Friday, 3 May 2019

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 03.05.2019 11.00


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०3 मे २०१९ सकाळी ११.०० वाजता

****

अतिशय शक्तिशाली फानी हे चक्रीवादळ ओडीशाच्या तटवर्ती भागात  धडकलं आहे. त्यावर बचाव कार्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं ओडीशाचे मुख्यमंत्री नविन पटनाईक यांनी तातडीची उच्चस्तरीय बैठक घेतली. राज्य सरकारनं या वादळाच्या पार्श्र्वभूमीवर सुमारे १९ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे.  ‘फानी’ चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं बैठक झाली. प्रतिबंधात्मक उपाययोजना, तसंच मदत आणि बचाव कार्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं संबंधित राज्यांच्या अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय राखण्याचे निर्देश पंतप्रधानांनी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना दिले. सैन्य दल, वायूदल आणि नौ दलाला या चक्रीवादळाच्या पार्श्र्वभूमीवर सज्ज ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान, कोकण किनारपट्टी कडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढला असून थंड वाऱ्यामुंळे उकाडा कमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जम्मु काश्मीर इथल्या शोपीया जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असुन, एक सैनिक जखमी झाला आहे. या परिसरात दहशतवादी लपुन असल्याची माहिती मिळाल्यावर, ही कारवाई करण्यात आल्याचं सुरक्षा दलानं सांगितलं.

*****

निवडणूक काळात आयोगाच्या प्रमाणपत्राशिवाय राजकीय किंवा पक्षीय प्रचाराच्या बातम्या प्रसारित करु नये. असं आवाहन दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व खाजगी एफ. एम. तसंच वृत्त वाहिन्यांना केलं आहे. अशा प्रकारच्या जाहिराती प्रसारित करण्याआधी प्रमाणपत्र क्रमांक पाहावा. अशा प्रकारचं राजकीय अथवा प्रचार करणारं वृत्त विभागाकडे पाठवावं असंही त्यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल झालेल्या बैठकीत प्रसार भारती, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबरोबरच वाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रमाणपत्राशिवाय अशा प्रकारच्या राजकीय जाहिराती प्रसारित करणार नसल्याचं वाहिन्यांनी सांगितलं.

****

गडचिरोली इथं नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहिद झालेले हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा इथले शहिद जवान संतोष चव्हाण यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या मूळ गावी ब्रम्हणवाडा इथं आज सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातले शहिद जवान अग्रमन रहाटे यांच्या पार्थिव देहावर आर्णी तालुक्यातल्या तरोडा गावी आज सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरांनी सांगितलं आहे.

****

लोकसभा निवडणुकी दरम्यान घेतलेल्या जाहीर सभांच्या खर्चांचा तपशील सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिले आहेत. मनसेचा एकही उमेदवार निवडणूक लढवत नसतांना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात जवळपास दहा सभा घेतल्या आहेत. नियमानुसार राजकीय पक्षांना खर्च तपशील देण बंधनकारक असून मनसेलाही खर्चाचा तपशील द्यावा लागेल असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी घेतलेल्या प्रचारसभांचा खर्च कोणत्या पक्षाच्या खात्यात लावला जाणार याबाबतची विचारणा भारतीय जनता पक्षानं राज्य निवडणूक आयोगाकडं केली असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या कुरुंदा इथं एका घरात रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास गॅस टाकीचा स्फोट झाल्यानं घरातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत पती-पत्नी आणि मुलगी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सोनाजी दळवी यांच्या घरातल्या गॅस टाकीला गळती लागल्यामुळे आग लागून हा स्फोट झाला. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशमन दलाला पाचारान करावं लागलं.

****

यवतमाळ च्या पांढरकवडा वनविभागात वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला आहे.  मांगुर्डा येथील शेतात काम करत असलेल्या राजू टेकाम यांच्यावर काल दुपारच्या सुमारास वाघानं हल्ला चढविल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. यात जखमी शेतकऱी टेकाम यांना उपचारांसाठी यवतमाळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

*****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल मुंबईत वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं सनरायझर्स हैदराबाद संघावर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. दरम्यान, आज पात्रता फेरीच्या प्रवेशासाठी मोहाली इथं कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सामना आहे.

//************//








No comments: