. येत्या एक आणि दोन मार्चला दुष्काळी परिस्थितीवर चर्चा
होणार आहे.
दरम्यान, विरोधकांनी
राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकत, विधान भवनाच्या पायऱ्यांवर मूक आंदोलन केलं.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर उत्तरप्रदेशात गोळ्या झाडल्याप्रकरणी
विरोधकांनी फलक झळकावत, निषेध केला.
****
उद्योजक
रॉबर्ट वाड्रा यांच्या कार्यालयांवर घातलेल्या छाप्यांदरम्यान जप्त केलेल्या दस्तावेजांच्या
छापील तसंच डिजिटल प्रती, येत्या पाच दिवसांत वाड्रा यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश,
दिल्ली न्यायालयानं सक्तवसूली संचालनालय - ईडीला दिले आहेत. वाड्रा यांनी विदेशात अवैध
पद्धतीनं मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी, त्यांची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. जप्त केलेल्या
कागदपत्रांच्या आधारे ही चौकशी सुरू असल्यानं, कागदपत्रांच्या प्रती मिळेपर्यंत ही
चौकशी थांबवावी, अशी विनंती वाड्रा यांनी केली आहे.
****
सुरक्षा
दलांच्या मानवी हक्कांच्या संरक्षणासंदर्भात दाखल, एका याचिकेवर सुनावणी घेण्यास, सर्वोच्च
न्यायालयानं मान्यता दिली आहे. यासंदर्भात न्यायालयानं केंद्र सरकार, जम्मू काश्मीर
राज्य सरकार तसंच संरक्षण मंत्रालयाला नोटीस बजावली आहे. सुरक्षा दलाच्या जवानांवर,
जमावाकडून होणारे हल्ले रोखणं तसंच, त्यांच्या मानवी हक्कांचं रक्षण करण्यासंदर्भात,
धोरण निश्चित करण्याची मागणी या याचिकेत केली आहे.
पुलवामा
इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटाची सखोल चौकशीची मागणी करणारी याचिका मात्र,
सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे.
दोन
पेक्षा जास्त अपत्य असणारी व्यक्ती,
लोकसभा निवडणूक लढवण्यास अपात्र असावी, अशा आशयाची जनहित याचिकाही सर्वोच्च
न्यायालयाने आज फेटाळून
लावली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुकीसाठी लागू असलेली कमाल दोन अपत्य मर्यादेची अट, लोकसभा निवडणुकीसाठीही लागू करावी, अशी
याचिकाकर्त्याची मागणी होती.
****
मुंबईचे माजी पोलीस उपायुक्त नागनाथ संबुटवाड यांचं
आज सकाळी नांदेड जिल्ह्यात मुखेड इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते.
त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी मुखेङ इथं, अंत्यसंस्कार होणार आहेत. नांदेड
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व्यंकटेश संबुटवाड यांचे ते वडिल होत.
****
हिपेटायटिस
या रोगाचं निर्मूलन करण्याचं दृष्टीने एका राष्ट्रीय कार्यक्रमाचं केंद्रीय मंत्री
अश्विनी कुमार चौबे यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन झालं. हिपेटायटिसचं २०३० पर्यंत समूळ
उच्चाटन करणं असं या कार्यक्रमाचं उद्दीष्ट आहे. या राष्ट्रीय योजनेंतर्गत हिपेटायटिस
बी आणि हिपेटायटिस सी या आजारांचं निदान आणि औषधोपचार रुग्णांना मोफत देण्यात येईल.
*****
***
No comments:
Post a Comment