Tuesday, 21 May 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.05.2019 20.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 May 2019

Time 20.00 to 20.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ मे २०१९ सायंकाळी २०.००

****



 निवडणूक मतदान केंद्रांवरच्या मतदान पडताळणी पावतीच्या माध्यमातून केली जाणारी मतमोजणी ही सुरूवातीलाच करण्यात यावी, ती मतमोजणीच्या सर्वात शेवटच्या फेरीनंतर करू नये, अशी मागणी २२ विरोधी पक्षांच्या एका शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाकडे केली आहे. जर कोठेही तफावत आढळली तर त्या विधानसभा मतदार संघातल्या सर्व मतदान केंद्रांवरच्या मतदान पडताळणी पावत्यांच्या माध्यमातून मतमोजणी करण्यात यावी, अशी मागणीही या नेत्यांनी केली आहे. निवडणूक आयोगाला भेटलेल्या शिष्टमंडळा मध्ये काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, तेलगु देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. निवडणूक आयोगानं या पक्षांचं म्हणणं ऐकून घेतलं असून, यासंदर्भात त्यांच्या सोबत उद्या बैठक घेऊन मतदान यंत्रांबाबतच्या या तक्रारींसदर्भात भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं आहे.

****



 आदर्श आचार संहितेशी संबधित प्रकरणं आणि मतभिन्नता सार्वजनिक केली जाणार नाही, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशीलचंद्र यांची आज दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर त्यांनी ही बाब स्पष्ट केली. परंपरेनुसार आयोगा मधल्या असहमती बाबतच्या तसंच मतभिन्नतेच्या नोंदी या आयोगाच्या दस्ताऐवजांचा भाग राहतील, असं आयोगानं एका निवेदनात म्हटलं आहे. निवडणूक आचारसंहिता उल्लंघनांची प्रकरणे ही अर्ध न्यायिक स्वरूपाची नसतात, त्यामुळे त्याच्यावर मुख्य निवडणूक आयुक्त किंवा अन्य आयुक्ताची स्वाक्षरी नसते. त्यामुळे असहमतीला आदेशाचा भाग बनवता येणार नसल्याचं आयोगानं म्हटलं आहे. अलिकडेच आदर्श आचार संहिता उल्लंघनाच्या प्रकरणांमध्ये निवडणूक आयुक्त लवासा यांनी आपल्या असहमतीला निवडणूक आयोग आदेशाचा भाग मानत नसल्याचं सांगत अशा प्रकरणांपासून दूर राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या विरूद्धच्या आदर्श आचारसंहिता उल्लंघनाच्या काही तक्रारींमध्ये त्यांना निर्दोष घोषित करण्यास लवासा यांनी असहमती व्यक्त केली होती. निवडणूक आयोगाच्या कामकाजाच्या नियमांनुसार एकमताने निर्णय झाला पाहिजे, मात्र मतभेद असतील तर बहुमताने निर्णय घेण्याची मुभा आहे.

****



 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या कथित छेडछाडीच्या बातम्यांबाबत माजी राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चिंता व्यक्त केली असून निवडणूक आयोगाने याबाबत सर्व शंकांचं निरसन करावं अस सूचित केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आयोगाच्या अखत्यारित असून त्यांची संरक्षण आणि सुरक्षेची जबाबदारी आयोगावर आहे. लोकशाहीच्या आधारांना आवाहन देणाऱ्या तर्कांना कोणतीही जागा नसल्याचं ते म्हणाले. जनादेश हा पवित्र असून तो सर्व प्रकारच्या संशयापासून मुक्त असावा, असं सांगून मुखर्जी यांनी याबाबत संस्थात्मक प्रामाणिकता सुनिश्चित करणे ही आयोगाची जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. देशातल्या संस्थांवर आपला विश्वास आहे. मात्र हे खरे आहे की, देशातल्या संस्थांची प्रतिष्ठा ही त्या संस्थेत काम करणाऱ्यांवर अवलंबून असते, असं ते म्हणाले.  

****



 उत्तरप्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र -इव्हीएम ठेवलेल्या कक्षांजवळ संशयास्पद इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रं आढळून आल्याचे दावे निवडणूक आयोगानं फेटाळले आहेत. विशेषतः गाझीपूर, चंदौली, दोमारीयागंज आणि झाशी लोकसभा मतदार संघांच्या बाबतीत संशयास्पद ईव्हीएम आढळल्याचे दावे तथ्यहीन असल्याचं निवडणूक आयोगानं एका निवेदनात म्हटलं आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर सीलबंद करून त्याचं चित्रणही केलं होतं, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलं आहे. मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवले असून, सुरक्षेसाठी केंद्रीय दलांच्या जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे, तसंच सर्वच ठिकाणी प्रत्येक उमेदवाराच्या एका प्रतिनिधीला सतत लक्ष ठेवण्याची परवानगी देण्यात आल्याचंही आयोगानं नमूद केलं आहे.

****



 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या  विश्वसनियतेबाबत संशय व्यक्त केल्याबद्दल भारतीय जनता पक्षानं विरोधी पक्षावर टीका केली आहे. जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्ता बहाल करण्यासाठी मतदान केल असेल तर विरोधी पक्षांनी नम्रतापूर्वक आपला पराभव स्वीकारावा, असं भाजपनं म्हटलं आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...